नौवहन मंत्रालय
केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी राष्ट्रीय सागरी वारसा संकुलाच्या (एन एम एच सी) प्रगतीचा घेतला आढावा; पहिल्या टप्प्याच्या पूर्ततेसाठी जुलै 2026 चे लक्ष्य निश्चित
एन एम एच सी च्या जागतिक सहकार्याला गती देण्यासाठी भारताचे 10 देशांसोबत सामंजस्य करार
एन एम एच सी च्या जागतिक विस्तारासाठी भारताचे नेदरलँड्स, डेन्मार्क, जर्मनी, दक्षिण कोरिया, संयुक्त अरब अमिरात, पोर्तुगाल, व्हिएतनाम, ओमान, इस्रायल आणि थायलंड या देशांशी सामंजस्य करार
सर्वानंद सोनोवाल यांनी आखाती सामुद्रधुनीतील सागरी परिस्थितीचा घेतला आढावा; भारताकडे येणाऱ्या जहाजांच्या सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक पावले उचलण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश
प्रविष्टि तिथि:
06 MAY 2026 9:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 मे 2026
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी लोथल येथे उभारल्या जाणाऱ्या राष्ट्रीय सागरी वारसा संकुलाच्या (एन एम एच सी) प्रगतीचा आढावा घेतला आणि या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी जुलै 2026 चे लक्ष्य निश्चित केले. या आढाव्यादरम्यान, मंत्र्यांनी बांधकामांना गती देण्याचे आणि पॅनेल (भिंतीवरील सजावट), भित्तिचित्रे, छताची रचना (सीलिंग फॅब्रिकेशन) आणि फ्लोअरिंगसह (जमिनीचे काम) महत्त्वपूर्ण घटकांचे काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. निर्धारित मुदतीत हे संकुल कार्यान्वित करण्यासाठी कालमर्यादेचे काटेकोरपणे पालन करण्यावर सोनोवाल यांनी भर दिला.
“राष्ट्रीय सागरी वारसा संकुल (एन एम एच सी) हा उपक्रम, भारताचा समृद्ध सागरी इतिहास आणि वारसा तसेच समुद्राशी असलेला आपला जुना सांस्कृतिक आणि नागरी जीवनात्मक संबंध जगासमोर प्रभावीपणे मांडणारा मैलाचा दगड ठरणारा उपक्रम आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली, आम्ही एन एम एच सी ला जागतिक दर्जाचे ठिकाण म्हणून विकसित करण्यास वचनबद्ध आहोत, जे आपल्या वारशाचा अभिमान बाळगण्यासोबतच भावी पिढ्यांना प्रेरणा देईल. आपण सर्वोच्च दर्जा राखून हे काम वेळेत पूर्ण करणे सुनिश्चित केले पाहिजे,” असे सोनोवाल यांनी सांगितले.
या प्रकल्पाच्या जागतिक आयामावर प्रकाश टाकताना मंत्र्यांनी आसियान- आग्नेय आशियाई राष्ट्र समूहातील (ए एस ई ए एन) देशांसह शेजारील आणि सागरी राष्ट्रांशी सहकार्य करण्याच्या गरजेवर भर दिला, जेणेकरून भारताचा सामायिक सागरी वारसा आणि ऐतिहासिक संबंध प्रदर्शित करता येतील. संकुलाची आंतरराष्ट्रीय ओळख वाढवण्यासाठी अशा भागीदाऱ्यांचा सक्रियपणे पाठपुरावा करण्यास अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. भारताने यापूर्वीच नेदरलँड्स, डेन्मार्क, जर्मनी, दक्षिण कोरिया, संयुक्त अरब अमिरात, पोर्तुगाल, व्हिएतनाम, ओमान, इस्रायल आणि थायलंड या 10 देशांसोबत सामंजस्य करार केले आहेत, तर इटली, फ्रान्स, म्यानमार आणि कंबोडिया हे आणखी 4 देश, एन एम एच सी ला सागरी इतिहासाचे जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी लवकरच सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याची शक्यता आहे.
सोनोवाल यांनी, आंतर-मंत्रालयीन समन्वयाचे महत्त्व देखील अधोरेखित केले. एन एम एच सी ची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी आणि हे संकुल एक मोठे पर्यटन आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून नावारूपास यावे, यासाठी संस्कृती मंत्रालय आणि पर्यटन मंत्रालयासोबत घनिष्ठ सहकार्य करण्याचे निर्देश त्यांनी दिले. याव्यतिरिक्त, पर्यटकांचा सतत राबता राहावा आणि त्यांची संख्या वाढावी यासाठी राष्ट्रीय आणि राज्य पर्यटन विभागांच्या समन्वयाने कार्यक्रमांचे एक सर्वसमावेशक वेळापत्रक करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
मंत्र्यांनी या संकुलाच्या शाश्वत देखभाल आणि दीर्घकालीन व्यवहार्यतेसाठी 'महसूल नमुना'स्पष्टपणे माडण्याच्या सूचनाही दिल्या.
“एन एम एच सी हा केवळ एक पायाभूत सुविधा प्रकल्प नाही — तर तो भारताच्या सागरी चैतन्याचा सन्मान आणि आपल्या ऐतिहासिक जागतिक संबंधांना समजून घेण्याचे प्रवेशद्वार आहे. पंतप्रधान मोदीजींच्या विकास आणि सांस्कृतिक जतनावर असलेल्या काळजीपूर्वक देखरेखीमुळे आम्ही एक असे व्यासपीठ निर्माण करत आहोत जे पर्यटनाला बळकटी देईल, आर्थिक संधी निर्माण करेल आणि सागरी राष्ट्र म्हणून भारताची ओळख अधिक दृढ करेल,” असे सोनोवाल यांनी पुढे नमूद केले.
या प्रकल्पाचा 1ए टप्पा, जो या वर्षाच्या जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे, त्यामध्ये सहा संग्रहालय दालने, लोथल शहरी वसाहत, जल-आधारित सजावटीची संकल्पना(ॲक्वॅटिक थीमिंग),सार्वजनिक जागांची ठराविक संकल्पनेनुसार सजावट (कॉमन एरिया थीमिंग), समुद्र/नदीकिनाऱ्यावर असलेल्या धक्क्या पर्यंत जाणारा पादचारी मार्ग (जेटी वॉकवे) आणि भारतीय नौदलाच्या कलाकृतींच्या प्रदर्शनाचा समावेश आहे.
पुढील टप्प्यात, म्हणजेच 1 B टप्प्यात सुमारे 3,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल, ज्यामध्ये आठ अतिरिक्त संग्रहालय दालने, दीपगृह संग्रहालय, बगीचा संकुल, लोथल प्रकल्पातील NI-VAV संबंधित घटक आणि 50 घुमटाकार प्रेक्षागार (थिएटर) यांच्यासह इतर आकर्षणांचा समावेश असेल.
पूर्ण झाल्यानंतर, एन एम एच सी, सागरी इतिहास, पर्यटन आणि सांस्कृतिक प्रतिबद्धतेचे जागतिक केंद्र म्हणून उदयास येईल, जे भारताच्या वारसा जतन करण्याच्या आणि आर्थिक विकासाला चालना देण्याच्या संकल्पनेत मोलाचे योगदान देईल.
सोनोवाल यांनी इराणजवळील आखाती सामुद्रधुनीतील परिस्थितीचा आणि भारताकडे येणाऱ्या जहाजांच्या सुरक्षित प्रवासासाठी उचलल्या जाणाऱ्या पावलांचाही आढावा घेतला. त्यांनी भारताकडे येणाऱ्या जहाजांच्या सुरक्षित प्रवासासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

शैलेश पाटील/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2258568)
आगंतुक पटल : 44