भूविज्ञान मंत्रालय
विशाखापट्टणम येथील आंध्र विद्यापीठात किनारी वातावरणीय संशोधन चाचणी केंद्राच्या (C-ART) मुक्त क्षेत्र वेधशाळेचे उद्घाटन
Posted On:
01 MAY 2026 4:46PM by PIB Mumbai
भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम) या स्वायत्त संस्थेने विशाखापट्टणम येथील आंध्र विद्यापीठात (एयू) किनारी वातावरणीय संशोधन चाचणी केंद्र (सी-आर्ट) स्थापन केले आहे. आंध्र विद्यापीठाने आपल्या कॅम्पसमध्ये एक मुक्त क्षेत्र वेधशाळा उभारण्यासाठी जागा दिली आहे, यामुळे निरंतर आणि एकात्मिक हवामान निरीक्षणे तसेच संशोधन सहकार्य शक्य होणार आहे.
या किनारी वातावरणीय संशोधन चाचणी केंद्राच्या मुक्त क्षेत्र वेधशाळेचे उद्घाटन 1 मे 2026 रोजी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांच्या हस्ते कुलगुरू प्रा. जी. पी. राजा शेखर आणि आयआयटीएमचे संचालक डॉ. सूर्यचंद्र राव यांच्या उपस्थितीत करण्यात आले. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या 'मिशन मौसम' उपक्रमांतर्गत निरीक्षण नेटवर्क मजबूत करणे आणि हवामान अंदाज मॉडेल अधिक सक्षम बनवण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि इतर मान्यवरांनी किनारी वातावरणीय संशोधन चाचणी केंद्रा'बाबतच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन केले. या माहितीपत्रकात संशोधनाची उद्दिष्टे, अंमलबजावणीची रणनीती, संस्थात्मक सहकार्य, प्रगत हवामानशास्त्रीय उपकरणे आणि प्रादेशिक परिणाम यांची रूपरेषा दिली आहे. तसेच, विशाखापट्टणम येथील किनारी वातावरणीय संशोधन चाचणी केंद्रा'बाबतचा एक लघुपटही प्रदर्शित करण्यात आला.
या चाचणी केंद्रातील पहिल्या निरीक्षणांची नोंद करण्यासाठी, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव, आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू आणि आयआयटीएमचे संचालक यांच्या हस्ते एक हवामानशास्त्रीय बलून प्रक्षेपित करण्यात आला. या ठिकाणी इम्पॅक्ट डिसड्रोमीटर, 2-डायमेन्शनल व्हिडिओ डिसड्रोमीटर (2DVD), 3डी प्रिंटेड ऑटोमॅटिक वेदर स्टेशन (3D-PAWS), कन्व्हेक्शनल एडब्ल्यूएस आणि एडी कोव्हेरियन्स टॉवर यांसारखी आधुनिक उपकरणे देखील स्थापित करण्यात आली आहेत. या उपकरणांनी विशाखापट्टणममध्ये आज नोंदवलेल्या पहिल्या मेघगर्जनेसह पावसाच्या सरींची माहिती संकलित केली. या उपकरणांमुळे पावसाच्या थेंबांचा आकार, रचना, पावसाची सूक्ष्मभौतिकी, प्रक्षोभ प्रवाहांचे, वाऱ्याच्या माहितीचे उच्च-रिझोल्यूशन निरीक्षण करणे शक्य होईल. यामुळे प्रक्रिया अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि संख्यात्मक हवामान मॉडेल्स अधिक अचूक बनवण्यासाठी मदत होणार आहे.
भविष्यात या चाचणी केंद्रात स्कॅनिंग विंड लिडार, पोलॅरिमेट्रिक क्लाउड आणि प्रेसिपिटेशन डॉप्लर रडार, फेज ॲरे रडार, प्रोटॉन ट्रान्सफर रिॲक्शन मास स्पेक्ट्रोमीटर यासारखी प्रगत उपकरणे बसवण्यात येणार आहेत. ही उपकरणे आपल्याला केवळ वातावरण अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करणार नाहीत, तर सुधारित अचूकतेसह अति वेगवान हवामान बदलांचा अंदाज वर्तवण्यासही मदत करतील.
हे किनारी वातावरणीय संशोधन चाचणी केंद्र एक राष्ट्रीय संशोधन सुविधा म्हणून काम करेल. मान्सून संवहन प्रक्रियेचे सखोल विश्लेषण, हवामान अंदाज मॉडेल्स मधील परिमिती सुधारणा, डेटा समाकलन प्रयोग आणि मॉडेल मूल्यांकन यासाठी आवश्यक निरीक्षणे उपलब्ध करून दिली जातील. यामुळे चक्रीवादळे आणि अति वेगवान हवामान बदलांची पूर्वसूचना प्रणाली अधिक सक्षम होऊन आपत्ती व्यवस्थापनाला मोठी मदत होईल.



***
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2257368)
अभ्यागत कक्ष : 7