वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय परकीय व्यापार संस्थेने साजरा केला 63 वा स्थापना दिवस

Posted On: 02 MAY 2026 8:54PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 मे 2026

 

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या 'भारतीय परकीय व्यापार संस्थेच्या' (IIFT) 63 व्या स्थापना दिनाचा सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी समाज माध्यमांवरील संदेशातून संस्थेचे अभिनंदन केले. भारताचे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि व्यवस्थापन क्षेत्र घडवण्यात संस्थेने केलेल्या कामगिरीचे त्यांनी कौतुक केले. जागतिक व्यापाराशी संबंधित धोरण आखणी, संशोधन आणि क्षमता बांधणीमध्ये योगदान देणारी एक अग्रगण्य संस्था म्हणून असलेल्या IIFT च्या महत्त्वाच्या भूमिकेवरही गोयल यांनी प्रकाश टाकला.

वाणिज्य मंत्रालय, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी 'आयआयएफटी'चे (IIFT) अभिनंदन करत संस्थेच्या प्रगतीची प्रशंसा केली. उच्च दर्जाचे शिक्षण, संशोधन आणि धोरणात्मक सहभागाच्या माध्यमातून ही संस्था भारताच्या जागतिक व्यापारविषयक महत्त्वाकांक्षांमध्ये सातत्याने योगदान देत असल्याचे त्यांनी नमूद केले. नवी दिल्ली, कोलकाता, काकिनाडा आणि गिफ्ट सिटी (GIFT City) अशा चार संकुलांमधील (कॅम्पस) संस्थेचा विस्तार हा तिचा प्रगत जागतिक दृष्टिकोन आणि गुणवत्तेप्रति असलेली कटिबद्धता दर्शवतो, असे त्यांनी अधोरेखित केले. आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रातील भावी नेतृत्व घडवण्यात IIFT ची भूमिका अत्यंत मोलाची आहे. शैक्षणिक आणि संशोधन व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी, माजी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि नवीन संकुलांचा विस्तार करण्यासाठी संस्थेने अलीकडच्या वर्षांत अनेक महत्त्वाचे उपक्रम हाती घेतले असल्याचेही अग्रवाल यांनी म्हटले आहे.

या कार्यक्रमाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यावेळी IIFT च्या नवीन संकेतस्थळाचे (वेबसाइट) लोकार्पण करण्यात आले. विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक आणि संबंधित घटकांसाठी डिजिटल सहभाग, सुलभता आणि वापरकर्त्यांचा अनुभव अधिक समृद्ध करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

या सोहळ्यात IIFT चे विद्यार्थी असलेले लेफ्टनंट कर्नल त्रिवेदी परागकुमार यांना, आदर्श सेवा आणि गौरवपूर्ण कामगिरीबद्दल 'विशिष्ट सेवा पदक' प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

या उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण देखील करण्यात आले. त्यानंतर संस्थेतील सेवानिवृत्त कर्मचारी आणि 25 वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

 

* * *

शैलेश पाटील/वैभवी जोशी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2257586) अभ्यागत कक्ष : 10