विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जपानच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरण मंत्री आणि अंतराळ धोरण राज्यमंत्री ओनोदा किमी यांनी एका उच्चस्तरीय शिष्टमंडळासह केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांची भेट घेतली


या बैठकीत आरोग्य आणि वैद्यकीय उपकरणे क्षेत्रातील सहकार्य करार आणि क्वांटम सायन्स क्षेत्रातील इरादापत्राची झाली देवाणघेवाण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या वर्षीच्या जपान दौऱ्यानंतर भारत-जपान विज्ञान आणि तंत्रज्ञान भागीदारीने एका नव्या टप्प्यात प्रवेश केला आहे : डॉ.जितेंद्र सिंह

Posted On: 06 MAY 2026 5:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 मे 2026

जपानच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरण मंत्री तसेच  अंतराळ धोरण राज्यमंत्री ओनोदा  किमी यांनी एका उच्चस्तरीय शिष्टमंडळासह, विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) डॉ. जितेंद्र सिंह यांची भेट घेतली. या भेटीत विविध क्षेत्रांमध्ये, विशेषतः आरोग्य आणि वैद्यकीय उपकरणे क्षेत्रात सहकार्याबाबत चर्चा करण्यात आली.

उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चेदरम्यान भारत आणि जपानने उदयोन्मुख आणि महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानावर प्रामुख्याने भर देत  विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रांमधील आपल्या धोरणात्मक भागीदारीला आणखी गती  दिली.

या बैठकीत जपान वैद्यकीय संशोधन आणि विकास संस्था (AMED), भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभाग यांच्यात आरोग्य आणि वैद्यकीय उपकरणे क्षेत्रात सहकार्य कराराची  देवाणघेवाण झाली.

जपानचे कॅबिनेट ऑफिस आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभाग  यांच्यात क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठी एका इरादापत्रावर स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे  पुढील पिढीच्या तंत्रज्ञानामध्ये सहकार्यासाठी नवीन संधी खुल्या झाल्या आहेत.

उपस्थितांना संबोधित करताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले- विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारत आणि जपान यांच्यात एक नैसर्गिक एकतानता आहे. जपानकडे प्रगत तंत्रज्ञान क्षमता आहे, तर भारताकडे मोठ्या संख्येने प्रतिभावान मनुष्यबळ आहे. एकत्रितपणे , आपण अग्रगण्य क्षेत्रांमधील नवोन्मेषाला चालना देऊ शकतो आणि संशोधनाचे रूपांतर प्रभावी सामाजिक उपायांमध्ये करू शकतो.

क्वांटम टेक्नॉलॉजी, सायबर-फिजिकल सिस्टीम्स, इलेक्ट्रिक मोबिलिटी, स्वच्छ ऊर्जा आणि प्रगत संगणन या क्षेत्रांमधील भारताच्या विस्तारित राष्ट्रीय मोहिमा  डीप-टेक क्षेत्रांवर देशात दिला जात असलेला भर दर्शवत असून संयुक्त संशोधन, सह-विकास आणि औद्योगिक भागीदारीसाठी नवीन संधी निर्माण करत  आहेत असे  डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.

या प्रसंगी बोलताना, ओनोदा किमी यांनी भारताच्या वेगवान आर्थिक विकासाची आणि नवोन्मेषाप्रती असलेल्या दृढ वचनबद्धतेची , विशेषतः विविध क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणावर अवलंब केला जात असल्याबद्दल प्रशंसा केली .

ओनादो किमी यांनी अधोरेखित केले की, क्वांटम आणि एआयसह प्रगत उत्पादन आणि संगणकीय तंत्रज्ञानातील जपानची ताकद, भारताच्या विस्तारत असलेल्या तंत्रज्ञान परिसंस्थेला अनुरूप आहे. 

चर्चेदरम्यान, दोन्ही नेत्यांनी  भारताच्या राष्ट्रीय क्वांटम मिशन अंतर्गत सहकार्य अधिक दृढ करण्यावर सविस्तर मते मांडली, जे  क्वांटम कम्प्युटिंग, कम्युनिकेशन, सेन्सिंग आणि मटेरियल्स यांमध्ये एकात्मिक दृष्टिकोनाला चालना देत  आहे, तसेच दूरच्या अंतरावरील क्वांटम सुरक्षित संवाद नेटवर्कमध्येही प्रगती करत आहे.

आरोग्य संशोधन आणि वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, दोन्ही नेत्यांनी संयुक्त संशोधन कार्यक्रम, क्षमता बांधणी आणि संरचित निधी व्यवस्थेद्वारे सहकार्य विस्तारण्यावर चर्चा केली.


निलीमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर‍

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2258424) अभ्यागत कक्ष : 12