अर्थ मंत्रालय
डीएफएस आणि एनसीजीटीसी यांचे महत्वाचे उपक्रम: एसएलबीसी महाराष्ट्र च्या सौजन्याने आपत्कालीन पतहमी योजनेच्या पाचव्या टप्प्याविषयी मुंबईत जनजागृती परिषद
पश्चिम आशियातील संकटाच्या काळात सरकारने एमएसएमई आणि हवाई वाहतूक क्षेत्राला दिलासा देण्यासाठी लक्ष्यीत पत पुरवठा उपक्रम केले सुरू
Posted On:
20 MAY 2026 5:21PM by PIB Mumbai
मुंबई, 20 मे 2026
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसह, इतर महत्वाच्या व्यावसायिक क्षेत्रांना वित्तीय पाठबळ देऊन अधिक मजबूत करण्याच्या हेतूने, भारत सरकारच्या आपत्कालीन पत हमी योजना- ईसीएलजीएस 5.0 विषयी जनजागृती करण्यासाठी, आज मुंबईत नरीमन पॉइंट इथे यशवंतराव चव्हाण केंद्रात, एका राज्यस्तरीय जनजागृती परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या योजनेचा उद्देश, व्यवसाय, विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसेच हवाई क्षेत्रातील उद्योगांना लक्ष्यीत पत पाठबळ देऊन, त्यांना सध्या असलेल्या अल्पकालीन रोख पैशांच्या आव्हांनाचा सामना करण्यासाठी सक्षम करणे हा आहे. पश्चिम आशियातील संकटामुळे त्यांच्या व्यवसायात आलेले अडथळे दूर होण्यासाठी, हे पाऊल महत्वाचे ठरणार आहे.
राज्य स्तरीय बँकर्स समिती – एसएलबीसी, महाराष्ट्र ने हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात महाराष्ट्र बँक समन्वयक असून, केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अखत्यारीतील वित्तीय सेवा विभाग, राष्ट्रीय पत हमी विश्वस्त कंपनी- एनसीजीटीसी, जन समर्थ पोर्टल आणि पीएसबी अलायन्स प्रायव्हेट लिमिटेडने सहकार्य केले होते. एमएसएमई तसेच महाराष्ट्रातील सार्वजनिक बँकांसह इतर महत्वाच्या खाजगी बँकांचे पत पुरवठा अधिकारी या परिषदेत सहभागी झाले होते.एमएसएमई चेंबर्स ऑफ कॉमर्स, व्यापारी संघटना आणि एनबीएफसीचे प्रतिनिधी देखील या परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागातील वरिष्ठ अधिकारी, उपसचिव गरिमा कपूर आणि अवर सचिव शैलेन्द्र कुमार यांनी कार्यक्रमात आभासी माध्यमातून सहभाग घेतला.
या परिषदेत महाराष्ट्रात ईसीएलजीएस 5.0 ची पारदर्शक, सुलभ आणि जलद अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला. व्यवसायासाठीच्या भांडवल विषयक अडचणींना सामोरे जाणाऱ्या पात्र एमएमएमई आणि व्यावसायिक आस्थापनांना वेळेवर आणि विनाअडथळा पत सहाय्य उपलब्ध करून देण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

या कार्यक्रमादरम्यान भारत सरकारच्या 'जन समर्थ पोर्टल'चे प्रत्यक्ष सादरीकरण करण्यात आले. यामध्ये ईसीएलजीएस 5.0 अंतर्गत कर्जासाठी अर्ज, आणि मंजुरीची पूर्णपणे डिजिटल, पेपरविरहीत आणि सुलभ प्रक्रिया प्रदर्शित करण्यात आली. डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या वापरामुळे पात्र व्यवसायांपर्यंत अधिक वेगाने पोहोचणे शक्य होईल आणि कर्ज वितरणाची प्रक्रिया गतिमान होईल, यावर अधिकाऱ्यांनी भर दिला.
एनसीजीटीसी आणि पीएसबी अलायन्स च्या प्रतिनिधींनी सर्व सहभागी बँकांना, या योजनेअंतर्गत कर्ज वितरणाला गती देण्याचे आणि बँकांच्या शाखा आणि एमएसएमई कर्ज प्रक्रिया केंद्र, यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले. कर्जदारांचे पत मूल्यांकन आणि रोखता विषयक मूल्यांकनाशी संबंधित तांत्रिक समस्यांचे निराकरण करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
ईसीएलजीएस 5.0 एनसीजीटीसीच्या माध्यमातून 100 टक्के पत हमी संरक्षण प्रदान केले जाते, त्यामुळे बँकांना पात्र उद्योग आणि व्यावसायिक आस्थापनांना त्वरित आणि जोखीममुक्त आर्थिक सहाय्य द्यायला प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे, यावर या परिषदेत भर देण्यात आला.

उपस्थितांना संबोधित करताना अधिकाऱ्यांनी नमूद केले की, ईसीएलजीएस 5.0 ही केवळ एक कर्ज योजना नसून, तंत्रज्ञानावर आधारित बँकिंग सेवांच्या माध्यमातून सुलभ कर्ज पुरवठा सुनिश्चित करून, विशेषतः महाराष्ट्रातील एमएसएमई परिसंस्थेच्या आर्थिक विकासाला गती देणारा एक महत्त्वाचा घटक आहे.
परिषदेत सहभागी झालेल्या सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांनी या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीप्रति आपण पूर्ण वचनबद्ध असल्याचे सांगितले आणि आपल्या शाखांच्या जाळ्यामार्फत व्यापक जनजागृती मोहीम राबवण्याचे आश्वासन दिले. या योजने अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी पात्र उद्योजक आणि व्यवसायांनी जवळच्या बँक शाखांशी संपर्क साधावा, अथवा भारत सरकारच्या 'जन समर्थ पोर्टल'चा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले.
निलीमा चितळे/राधिका अघोर/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2263308)
अभ्यागत कक्ष : 38