संरक्षण मंत्रालय
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने प्रोजेक्ट-17ए अंतर्गत चौथी स्टेल्थ फ्रिगेट ‘महेंद्रगिरी’ भारतीय नौदलाकडे केली सुपूर्द
Posted On:
30 APR 2026 10:18PM by PIB Mumbai
मुंबई, 30 एप्रिल 2026
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने (एमडीएल) प्रोजेक्ट-17A अंतर्गत चौथी स्टेल्थ फ्रिगेट ‘महेंद्रगिरी’ 30 एप्रिल 2026 रोजी भारतीय नौदलाला सुपूर्द केली आहे. ती नंतर आयएनएस महेंद्रगिरी म्हणून सेवेत दाखल केले जाईल.
एमडीएलचे संचालक आणि भारतीय नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एमडीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, कॅप्टन जगमोहन (निवृत्त) आणि पूर्व नौदल कमांडचे मुख्य स्टाफ ऑफिसर (तांत्रिक), रिअर ॲडमिरल गौतम मारवाहा, व्हीएसएम यांनी एमडीएल येथे स्वीकृती दस्तऐवजावर स्वाक्षऱ्या केल्या.
महेंद्रगिरीची सुपुर्दगी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे कारण एमडीएलमध्ये बांधण्यात येत असलेल्या प्रोजेक्ट-17A वर्गातील हे अंतिम जहाज आहे. यातून भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांअंतर्गत स्वदेशी युद्धनौकांच्या रचना आणि बांधणीमधील भारताची वाढती क्षमता अधोरेखित होते.
या प्रसंगी बोलताना एमडीएलचे सीएमडी, कॅप्टन जगमोहन (निवृत्त) म्हणाले की, ही सुपुर्दगी म्हणजे भारताच्या जहाजबांधणी प्रवासातील एक अभिमानास्पद क्षण असून ती एमडीएल, वॉरशिप डिझाइन ब्युरो, वॉरशिप ओव्हरसीइंग टीम (मुंबई) आणि भारतीय नौदलाच्या विविध शाखांचे सामूहिक अथक प्रयत्न आणि समन्वय दर्शवते.
त्यांनी अधोरेखित केले की महेंद्रगिरी ही अत्याधुनिक लढाऊ क्षमतांनी सुसज्ज असलेली एक प्रगत युद्धनौका असून ती भारताच्या स्वदेशी संरक्षण निर्मिती सामर्थ्याचे सशक्त प्रतीक आहे. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, ही नौका नवोन्मेष, लवचिकता आणि आत्मनिर्भरतेचा वारसा जपत देशाची उत्कृष्ट सेवा करेल.
या युद्धनौकेमुळे भारतीय नौदलाच्या परिचालन क्षमतेत लक्षणीय वाढ होण्याची आणि भारताची सागरी सुरक्षा रचना मजबूत करण्यास हातभार लागण्याची अपेक्षा आहे.


* * *
पीआयबी मुंबई | सोनाली काकडे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2257156)
अभ्यागत कक्ष : 19