युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
मुंबईत फिट इंडिया – संडेज ऑन सायकल उपक्रमाची 75 वी आवृत्ती साजरी, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2030 च्या भारतातील आयोजनाला प्रोत्साहन
Posted On:
24 MAY 2026 5:24PM by PIB Mumbai
भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या अर्थात एसएआयचे मुंबई केंद्र आणि बीपीसीएल फिट दिवाज यांच्या संयुक्त विद्यमाने आज मुंबईच्या चेंबूर येथील आझादनगरच्या भारत पेट्रोलियम कर्मचारी नागरी वसाहतीत फिट इंडिया – संडेज ऑन सायकल या कार्यक्रमाची 75 वी आवृत्ती आयोजित करण्यात आली. या विशेष उपक्रमाद्वारे तंदुरुस्ती, सायकलिंगची संस्कृती, महिला सक्षमीकरण आणि लोकांचा सहभाग याला प्रोत्साहन देण्यात आले तसेच 2030 मध्ये भारतात आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या दृष्टीकोनाचा गौरव करण्यात आला.
ही सायकल रॅली सकाळी 7.00 वाजता सुरू झाली आणि त्यात मुंबईच्या कानाकोपऱ्यातून आलेले सायकलस्वार, फिटनेसप्रेमी, तरुण आणि महिला मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.

या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू आणि अर्जुन पुरस्कार विजेती मधुरिका पाटकर; आंतरराष्ट्रीय हॉकीपटू आणि अर्जुन पुरस्कार विजेती सबा अंजुम करीम; बीपीसीएल दिवाजच्या ब्रँड ॲम्बेसेडर राधिका खन्ना, बीपीसीएल चे प्रमुख महाव्यवस्थापक (क्रीडा) दीपक जैन; आणि एसआयए मुंबईचे सहाय्यक संचालक अंकित पाटील यांसारख्या नामवंत खेळाडू आणि मान्यवरांची उपस्थिती होती.

रॅलीमध्ये सहभागी झालेल्यांना संबोधित करताना, या खेळाडूंनी नागरिकांना सायकलिंग आणि तंदुरुस्ती, सक्रीय जीवनशैलीचा एक भाग म्हणून स्वीकारण्याचे आणि अधिक निरोगी व सुदृढ भारत घडवण्यात योगदान देण्याचे आवाहन केले. फिट इंडिया चळवळ, संपूर्ण देशभरात आरोग्य, सक्रीय जीवनशैली आणि जनसहभागावर आधारित फिटनेसविषयी सातत्याने जनजागृती करत असल्याचे यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
एसएआय, मुंबई प्रादेशिक केंद्राच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले की, फिट इंडिया चळवळ, लोक सहभाग आणि नियमित उपक्रमांच्या माध्यमातून तंदुरुस्तीला सतत चालना देत आहे. संडेज ऑन सायकलची ही 75 वी आवृत्ती आरोग्य, सुदृढता आणि सक्रिय जीवनशैलीप्रति वाढत्या कटिबद्धतेचे द्योतक आहे. बीपीसीएल दिवाज सोबतच्या या सहयोगामुळे, क्रीडा आणि आरोग्याच्या प्रसारात महिलांच्या नेतृत्वाखालील फिटनेस उपक्रम आणि कॉर्पोरेट क्षेत्राचा सहभाग महत्त्वाचा असल्याचेही अधोरेखित झाले आहे, त्यानंतर सहभागींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या या कार्यक्रमाची सांगता झाली; या प्रतिसादामुळे फिट इंडिया ही संकल्पना आणि भारतात 2030 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याच्या ध्येयाला जनतेचा असलेला पाठिंबा अधोरेखित झाला.
***
सुषमा काणे/राजेश शिरभाते/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2264805)
अभ्यागत कक्ष : 13