श्रम आणि रोजगार मंत्रालय
ब्रिक्सच्या रोजगार कार्यगटाची दुसरी बैठक येत्या 6 मे 2026 रोजी तिरुवनंतपुरम येथे सुरु होणार
Posted On:
05 MAY 2026 6:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मे 2026
भारताच्या ब्रिक्स अध्यक्षता 2026 अंतर्गत रोजगार कार्यगटाची दुसरी बैठक येत्या 6–7 मे 2026 रोजी केरळमधील तिरुवनंतपुरम येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत ब्रिक्स सदस्य राष्ट्रे म्हणजेच ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, इजिप्त, इथिओपिया, इराण, इंडोनेशिया आणि संयुक्त अरब अमिराती येथील कामगार, रोजगार आणि कामगार कल्याण या क्षेत्रांशी संबंधित प्रतिनिधी एकत्र येतील.
रोजगार कार्यगटाची ही दुसरी बैठक पहिल्या बैठकीदरम्यान झालेली चर्चा पुढे नेण्यासाठी आणि भारताच्या अध्यक्षतेखालील प्रस्तावित प्राधान्यक्रम तसेच लक्ष्ये याबाबत सदस्य राष्ट्रांमध्ये अधिक सामंजस्य निर्माण करण्यासाठी एक निश्चित महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून काम करेल. या बैठकीमुळे ब्रिक्स रोजगार कार्यगटासाठी निश्चित केलेल्या चार प्राधान्यक्रमांच्या विषयांवर व्यावहारिक धोरणात्मक दृष्टिकोन, विविध देशांतील अनुभव आणि सहकार्याच्या क्षेत्रांवर सविस्तर चर्चा करणे शक्य होईल, अशी अपेक्षा आहे.
रोजगार कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीदरम्यान होणाऱ्या चर्चेत सामाजिक सुरक्षा प्रणालींमध्ये सुधारणा आणि श्रम बाजारपेठांच्या औपचारिकतेला गती देणे यावर लक्ष केंद्रित केले जाईल. यावेळी सदस्य राष्ट्रे, विविध प्रकारच्या रोजगारांमधील कामगारांना सामाजिक संरक्षण आणि कल्याणकारी लाभ मिळवून देण्यासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, प्रवाही सामाजिक सुरक्षा यंत्रणा आणि आंतरकार्यक्षम डिजिटल उपायांच्या भूमिकेवर विचारविनिमय करतील.
कार्यबलामध्ये महिलांचा सहभाग आणि सर्वसमावेशक विकास हा चर्चेतील एक महत्त्वाचा मुद्दा असेल.
या बैठकीत आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना आणि संयुक्त राष्ट्र निवासी समन्वयक कार्यालय यांसारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय भागीदारांचा सहभाग असेल.
* * *
सुषमा काणे/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2258105)
अभ्यागत कक्ष : 12