महिला आणि बालविकास मंत्रालय
महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून ब्रिक्स महिला कार्यगटाची दुसरी पूर्वतयारी बैठक घेण्यात आली.
बहुपक्षीय सहकार्य बळकट करणे आणि प्रमुख प्राधान्य क्षेत्रांवर एकमत वाढवण्याबाबत ब्रिक्स सदस्य देशांमध्ये विचारविनिमय,
Posted On:
22 MAY 2026 10:14PM by PIB Mumbai
भारताच्या अध्यक्षतेखाली, ब्रिक्स महिला कार्यगटाची दुसरी पूर्वतयारी बैठक 22 मे 2026 रोजी आभासी पद्धतीने पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक हे होते. त्यांनी सर्व प्रतिनिधींचे स्वागत केले आणि भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेची मुख्य संकल्पना असलेल्या लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी अंतर्गत सामायिक प्राधान्यक्रमांना पुढे नेण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांमधील सातत्यपूर्ण सहकार्याच्या महत्त्वावर भर दिला.

या बैठकीदरम्यान, सहभागी ब्रिक्स सदस्य देशांनी बहुपक्षीय सहकार्य बळकट करण्याबाबत आणि प्रमुख प्राधान्य क्षेत्रांवर एकमत घडवून आणण्याबाबत विचारविनिमय केला. यामध्ये सर्वोत्कृष्ट कार्यपद्धतींचे संकलन तसेच महिलांचे डिजिटल व आर्थिक समावेशन आणि उद्योजकतेसाठी क्षमता निर्मिती आराखडा तयार करणे या महत्त्वाच्या विषयांचा समावेश होता.

आपल्या प्रास्ताविक भाषणात अध्यक्षांनी ब्रिक्स सदस्य देशांमध्ये विधायक चर्चा, परस्परांकडून शिकण्याची वृत्ती आणि ठोस परिणामांवर आधारित सहकार्याला प्रोत्साहन देण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. बैठकीतील चर्चेचे रूपांतर कृतीशील परिणामांमध्ये होणे आवश्यक असून, त्यामुळे ब्रिक्सच्या व्यापक अजेंड्याला महत्त्वपूर्ण हातभार लागेल, यावरही त्यांनी भर दिला.
दरम्यान, ब्रिक्स महिला मंत्र्यांची बैठक आगामी 8-9 जुलै 2026 रोजी कोची येथे आयोजित केली जाईल, अशी घोषणा यावेळी करण्यात आली. आगामी ब्रिक्स शिखर परिषदेच्या अनुषंगाने, पुढील तांत्रिक सल्लामसलत आणि संयुक्त उपक्रमांच्या माध्यमातून हे सहकार्य कायम ठेवण्याच्या सहमतीने या बैठकीचा समारोप झाला.
***
नेहा कुलकर्णी/राज दळेकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2264445)
अभ्यागत कक्ष : 3