आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशभरात औषधांची सुरक्षितता बळकट करण्यासाठी आणि औषधांच्या तर्कसंगत वापराला चालना देण्यासाठी भारतीय फार्माकोपिया आयोगाने केले बिहार, महाराष्ट्र आणि मिझोराम राज्य फार्मसी कौन्सिलसोबत सामंजस्य करार

Posted On: 12 MAY 2026 7:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 मे 2026

देशभरात औषधांची सुरक्षितता बळकट करण्यासाठी आणि औषधांच्या तर्कसंगत वापराला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलत, भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत एक स्वायत्त संस्था असलेल्या गाझियाबाद येथील भारतीय फार्माकोपिया आयोगाने (आयपीसी),  आज त्यांच्या कार्यालयात महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिल, बिहार राज्य फार्मसी कौन्सिल, आणि मिझोराम राज्य फार्मसी कौन्सिल यांच्यासोबत तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.

या सामंजस्य करारांवर आयपीसी चे सचिव आणि  वैज्ञानिक संचालक डॉ. व्ही. कलैसेल्वन यांनी बिहार राज्य फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. प्रकाश सिन्हा; मिझोराम राज्य फार्मसी कौन्सिलचे उपाध्यक्ष डॉ. एच. लाललेनमाविया; आणि महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष  अतुल अहिरे यांच्यासोबत सहभागी संस्थांचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्वाक्षरी केली.

औषधांच्या तर्कसंगत वापराला चालना देण्यासाठी, ‘फार्माकोविजिलन्स'म्हणजेच औषध सुरक्षा भान  उपक्रम वाढवण्याच्या आणि संबंधित राज्यांमध्ये रुग्ण सुरक्षा उपक्रमांना गती देण्याच्या हेतूने  आयपीसी  आणि राज्य फार्मसी परिषदेमधील सहकार्यात्मक प्रयत्न मजबूत करणे हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे.

या सहकार्याचा भाग म्हणून, औषधांचा सुरक्षित, प्रभावी आणि दाखल्यावर आधारित वापर सुनिश्चित करण्यासाठी नोंदणीकृत फार्मसिस्टमध्ये 'नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया' (एनएफआय) चा व्यापक प्रसार आणि अवलंब करण्यासाठी भागीदार संस्था काम करतील. राज्याच्या आरोग्य सेवा सुविधांमधील रुग्णालयांच्या फार्मसीमध्ये एनएफआय  हा एक अनिवार्य संदर्भ दस्तऐवज म्हणून स्थापित करण्यासाठी देखील प्रयत्न केले जातील.

हे सहकार्य 'ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन' (एडीआर - औषधांचे प्रतिकूल परिणाम) नोंदवण्याच्या यंत्रणेला प्रोत्साहन देऊन आणि 'फार्माकोविजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया' (पीव्‍हीपीआय) च्या समन्वयाने  एडीआर  परीक्षण केंद्रे   (एमएमसीज्) स्थापन करून 'फार्माकोविजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया'अधिक मजबूत करेल. यामुळे औषध सुरक्षा देखरेख यंत्रणा बळकट होईल आणि फार्माकोविजिलन्स उपक्रमांमध्ये फार्मसिस्ट आणि आरोग्य सेवा व्यावसायिकांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे.

याव्यतिरिक्त, आयपीसी आणि राज्य फार्मसी कौन्सिल औषधांचा तर्कसंगत वापर, फार्माकोविजिलन्स आणि फार्माकोपिया मानकांमधील व्यावसायिक सक्षमता वाढवण्यासाठी फार्मसिस्टसाठी प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा आणि निरंतर शिक्षण उपक्रम संयुक्तपणे आयोजित करतील. ही भागीदारी औषध सुरक्षा, नियामक मानके आणि तर्कसंगत औषधोपचार या क्षेत्रातील संशोधन आणि व्यावसायिक सहकार्याला देखील चालना देईल.


सुवर्णा बेडेकर/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2260407) अभ्यागत कक्ष : 14