नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी मुंबई बंदर प्राधिकरणातील महत्वाच्या विकास प्रकल्पांसह, बंदर कार्यान्वयन, ऊर्जा पायाभूत सुविधा, वॉटरफ्रंट विकास आणि सार्वजनिक सुविधांचा घेतला आढावा

Posted On: 29 MAY 2026 9:51PM by PIB Mumbai

मुंबई, 29 मे 2026

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज मुंबईत एव्हलेन हाऊस इथे, मुंबई बंदर प्राधिकरणात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पाचा आढावा घेतला.

या आढाव्यात, मुंबई बंदर प्राधिकरणाने बंदर कार्यान्वयन सुधारण्यासाठी हाती घेतलेल्या विविध प्रकल्पाचा समावेश होता. त्याशिवाय, ऊर्जा पायाभूत सुविधा बळकट करणे, माल वाहतूक व्यवस्थेचे अद्यायवतीकरण, वॉटरफ्रंट विकसित करणे आणि सार्वजनिक  सुविधा निर्माण करणे, अशा विविध विषयांचाही त्यांनी आढावा घेतला.

 या आढावा बैठकीत चर्चा झालेल्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांमध्ये,  विकसित भारत मुंबई मरीना, जवाहर द्वीप इथे किनारी संरक्षण आणि भू-पुनर्भरण, मालेत बंदर इथली नवीन मासेमारी जेट्टी, इंदिरा डॉक इथले कार्यान्वयन आणि देखभाल व्यवस्था, जवाहर द्वीप इथले अतिरिक्त भू-पुनर्भरण, प्रस्तावित सहावा ऑइल बर्थ, जवाहर द्वीप आणि पिरपाऊ यांना जोडणारा ट्रेस्टल, कॉफर डॅम हटविणे, रेल्वे उन्नतीकरण, रस्ते आणि गोदामांचे आधुनिकीकरण यांचा समावेश होता. तसेच मुंबई बंदर प्राधिकरणाच्या, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय संमेलन केंद्राचे आयकॉनिक प्रशासकीय भवन, केंद्रीय सरकारी कार्यालय संकुल, आसाम भवन, सेंट्रल पार्क आणि इव्हेंट बे या प्रकल्पांवरही चर्चा करण्यात आली.

विकसित भारत मुंबई मरीना, हा प्रकल्प प्रिन्सेस गोदी इथे, 4.2 हेक्टर भूभाग आणि 12 हेक्टर पाण्यावर विकसित करण्याचे नियोजित आहे. हा प्रकल्प मुंबई बंदर प्राधिकरणाच्या गुंतवणुकीतून तसेच सार्वजनिक-खासगी भागीदारी पद्धतीने विकसित केला जाणार आहे. या प्रकल्पाचे काम जून 2026 मध्ये सुरू होण्याची आणि डिसेंबर 2030 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

जवाहर द्वीप इथला किनारी संरक्षण आणि भू-पुनर्भरण प्रकल्पाचाही महत्त्वाच्या ऊर्जा पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून आढावा घेण्यात आला. या प्रकल्पांतर्गत भू-पुनर्भरणाचे काम पूर्ण झाले असून, त्यामुळे अतिरिक्त 2,80,000 मेट्रिक टन कच्चे तेल साठवण क्षमता निर्माण होण्याची अपेक्षा आहे. तसेच, या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारनिर्मितीलाही चालना मिळणार आहे.

जवाहर  द्वीप इथे प्रस्तावित  असलेला सहावा ऑइल बर्थ 2.8 लाख DWT क्षमतेच्या सुझमॅक्स जहाजांसाठी नियोजित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे दरवर्षी अतिरिक्त 22 एमटीपीए  कच्च्या तेलाची हाताळणी करण्याची क्षमता निर्माण होण्याची अपेक्षा आहे. तसेच, जवाहर द्वीप आणि पिरपाऊ यांना जोडणारा सुमारे 5 किमी लांबीचा ऑफशोअर परस्पर जोडलेला ट्रेस्टल प्रस्तावित करण्यात आला आहे. हा प्रकल्प जड मालवाहतूक, पाइपलाइन कॉरिडॉरच्या गरजा आणि बंदर कार्यक्षमता व स्थैर्य वाढविण्यास मदत करणार आहे.

बंदर कार्यान्वयन अधिक कार्यक्षम करण्यासाठी राबवल्या जात असलेल्या विविध प्रकल्पांचाही आढावा घेण्यात आला. यामध्ये इंदिरा डॉक इथला कॉफर डॅम हटवणे, भारतीय पोर्ट रेल्वे आणि रोप वे महामंडळ लिमिटेड (IPRCL) यांच्या सहकार्याने रेल्वे उन्नतीकरण, तसेच आयआयटी मुंबईच्या सहकार्याने रस्ते आणि गोदामांचे आधुनिकीकरण, अशा  प्रकल्पांचा समावेश आहे.

रस्ते आणि गोदाम उन्नतीकरण प्रकल्पांतर्गत बंदराच्या आत आणि बाहेरील सुमारे 20 किमी रस्ते जाळ्याचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून, या प्रकल्पासाठी सुमारे 500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. रेल्वे उन्नतीकरण प्रकल्पाची साधारण किंमत 300 कोटी आहे.

मालेत बंदर इथे, नवीन मासेमारी जेट्टी प्रकल्पासाठी मुंबई बंदर प्राधिकारणाकडून 132.2 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे मत्स्य व्यवसाय आणि बंदर अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

तसेच, इंदिरा डॉक इथले कार्यान्वयन आणि देखभाल या कामाचे कंत्राट क्लस्टर-1 साठी जे एम बक्षी आणि क्लस्टर 2 साठी एम दिनशॉ यांना देण्यात आले आहे.

या आढाव्यात मुंबई पोर्ट अथॉरिटीच्या शहरी आणि सार्वजनिक प्रकल्पांचाही समावेश होता, ज्यामध्ये प्रिन्सेस डॉक येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय संमेलन केंद्र, व्हिक्टोरिया डॉक येथील प्रस्तावित एमबीपीएची प्रतिष्ठित प्रशासकीय इमारत, कॉटन ग्रीन येथील केंद्र सरकार कार्यालय संकुल, आसाम भवन, शिवडी येथील सेंट्रल पार्क आणि इव्हेंट बे यांचा समावेश आहे.

कॉटन ग्रीन येथील आसाम भवन प्रकल्प, मुंबई पोर्ट अथॉरिटीने आसाम सरकारला वाटप केलेल्या 1.6 एकर भूखंडावर नियोजित आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटलपासून सुमारे 4 ते 5 किमी अंतरावर असलेले हे भवन, प्रामुख्याने गंभीर आजारी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना, तसेच आसाममधील विद्यार्थी आणि उद्योजकांना सेवा देईल.

या प्रसंगी मुंबई पोर्ट अथॉरिटीचे अध्यक्ष डॉ. एम. अंगमुथू म्हणाले, “मुंबई पोर्ट अथॉरिटी अशा प्रकल्पांवर काम करत आहे, ज्यामुळे बंदराचे कामकाज सुधारेल, ऊर्जा पायाभूत सुविधा मजबूत होतील, सार्वजनिक सुविधांना पाठिंबा मिळेल आणि बंदर भविष्यातील गरजांसाठी सज्ज होईल.”

"बंदराच्या मालमत्तेचा उत्तम वापर, कार्यान्वयन कार्यक्षमता, शाश्वतता आणि मुंबई व सागरी क्षेत्रासाठी दीर्घकालीन मूल्य यावर लक्ष केंद्रित केले जात आहे." मुंबई बंदर प्राधिकरण हे बंदराची कार्यक्षमता, ऊर्जा पायाभूत सुविधा, , सार्वजनिक सुविधा आणि दीर्घकालीन सागरी विकास यावर लक्ष केंद्रित करून हे प्रकल्प पुढे नेत आहे, असेही ते म्हणाले. या भेटीदरम्यान आढावा घेण्यात आलेल्या प्रकल्पांचा उद्देश कार्यान्वयन क्षमता सुधारणे, व्यापाराला सहकार्य  आणि देशाच्या सागरी क्षेत्रात मुंबई बंदराची भूमिका अधिक मजबूत करणे हा आहे.

सुषमा काणे/निलीमा चितळे/राधिका अघोर/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2266877) अभ्यागत कक्ष : 9
Read this releasein: English