संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या ऐतिहासिक दीडशेव्या अभ्यासक्रमाच्या दीक्षांत सोहोळ्याचे आयोजन


निवृत्त सनदी अधिकारी डॉ.किरण बेदी यांनी कॅडेट्सना ‘प्रतिभावान योद्धे’ म्हणून नेतृत्व करण्याचे आवाहन केले

खडकवासला येथील समारंभात 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या पदव्या प्रदान करण्यात आल्या

Posted On: 29 MAY 2026 10:26PM by PIB Mumbai

पुणे, 29 मे 2026

पुण्यात खडकवासला येथील हबीबुल्ला सभागृहात आज राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (एनडीए) दीडशेव्या अभ्यासक्रमाच्या तुकडीचा दीक्षांत समारंभ पार पडला. या कार्यक्रमात निवृत्त सनदी अधिकारी, पुदुचेरीच्या माजी नायब राज्यपाल आणि प्रसिध्द समाजसुधारक डॉ.किरण बेदी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

दिनांक 30 मे 2026 रोजी एकूण 353 विद्यार्थी एनडीए मधून उत्तीर्ण होण्यासाठी सज्ज आहेत. आजच्या दीक्षांत समारंभात, 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठातर्फे (जेएनयु) बॅचलरची पदवी प्रदान करण्यात आली. पदवीधर विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान शाखेचे 65 विद्यार्थी, संगणक शास्त्राचे 112 विद्यार्थी आणि कला शाखेचे 59 विद्यार्थी यांचा समावेश आहे. परदेशी मित्र राष्ट्रांतील 21 कॅडेट्सना देखील पदव्या प्रदान करण्यात आल्या.

एनडीएचे कार्यवाहक प्राचार्य डॉ.विनय दीप यांनी शैक्षणिक अहवाल सादर केला. दीक्षांत समारंभात भाषण करताना डॉ.किरण बेदी यांनी देशातील सर्वात कठोर लष्करी प्रशिक्षण कार्यक्रमांपैकी एक असलेले हे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल कॅडेट्सचे अभिनंदन केले. त्यांनी कॅडेट्सना वाढत्या प्रमाणात गतिशील आणि जटील जागतिक सुरक्षाविषयक वातावरणात नेतृत्व करण्यासाठी सक्षम असलेले ‘प्रतिभावान योद्धे’ म्हणून विकसित होण्याचे आवाहन केले.

‘एम’ स्क्वाड्रनचा एसीए पीयूष रौतेला याने 7.97 च्या एफजीपीएसह विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक पटकावला आणि त्याला पीव्हीएसएम (निवृत्त) जनरल के. सुंदरजी यांच्या हस्ते कमांडंटचे रौप्य पदक आणि सीओएएसचा फिरता चषक प्रदान करण्यात आला.

‘जे’ स्क्वाड्रनचा कॅडेट रणविजय त्यागी 8.50 च्या एफजीपीएसह संगणक विज्ञान शाखेत प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आणि त्याला पीव्हीएसएम, एव्हीएसएम,एडीसी,माजी नौदलप्रमुख अॅडमिरल सुरेश मेहता यांच्या हस्ते कमांडंटचे रौप्य पदक आणि अॅडमिरलचा फिरता चषक प्रदान करण्यात आला.

‘पी’ स्क्वाड्रनचा बीसीसी सुशांत वर्मा याने 7.35 च्या एफजीपीएसह सामाजिक विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक पटकावला आणि त्याला पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएम(निवृत्त) एअरचीफ मार्शल एनसी सुरी यांच्या हस्ते कमांडंटचे रौप्य पदक आणि सीएएसचा चषक प्रदान करण्यात आला.

‘जी’ स्क्वाड्रनचा कॅडेट मनेला नितीन याने 8.18 च्या सीजीपीएसह एनडीएमध्ये सहा सत्रांच्या प्रशिक्षणादरम्यान बी.टेक. अभ्यासक्रमात प्रथम क्रमांक पटकावला. त्याला मुख्यालयातील एकात्मिक लष्करी अधिकाऱ्याच्या हस्ते कमांडंटचे रौप्य पदक आणि सीआयएससीचा चषक प्रदान करण्यात आला.

या पदवीदान समारंभाने भारत आणि परदेशी मित्र राष्ट्रांमधील सशस्त्र सेनांसाठी भविष्यातील लष्करी नेते घडवण्याच्या एनडीएच्या वैभवशाली परंपरेमध्ये आणखी एका महत्त्वाच्या टप्प्याची नोंद केली.   

निलीमा चितळे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर


 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2266891) अभ्यागत कक्ष : 10
Read this releasein: English