संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

बर्लिन इथे जर्मनीच्या संसदेला संबोधित करतांना,संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत-जर्मनी यांच्यात संरक्षण उद्योग भागीदारी वाढवण्यावर दिला भर

Posted On: 21 APR 2026 10:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 एप्रिल 2026

“आत्मनिर्भर भारत, हे केवळ खरेदीचे अभियान नाही, तर ते सहनिर्मिती, सह-विकास आणि सह-नवोन्मेषाचे निमंत्रण आहे,” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. आपल्या जर्मनी दौऱ्यात त्यांनी आज (21 एप्रिल 2026) बर्लिन इथे, जर्मनीच्या संसदेला संबोधित करतांना, भारत आणि जर्मनी यांच्यातील संरक्षण उद्योग व्यवस्थेचा विस्तार करण्यासाठीच्या सहकार्यावर भर दिला. आपल्या तीन दिवसांच्या जर्मनी दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी, जर्मन संसदेच्या संरक्षण आणि सुरक्षाविषयक स्थायी समितीसमोर सांगितले  की, जगसमोर आज रोज सुरक्षाविषयक नवनवी आव्हाने उभी राहत आहेत, त्यात तंत्रज्ञानविषयक परिवर्तनाने, परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची आणि परस्परांशी संलग्न झाली आहे. अशावेळी, ह्या बदलत्या वातावरणाला स्वीकारणारा, आत्मसात करणारा नवा दृष्टिकोन, ही काळाची गरज झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, भारतात आज संरक्षण क्षेत्रात अभूतपूर्व परिवर्तन घडत आहे, असे अधोरेखित करत, अशा स्थितीत, भारत जर्मनी यांच्यातील उद्योगक्षेत्रात वाढती भागीदारी, परस्परांसाठी लाभदायक ठरू शकेल. असे राजनाथ सिंह म्हणाले. “उद्योगक्षेत्रात अग्रणी असलेल्या जर्मनीची या क्षेत्रातली ताकद आम्ही जाणतो.  अत्याधुनिक आणि अद्ययावत तंत्रज्ञानात, जर्मनीतील, मित्तलस्टँड (लघु आणि मध्यम उद्योग) चा उत्साह आणि गतिमानता, याचेही आम्हाला कौतुक आहे.  भारतातही आमचे स्टार्ट-अप्स आणि उद्यमशील खाजगी कंपन्या अत्यंत वेगाने आपल्या मोठ्या संरक्षण उद्योगांच्या क्षमतांना बळकटी देत असून त्यांना पूरक ठरत आहेत. त्यामुळे, या क्षेत्रात भारत आणि जर्मनी एकमेकांना नैसर्गिकरित्या पूरक ठरतात आणि आपली भागीदारी आणखी सखोल होऊ शकते,” असे राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.

आधुनिक काळात, जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी परस्पर समन्वय राखून प्रतिसाद आणि विश्वासार्ह धोरणात्मक भागीदारीची गरज असल्याचे राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चान्सलर  फ्रेडरिक मर्ज यांनीही या धोरणात्मक भागीदारीला पुढे नेण्यावर विशेष भर दिला आहे. युरोपीय महासंघातही, भारतासोबत सहकार्य वाढवण्याला गती देण्याची भावना दिसून येते, यात, भारत-युरोपीय महासंघ यांच्यातल्या संरक्षण आणि  धोरणात्मक भागीदारीचाही समावेश आहे,” असे त्यांनी पुढे सांगितले.

भारत आणि जर्मनी हे केवळ धोरणात्मक भागीदार नाहीत, तर वर्तमानकालीन जागतिक चर्चेला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रभावी आवाजही आहेत, याचा संरक्षणमंत्र्यांनी पुनरुच्चार केला. "आपण सामायिक मूल्यांनी जोडलेल्या प्रस्थापित लोकशाही आहोत आणि लवचिकता, नवोन्मेष व दृढ औद्योगिक वृत्तीने प्रेरित गतिमान अर्थव्यवस्था आहोत. कायदेनिर्माते आणि समितीचे सन्माननीय  सदस्य म्हणून तुमचे  मार्गदर्शन, विचार आणि पाठिंबा आपल्या संरक्षण व धोरणात्मक सहकार्याच्या भविष्यातील वाटचालीला अधिक बळकट आणि समृद्ध करू शकेल. जेव्हा या युगाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा भारत-जर्मनी भागीदारी हे मुत्सद्देगिरीचे एक आदर्श उदाहरण म्हणून उभे राहील; ही भागीदारी कोणत्याही संकटाच्या प्रतिसादादाखल नव्हे, तर या वाटेवरून एकत्र चालण्याचा निर्णय घेणाऱ्या दोन परिपक्व लोकशाही देशांच्या अखंड निर्धारातून साकारली गेली आहे," असे त्यांनी नमूद केले.

सध्याच्या भूराजकीय अस्थिरता  केवळ क्षेत्रीय बाब म्हणून पाहिल्या जाऊ शकत नाही, याकडे राजनाथ सिंह यांनी लक्ष वेधले. याचे परिणाम जागतिक स्वरूपाचे असल्याचे त्यांनी सांगितले. या घडामोडी  स्थानिक अशांतता म्हणून मर्यादित नसून ऊर्जा सुरक्षा, अन्न सुरक्षा आणि जागतिक आर्थिक स्थिरतेवर दूरगामी परिणाम करणाऱ्या असल्याचे, त्यांनी सांगितले. शिवाय या घटनांमुळे होणाऱ्या मोठ्या मनुष्यहानीकडे त्यांनी लक्ष वेधले. "आपल्या ऊर्जा आवश्यकतांसाठी मोठ्या प्रमाणावर पश्चिम आशियावर अवलंबून असलेल्या भारतासारख्या विकसनशील देशांसाठी होर्मूझच्या सामुद्रधुनीतले संकट अलिप्त घटना नाही, तर आमच्या सुरक्षा आणि आर्थिक स्थैर्यावर थेट परिणाम करणारे  कठोर वास्तव आहे," असे त्यांनी सांगितले.

या आव्हानांचा आणि त्यांच्या थेट परिणामांचा विचार करता, भारताने एक सक्रिय आणि समन्वित रणनीती स्वीकारली आहे, या बाबीवर संरक्षणमंत्र्यांनी प्रकाश टाकला. पश्चिम आशियाविषयक मंत्रिगट,सातत्याने बदलणाऱ्या परिस्थितीचे मूल्यमापन सातत्याने करत आहे  आणि त्याचे दुष्परिणाम कमी करण्याकरिता वेळोवेळी उपाययोजनांची शिफारस करत आहे, अशी माहिती संरक्षणमंत्र्यांनी तिथल्या लोकप्रतिनिधींना दिली. लोकप्रतिनिधींसोबतच्या संवादासाठी, संसद सदस्य आणि समितीचे अध्यक्ष थॉमस रोवेकॅम्प यांनी राजनाथ सिंह यांचे स्वागत केले. तत्पूर्वी, संरक्षणमंत्र्यांनी बर्लिन येथील हम्बोल्ट विद्यापीठाच्या आवारात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली आणि भारत व जर्मनी यांच्यातील चिरस्थायी सांस्कृतिक आणि बौद्धिक संबंध अधोरेखित केले.


सुषमा काणे/राधिका अघोर/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर‍

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2254353) अभ्यागत कक्ष : 21