इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय राज्यमंत्री जितिन प्रसाद यांच्या हस्ते सी-डॅक मुंबई येथे ‘सत्या ऑरा’ प्रणालीचा प्रारंभ, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञान विषयक स्वदेशी नवोन्मेषांचा घेतला आढावा

Posted On: 14 MAY 2026 12:28PM by PIB Mumbai


मुंबई, 14 मे 2026

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी बुधवारी, 13 मे 2026 रोजी मुंबईतील सी-डॅक अर्थात प्रगत संगणन विकास केंद्राला (C-DAC - Centre for Development of Advanced Computing) भेट दिली. या भेटीदरम्यान, राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी ‘सत्या ऑरा’ (SATYA AURA) या स्मार्ट ब्राउझर आधारित वापर सुलभता प्रणालीचा प्रारंभ केला. या सुविधेमुळे संकेतस्थळांना वापरकर्ता स्नेही स्वरुप येईल, तशीच ती प्रत्येक स्थितीतील वापरकर्त्याच्या दृष्टीने वापर सुलभतेचा अनुभव देणारी होतील. ही सुविधा दृष्टिदोष, संज्ञानात्मक दोष, हालचाल दोष, श्रवणदोष, मज्जासंस्थेशी संबंधित आणि वयोमानानुसार येणाऱ्या दोष असलेल्या वापरकर्त्यांसह ज्येष्ठ नागरिकांनाही मदतीची ठरणार आहे. 

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी धोरणात्मक आणि उदयोन्मुख क्षेत्राअंतर्गत सी-डॅकद्वारे राबवल्या जात असलेल्या विद्यमान संशोधन, तंत्रज्ञान विकास आणि नवोन्मेषविषयक उपक्रमांचा आढावाही घेतला. यावेळी त्यांना देशाची वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान विषयक क्षमता बळकट करण्याच्या उद्देशाने प्रमुख क्षेत्राअंतर्गत सुरू असलेले संशोधन आणि स्वदेशी तंत्रज्ञान विकासासाठीच्या प्रयत्नांची माहिती देखील दिली गेली.

यावेळी सीडीपीजी अर्थात सार्वजनिक हितासाठीचे माहितीसाठा केंद्र (CDPG - Center of Data for Public Good), विज्ञान नवोन्मेष आणि विकास प्रतिष्ठान (FSID - Foundation for Science Innovation and Development), बंगळुरु  येथील भारतीय विज्ञान संस्था (IISc), आणि सी-डॅक या संस्थांमध्ये एक सामंजस्य करारही करण्यात आला. कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक सार्वभौम पायाभूत सुविधा, विश्वसार्ह एआय-अॅज-अ-सर्व्हिस अर्थात सेवांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI-as-a-Service), परस्पर समन्वयीत कार्यान्वयन, तसेच मुक्त मानके - धोरण आणि उत्तरदायित्व आराखडा या क्षेत्रांधील सहकार्यासाठी हा करार करण्यात आला आहे. यावेळी सी-डॅक मुंबईचे कार्यकारी संचालक आदित्य कुमार सिन्हा आणि बंगळुरुचा भारतीय विज्ञान संस्थेमधील भू-स्थानिकय (Geospatial) विभागाचे संचालक तसेच मुख्य शास्त्रज्ञ ज्योतिर्मय दत्ता यांच्यात या सामंजस्य कराराची देवाणघेवाण झाली.

यावेळी राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी उपस्थितांना संबोधित केले. राष्ट्रीय प्राधान्यक्रमांना पाठबळ पुरवण्यासाठी मध्ये सी-डॅक आणि त्या़च्या शास्त्रज्ञांनी स्वदेशी उपाययोजना, संशोधन आणि तंत्रज्ञानावर आधारित नवोन्मेषाच्या माध्यमातून दिलेल्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले. सी-डॅककडे प्रचंड प्रतिभा आणि अनुभव आहे, अशावेळी संस्थेने भविष्यवेधी दृष्टीकोन बाळगायला हवा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम तंत्रज्ञान, ब्लॉकचेन यांसारख्या तंत्रज्ञानामध्ये भविष्यातील कौशल्यांसाठी सज्ज असायला हवे, असे ते म्हणाले.

देशातील संशोधन आणि विकास विषयक पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी तसेच युवा वर्ग आणि संशोधकांमध्ये नवोन्मेषाची संस्कृती अधिक खोलवर रुजवण्यासाठी केंद्र सरकारची दृढ वचनबद्धताही त्यांनी अधोरेखित केली. यामुळे देशातील युवा संशोधकांना संसाधने उपलब्ध होऊ शकतील, तसेच त्याबाबतच्या संधी निर्माण होऊ शकतील असे ते म्हणाले.

केंद्रीय राज्यमंत्री जितिन प्रसाद यांच्या या भेटीदरम्यान सीडॅकचे कार्यकारी संचालक आदित्य कुमार सिन्हा यांच्यासह सीडॅकचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


नितीन फुल्लुके/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2260931) अभ्यागत कक्ष : 37
Read this releasein: English