राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात दगड खाण मालकांशी संबंधित लोकांच्या हल्ल्यात एका कार्यकर्त्याचा मृत्यू आणि 'एमआरओ' (मंडळ महसूल अधिकारी) जखमी झाल्याच्या वृत्ताची भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून स्वतःहून घेतली दखल

Posted On: 20 MAY 2026 9:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 मे 2026

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (नॅशनल ह्युमन राइट्स कमिशन- एन एच आर सी) एका माध्यम वृत्ताची स्वतःहून (सुओ मोटो) दखल घेतली आहे. या वृत्तानुसार, 12 मे 2026 रोजी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील विरार पूर्व येथील शिरगाव भागात एका दगड खाणीची पाहणी करण्यासाठी गेलेले  एक स्थानिक माहिती अधिकार कार्यकर्ते आणि मंडळ महसूल अधिकारी (एम आर ओ) यांच्यावर, खाण चालकांशी संबंधित लोकांच्या एका गटाने हल्ला केला. या हल्ल्यात कार्यकर्त्याचा मृत्यू झाला, तर मंडळ महसूल अधिकारी  जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, या दगड खाणीत चालणाऱ्या बेकायदेशीर उत्खननाबाबत शासकीय पोर्टलवर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

वृत्तपत्रातील मजकूर जर सत्य असेल, तर तो पीडितांच्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा गंभीर प्रश्न निर्माण करतो, असे निरीक्षण आयोगाने नोंदवले आहे. त्यामुळे आयोगाने महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि पालघरचे जिल्हा दंडाधिकारी यांना नोटीस बजावली असून, दोन आठवड्यांत या प्रकरणी सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या अहवालात प्रकरणाच्या तपासाची सद्यस्थिती आणि जखमी महसूल अधिकाऱ्याच्या प्रकृतीचा तपशील समाविष्ट असणे अपेक्षित आहे.

यासंबंधी 12 मे 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या माध्यम वृत्तानुसार, पीडित व्यक्ती घटनास्थळी पोहोचताच त्यांना गाडीतून ओढून बाहेर काढण्यात आले आणि काठ्या आणि दगडांनी बेदम मारहाण करण्यात आली. तसेच, हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनाचीही तोडफोड केली.


सुवर्णा बेडेकर/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2263487) अभ्यागत कक्ष : 13
Read this releasein: English , हिन्दी