गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'जीवन रक्षा पदक' पुरस्कार मालिकेसाठी (वर्ष 2026) ऑनलाइन नामांकन प्रक्रिया सुरू

प्रविष्टि तिथि: 20 APR 2026 8:05PM by PIB Mumbai

गोवा, 20 एप्रिल 2026

 

गृह मंत्रालयाने आर्थिक वर्ष 2026 साठी 'जीवन रक्षा पदक' पुरस्कार मालिकेसाठी शिफारशी मागवल्या आहेत. बुडणे, अपघात, आगीच्या घटना, विजेचा धक्का बसणे, दरडी कोसळणे, प्राण्यांचे हल्ले आणि खाणींमधील बचाव कार्य यांसारख्या घटनांमध्ये एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी केलेल्या मानवी स्वरूपाच्या उल्लेखनीय कार्याबद्दल हे पुरस्कार प्रदान केले जातात. हे पुरस्कार तीन श्रेणींमध्ये दिले जातात:

  1. सर्वोत्तम जीवन रक्षा पदक: बचावकर्त्याच्या स्वतःच्या जीवाला अतिशय मोठा धोका असतानाही, त्या व्यक्तीने दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी दाखवलेल्या अतुलनीय साहस आणि धैर्याबद्दल दिले जाते.
  2. उत्तम जीवन रक्षा पदक: बचावकर्त्याच्या स्वतःच्या जीवाला मोठा धोका असताना, दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी दाखवलेले शौर्य आणि तत्परतेबद्दल दिले जाते.
  3. जीवन रक्षा पदक: एखाद्याचा जीव वाचवताना बचावकर्त्याला स्वतःला गंभीर शारीरिक इजा झाली असतानाही त्याने दाखवलेले धैर्य आणि तत्परतेबद्दल दिले जाते.

पात्रता आणि निवड प्रक्रिया: जीवनाच्या सर्व क्षेत्रातील व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र आहेत. सशस्त्र दले, पोलीस दल आणि मान्यताप्राप्त अग्निशमन दलाचे कर्मचारी देखील यासाठी पात्र आहेत. विशेष म्हणजे, "पंतप्रधान जीवन रक्षक पोलीस पदक" आता "जीवन रक्षा पदक" या पुरस्कारामध्ये विलीन करण्यात आले आहे; त्यामुळे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल/ केंद्रीय पोलीस संस्था (CPO) आणि इतर पोलीस दलांचे कर्मचारीही आता या पुरस्कारासाठी पात्र आहेत. हा पुरस्कार मरणोत्तर देखील प्रदान केला जातो.

दरवर्षी राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश प्रशासन, भारत सरकारची मंत्रालये/विभाग आणि इतर प्राधिकरणांकडून या पुरस्कारांसाठी शिफारशी मागवल्या जातात. या शिफारशींची छाननी एका उच्चस्तरीय 'पुरस्कार समिती'मार्फत केली जाते, जी आपले अहवाल पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना सादर करते. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर, विजेत्यांना पदक आणि प्रमाणपत्रासह आर्थिक भत्ता प्रदान केला जातो.

नामांकनासाठी महत्त्वाच्या अटी:

  • कालमर्यादा: पुरस्कार समिती केवळ अशाच शिफारसींचा विचार करते, ज्यामध्ये शौर्याची घटना घडल्यापासून दोन वर्षांच्या आत नामांकन सादर केले असेल. त्यामुळे, आर्थिक वर्ष 2026 साठी, एक  ऑक्टोबर 2024 पूर्वी घडलेल्या घटनांच्या शिफारशी पाठवू नयेत.
  • अर्ज प्रक्रिया: शिफारशी केवळ राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल (https://www.awards.gov.in) या ऑनलाइन माध्यमाद्वारेच पाठवता येतील.
  • तपशील: ऑनलाइन अर्जामध्ये एक प्रशस्तीपत्र (कमाल 250 शब्द) असणे आवश्यक आहे. यामध्ये बचावकर्त्याने दाखवलेले धैर्य, त्यातील जोखीम आणि घटनेचा क्रम यांचा योग्य क्रमाने उल्लेख असावा.
  • कागदपत्रे: शिफारस करणाऱ्या प्राधिकरणाने स्वाक्षरी केलेले आणि शिक्का मारलेले 'चारित्र्य आणि पूर्वेतिहास पडताळणी प्रमाणपत्र' स्कॅन करून अपलोड करणे अनिवार्य आहे. संबंधित व्यक्तीचे नाव हिंदीमध्ये लिहिण्यासाठी गुगल ट्रान्सलेटरचा वापर करता येईल.
  • अंतिम मुदत: 2026 च्या पुरस्कारांसाठी शिफारसी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत पाठवणे आवश्यक आहे.

एखाद्या प्राधिकरणाकडे 'यूजर आयडी'  किंवा 'पासवर्ड' नसल्यास ते त्यांच्या अधिकृत सरकारी ईमेल आयडीवरून sopub[at]nic[dot]in वर ईमेल करून हे तपशील मिळवू शकतात. संबंधित प्राधिकरणांना विनंती करण्यात येते की, त्यांनी शौर्य गाजवणाऱ्या पात्र व्यक्तींची नामांकने वेळेत पाठवावीत, जेणेकरून त्यांच्या सेवेची योग्य दखल घेता येईल.

 

* * *

पीआयबी मुंबई | राधिका अघोर/शैलेश पाटील/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2253939) आगंतुक पटल : 54
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English