कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय नागरिकांना ‘सायबर गुलामगिरी’त ढकलणारी टोळी सीबीआयने आणली उघडकीला


4 राज्यात 9 ठिकाणी छापेमारी; एकाला अटक

Posted On: 06 MAY 2026 8:14PM by PIB Mumbai

मुंबई, 6 मे 2026

भारतीय नागरिकांना परदेशात आकर्षक नोकरीचे आमिष दाखवून आग्नेय आशियाई देशांमध्ये त्यांची तस्करी करणाऱ्या एजंट्सच्या एका संघटित टोळीचा केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) तपास सुरू केला आहे.

तपासात असे उघड झाले आहे की, पीडितांना जास्त पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून प्रामुख्याने म्यानमार आणि कंबोडियामध्ये असलेल्या फसवणुकीच्या केंद्रांमध्ये नेले जात होते. आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी टोळ्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या या केंद्रांना “सायबर गुलामगिरी”ची केंद्रे म्हटले जाते. या केंद्रात तस्करी केलेल्या व्यक्तींना विविध प्रकारच्या सायबर-आधारित फसवणुकीत जबरदस्तीने सहभागी करून घेतले जात होते.

या केंद्रांमधील पीडितांच्या हालचालींवर कठोर निर्बंध लादले जात असून अनेकदा तिथे पोहोचल्यावर त्यांचे पासपोर्ट जप्त केले जात असल्याचे आढळले. अहवालांनुसार, शारीरिक आणि मानसिक छळाच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये, पीडितांना सुटका मिळवण्यासाठी आपल्या कुटुंबाकडून आर्थिक मदत मागून खंडणी देण्याकरिता भाग पाडले गेले.

सध्या सुरू असलेल्या तपासाचा भाग म्हणून, सीबीआयने चार राज्यांमधील नऊ ठिकाणी समन्वित छापेमारी केली आहे. यामध्ये मुंबई, दिल्ली, लखनौ, काशीपूर तसेच उत्तर प्रदेशातील गोंडा आणि सहारनपूर जिल्ह्यांमधील ठिकाणांचा समावेश आहे. देशभर करण्यात आलेल्या व्यापक तपासादरम्यान पिडीतांचे जबाब नोंदवण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

मानव तस्करीच्या जाळ्यात सामील असलेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी एजन्सीने क्रिप्टोकरन्सी व्यवहारांचा मागोवा घेण्यासह तपशीलवार आर्थिक विश्लेषण देखील केले आहे. छाप्यादरम्यान, गुन्ह्याशी संबंधित पुरावे असलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली. मानव तस्करीच्या कारवायांना मदत करण्याच्या कथित भूमिकेसाठी लखनौमध्ये एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासानुसार, फसवणूक करणारी टोळी, भारतीय नागरिक पुरवल्याच्या बदल्यात संबंधित एजंटना पैसे देत असल्याचे उघडकीस आले आहे. 

सीबीआयने  जनतेला सावधगिरी बाळगण्याचे तसेच ओळखीच्या व्यक्ती, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा ऑनलाइन जाहिरातींद्वारे मिळालेल्या फसव्या परदेशी नोकरीच्या प्रस्तावांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. अशा फसव्या योजनांमुळे व्यक्तींना गंभीर शोषणाचा सामना करावा लागू शकतो तसेच कायदा संबंधित परिणामही  भोगावे लागू शकतात.

 

निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर‍

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2258532) अभ्यागत कक्ष : 12
Read this releasein: English