रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मध्य भारतासाठी नव्या संधी निर्माण करणारा महामार्ग – बोरगांव ते शाहपूर

Posted On: 30 MAY 2026 6:29PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 मे 2026

 

खांडवा आणि बुऱ्हाणपूर या मध्य प्रदेशातील कृषी समृद्ध केंद्रांमध्ये आणि मध्य भारतातील केळी उत्पादन केंद्रांमध्ये दरवर्षी 1.7 दशलक्ष मेट्रीक टनांपेक्षा जास्त केळी उत्पादन होते, परिणामी दररोज 140 अवजड ट्रक इथून देशांतर्गत बाजारपेठांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय बंदरांकडे जातात. गेली कित्येक वर्षे या ट्रक्सना अरुंद, नादुरुस्त रस्त्यांवरुन जावे लागत असल्यामुळे त्यांच्या वाहतुकीची गती मंदावली होती, त्यांचा प्रवासाचा वेळ वाढून मालवाहतूक हे कठीण काम झाले होते. आता बोरगांव ते शाहपूर या राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 एल वरील मार्गिकेमुळे ही परिस्थिती बदलणार आहे. महत्त्वाकांक्षी भारतमाला परियोजनेअंतर्गत हा आधुनिक चौपदरी महामार्ग बांधण्यात येत आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 एल वरील बोरगांव ते शाहपूर हा विस्तारित मार्ग धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. हा मार्ग पुढे महाराष्ट्रातील बोरगांव बुजुर्ग ते मुक्ताईनगरपर्यंत जोडला जाणार आहे. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने विकसित केलेल्या या मार्गिकेमुळे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्यातील आंतरराज्य दळणवळण व्यवस्था अधिक मजबूत होईल. 47 किलोमीटर लांबीच्या आणि 944 कोटी रुपये प्रस्तावित खर्चाच्या या मार्गाचे 85 टक्के बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. संपूर्ण बांधकाम झाल्यानंतर हा मार्ग इंदोर आणि छत्रपती संभाजीनगर यांच्या दरम्यानचा सर्वात वेगवान, सुरक्षित व अधिक कार्यक्षम रस्ता ठरेल. आंतरराज्य वाहतूकीचा प्रमुख पर्याय ठरणाऱ्या या मार्गामुळे प्रादेशिक मालवाहतूक सुविधाही मजबूत होईल.  

शेतापासून ते बाजारपेठेपर्यंतचा मार्ग मजबूत करणे

हा प्रकल्प केळी, कापूस, सोयाबीन आणि गहू यांसारख्या पिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या कृषीसमृद्ध प्रदेशांमधून जातो.स्थानिक शेतकरी आणि वाहतूकदारांना अशा उत्तम रस्त्यांमुळे बाजारपेठेत जलद प्रवेश मिळतो आणि वाहतुकीचा खर्चही कमी होतो.

आंतरराज्यीय मार्गांमुळे चालना

हा मार्ग पुढे महाराष्ट्रातील मुक्ताईनगर प्रदेशापर्यंत विस्तारत जातो, ज्यामुळे एक मजबूत आंतरराज्यीय दुवा प्रस्थापित होतो. हा मार्ग केवळ स्थानिक मार्गांना जोडण्यापुरता मर्यादित न रहाता पलीकडील  इंदूर, खांडवा, बुरहाणपूर, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर यांना जोडणारे एक सुसंघटित वाहतूकीचे  जाळे तयार होण्यास हातभार लावतो.

या प्रकल्पाचा सर्वात महत्त्वाचे पैलू म्हणजे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्या दरम्यान एक सशक्त पर्यायी आर्थिक प्रदेश म्हणून उदयास येण्यातील त्याची भूमिका हा होय. सध्या, इंदूर आणि छत्रपती संभाजीनगर दरम्यानची वाहतूक प्रामुख्याने पारंपरिक मार्गांवर अवलंबून आहे, ज्या मार्गांवर वारंवार अरुंद रस्ते आणि वाहतूक कोंडी होऊन प्रवासाला जास्त वेळ लागतो, त्यामुळे प्रवासी आणि मालवाहतूक या दोन्हींवर त्याचा परिणाम होतो. बोरेगाव बुजुर्ग ते मुक्ताईनगर पर्यंतच्या संपूर्ण पट्ट्याचा चार पदरी आधुनिक  मार्ग म्हणून विकास केल्याने, खास करून अवजड वाहने आणि मालवाहतुकीसाठी एक जलद, सुरक्षित आणि अधिक कार्यक्षम पर्यायी मार्ग उपलब्ध होईल.

या मार्गांच्या विकासामुळे शिक्षण, आरोग्यसेवा आणि आपत्कालीन प्रतिसाद सेवा यांसारख्या अत्यावश्यक सेवा मिळवणे अधिक सुकर होईल.

   

 

* * *

राधिका अघोर/सुरेखा जोशी/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2267045) अभ्यागत कक्ष : 18