विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
तंत्रज्ञानाधारीत नवोन्मेष ही भारताच्या आर्थिक पुनरुत्थानाच्या प्रक्रियेतील गुरुकिल्ली : केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह
विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील खाजगी क्षेत्राच्या सहभागामुळे नवीन संधीची दारे खुली झाली : डॉ.जितेंद्र सिंह
Posted On:
04 MAY 2026 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 मे 2026
गेल्या दशकभरात केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने तंत्रज्ञानाधारीत नवोन्मेषाला मोठी चालना दिली आहे. भारताच्या आर्थिक पुनरुत्थानामागे हीच बाब महत्वाची कारक घटक ठरली असल्याचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. यासोबतच तंत्रज्ञानाधारीत नवोन्मेषाचे योगदान आता केवळ संशोधनापुरते मर्यादित राहीलेले नसून त्याची व्याप्ती उद्योग, स्टार्टअप्स आणि राष्ट्रीय प्रगतीपर्यंत विस्तारली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या सभागृहात विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा 56 वा स्थापना दिन झाला. यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमाला डॉ. जितेंद्र सिंह यांनी संबोधित केले.
आताविज्ञानाचे क्षेत्र प्रयोगशाळांमधून बाहेर पडून बाजारपेठांकडे तसेच कल्पना मांडण्यापासून ते त्यांच्या प्रत्यक्ष प्रभावाच्या दिशेने वळायला हवे असे ते म्हणाले. संशोधन आणि आर्थिक फलनिष्पत्ती यांची सांगड घालणाऱ्या नवीन धोरणात्मक दिशेतून याची प्रचिती येत असल्याचेही त्यांना सांगितले.
गेल्या दशकभराच्या काळात भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात निर्णायक परिवर्तन घडून आले आहे. केंद्र सरकारने अंतराळ आणि अणुऊर्जा यांसारखी क्षेत्रे खाजगी क्षेत्राच्या सहभागासाठी खुली करण्यासारखे धोरणात्मक निर्णय घेत परिवर्तनाच्या या प्रक्रियेला मोठे पाठबळ पुरवले असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा प्रकारच्या उपाययोजनांमुळे स्टार्टअप्स आणि उद्योग क्षेत्रासाठी संधींची नवी दारे खुली झाली आहेत, यामुळे भारताला आपल्याकडील मोठ्या प्रमाणातील मनुष्यबळाचा लाभ घेणे आणि जागतिक नवोन्मेष परिसंस्थेतील आपले स्थान अधिक बळकट करणे शक्य झाले असल्याचे ते म्हणाले.
कोणताही देश उद्योग आणि खाजगी क्षेत्रापासून अलिप्त राहून विज्ञानात प्रगती साध्य करू शकत नसल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. त्यामुळेच सरकार, शैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्रात परस्परांसोबतच्या दृढ सहकार्यपूर्ण भागिदाऱ्या स्थापित व्हायला हव्यात असे आवाहन त्यांनी केले.
विज्ञान क्षेत्राशी संबंधित संस्थांनी सक्रियपणे आपल्या यशाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवायला हवी, तसेच भागधारकांसोबत सातत्यपूर्ण संवाद राखायला हवा असे त्यांनी सांगितले. भागीदारी स्थापित करण्यासह, व्यापक सामाजिक प्रभावाची सुनिश्चित करण्यासाठी दृश्यमानता आणि व्यापक स्वरुपातील प्रचार प्रसार गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. नवोन्मेषकांना प्रोत्साहन देणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच युवा प्रतिभेला स्पष्टता आणि वास्तवाचे भान राखून दिशा दाखवणारी पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित परिसंस्था घडवणेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि संस्थांना आजच्या तंत्रज्ञानाशी संबंधित गरजांना अनुसरून स्वरुप मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या प्रशासकीय सुधारणांचाही त्यांनी उल्लेख केला. याअंतर्गत जुन्या व्यवस्थांची पुनर्रचना आणि निर्णय प्रक्रियेतील अधिक विकेंद्रीतपणा आणण्यासारख्या उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सातत्यपूर्ण सुधारणा, भक्कम संस्थात्मक आराखडा आणि सर्व भागधारकांच्या सक्रिय सहभागामुळे भारताची विज्ञान आणि तंत्रज्ञान परिसंस्था येत्या काळात देशाच्या आर्थिक प्रगतीच्या जडणघडणीला आणि जागतिक नेतृत्व म्हणून भारताची भूमिका बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास डॉ. जितेंद्र सिंह यांनी यावेळी व्यक्त केला.
8CCI.JPG)
TIZA.JPG)
G0V8.JPG)
निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2257928)
अभ्यागत कक्ष : 8