भूविज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताने 2014 पासून आपल्या डॉप्लर हवामान रडार यंत्रणेत लक्षणीय वाढ केली, याचे कार्यरत युनिट्स 14 वरुन 50 पर्यंत वाढले असून, ही 250% पेक्षा अधिक वाढ आहे: डॉ जितेंद्र सिंह


या नव्या डॉप्लर रडारने, देशाच्या 87% भूभागावर व्याप्ती वाढली असून, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंतर्गत, चक्रीवादळे, मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह वादळांचे अधिक अचूक अंदाज वर्तवणे शक्य ; मिशन मौसमअंतर्गत आणखी 50 डॉप्लर हवामान रडार उभारण्याची योजना

Posted On: 29 APR 2026 7:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 एप्रिल 2026

 

भारताने 2014 पासून आपल्या डॉप्लर हवामान रडारचे जाळे वाढवण्यासाठी सुनियोजित प्रयत्न करत, त्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढवली आहे, आधी 14 रडारची संख्या आता 50 पर्यंत पोहोचली असून त्यात 250% पेक्षा अधिक वाढ झाली आहे. ह्या वाढीमुळे, देशाच्या 87% पर्यंत व्याप्ती वाढली असून, त्यामुळे, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंतर्गत, चक्रीवादळे, मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह वादळांचे अधिक अचूक अंदाज वर्तवणे शक्य झाले आहे. तसेच मिशन मौसमअंतर्गत आणखी 50 डॉप्लर हवामान रडार उभारण्याची योजना आहे, अशी माहिती, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच पृथ्वीविज्ञान मंत्री, डॉ जितेंद्र सिंह यांनी दिली. नवी दिल्लीत लोधी पार्क इथल्या  भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मुख्यालयात आज सेल्फी पॉइंटचे उद्घाटन केल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. 

गेल्या दशकभरात, भारताच्या हवामान विषयक सेवांमध्ये लक्षणीय परिवर्तन झाले आहे. असे जितेंद्र सिंह म्हणाले. एकेकाळी हवामान अंदाजांविषयी अविश्वास आणि संशय व्यक्त केला जात असे; परंतु आज ही यंत्रणा अत्यंत विश्वासार्ह आणि अचूक अंदाज वर्तवणारी ठरली आहे, ज्याचा लाभ शेतकरी, गृहिणी, वैमानिक आणि कार्यक्रमांचे आयोजन करणारे अशा विविध स्तरांतील लोक घेत आहेत, असेही सिंह यांनी सांगितले.

घराबाहेर पडण्यापूर्वी लोक आता नियमितपणे आपल्या मोबाईल फोनवर हवामानाचा अंदाज बघतात, यातून भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या सेवांबाबत वाढलेला विश्वास आणि त्यांची सर्वदूर व्याप्तीही स्पष्ट होते, असे डॉ. सिंह यांनी सांगितले. 

   

हवामानाचे अंदाज वर्तवण्यात, येत असलेल्या आधुनिकतेचा संदर्भ देत, जितेंद्र सिंह यांनी, न्यू कास्ट सेवांचा उल्लेख केला. या सेवा, पुढच्या तीन तासांसाठीचे, अत्यंत स्थानिक पातळीवरील हवामानाचे अंदाज, अत्यंत अचूकतेने वर्तवतात, असे त्यांनी सांगितले. अशी वास्तविक वेळेतील (रियल टाइम) माहिती, आपत्ती प्रतिसाद-निवारण, नागरी नियोजन आणि दैनंदिन निर्णय प्रक्रियेसाठी अत्यंत महत्वाची ठरते, असे त्यांनी सांगितले.  भारताची हवामानविषयक अंदाज क्षमता आता अशा टप्प्यावर पोहोचली आहे जिथे,  पावसाची तीव्रता, पर्जन्याचा प्रकार, गारपीट होण्याची शक्यता आणि अगदी पावसाच्या थेंबांचा आकार याबाबतही सविस्तर माहिती देता येऊ शकेल, असेही जितेंद्र सिंह म्हणाले. 

यावेळी, डॉ. सिंह यांनी, डॉप्लर हवामान रडार तंत्रज्ञानाचे, भारताच्या हवामान देखरेख यंत्रणेतील महत्त्व समजावून सांगितले.

ही यंत्रणा विस्तारत असल्यामुळे, मोठ्या अंतरावरील वातावरणाचे सातत्याने निरीक्षण करणे शक्य झाले असून, चक्रीवादळे, मेघगर्जनेसह वादळे, मुसळधार पाऊस आणि इतर तीव्र हवामान विषयक घटनांसाठी लवकर इशारे देण्यास मदत मिळते आहे. तसेच, विमान वाहतूक सुरक्षितता, कृषी नियोजन आणि आपत्तीची जोखीम कमी करण्यामध्येही ही यंत्रणा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

* * *

शैलेश पाटील/राधिका अघोर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2256746) अभ्यागत कक्ष : 11