रसायने व पेट्रोकेमिकल विभाग
रसायन आणि पेट्रोकेमिकल्स क्षेत्राच्या विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी घेतली उद्योग क्षेत्रातील धुरिणांसमवेत बैठक
प्रविष्टि तिथि:
23 APR 2026 10:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 एप्रिल 2026
केंद्रीय रसायन आणि खते मंत्री जे. पी. नड्डा यांनी आज नवी दिल्लीतील कर्तव्य भवन येथे भारतीय रसायन आणि पेट्रोकेमिकल्स उद्योगातील धुरिणांसमवेत बैठक घेतली. रसायन आणि पेट्रोकेमिकल्स क्षेत्रासाठी धोरणात्मक आराखड्यावर विचारविनिमय करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. विकासाला गती देण्यासाठी आणि 'विकसित भारत 2047' या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी योगदान देण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना आखण्यावर या चर्चेत भर देण्यात आला.

या बैठकीत सध्याच्या पश्चिम आशिया संकटावर चर्चा झाली, तसेच बाह्य धोके कमी करण्यासाठी क्षेत्राची लवचिकता वाढवणे आणि पर्यायी पुरवठा साखळी विकसित करण्यावर भर देण्यात आला. या चर्चेदरम्यान जागतिक रसायन आणि पेट्रोकेमिकल्स मूल्य साखळीमध्ये भारताचे स्थान मजबूत करण्याच्या धोरणांवरही चर्चा झाली.
उद्योग क्षेत्राच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त करताना नड्डा यांनी 'आत्मनिर्भर भारता'चे ध्येय साध्य करण्यासाठी सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. अनुचित व्यापारी प्रथांना आळा घालण्यासाठी योग्य व्यापारी उपाययोजनांचा विचार केला जाईल, असेही त्यांनी सूचित केले.

सध्याच्या पश्चिम आशिया संकटाच्या पार्श्वभूमीवर, या क्षेत्राच्या वाढीस चालना देण्यासाठी आणि त्याला अधिक सक्षम बनवण्यासाठी नड्डा यांनी उद्योगाकडून सूचना मागवल्या. सरकार उद्योगासोबत सातत्याने खांद्याला खांदा लावून काम करत राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.
या बैठकीत रसायन आणि पेट्रोकेमिकल्स विभागाचे सचिव तेजवीर सिंग तसेच विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पेट्रोकेमिकल्स, पॉलिमर्स यांसारख्या विविध उप-क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणारे सुमारे 25 मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष आणि उद्योगपती या चर्चेत सहभागी झाले होते.

रसायन आणि पेट्रोकेमिकल्स क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेत अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. हे क्षेत्र कृषी, औषधनिर्माण, न्यूट्रास्युटिकल्स, वाहन उद्योग, बांधकाम, सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या अनेक उद्योगांचा कणा म्हणून काम करते.
* * *
निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2255049)
आगंतुक पटल : 38