संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय नौदलाचे आयओएस सागर जहाज थायलंडमधील फुकेत इथून रवाना

Posted On: 19 APR 2026 1:06PM by PIB Mumbai

 

भारतीय महासागरीय जहाज (आयओएस) सागर - आयएनएस सुनयना हे जहाज तीन दिवसांची रसद आणि कार्यान्वयन विषयक प्रक्रिया (Operational Turnaround) पूर्ण करून 17 एप्रिल 2026 रोजी थायलंडमधील फुकेत इथून रवाना झाले आहे. आपल्या विद्यमान तैनातीदरम्यानची या जहाजाची ही दुसरी बंदर भेट होती. ही प्रक्रिया पूर्णत्वाला गेल्याने जहाजाच्या या दुसऱ्या बंदर भेट मोहिमेची यशस्वी सांगता झाली आहे.

आपल्या फुकेत भेटीदरम्यान, आयओएस सागर या जहाजाने रॉयल थाई नेव्ही या थायलंडच्या नौदलासोबत व्यावसायिक, धोरणात्मक आणि सांस्कृतिक पातळीवरील अनेक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. यामुळे परस्पर द्विपक्षीय नौदल सहकार्याला अधिक बळकटी मिळाली आहे. आयएनएस सुनयनाचे कमांडिंग ऑफिसर कमांडर सिद्धार्थ चौधरी यांनी रॉयल थाई नेव्हीच्या थर्ड नेव्हल एरिया कमांडचे चीफ ऑफ स्टाफ रिअर ॲडमिरल सथापॉन वाजारत यांची भेट घेऊन, सागरी सहकार्याबद्दलची परस्पर सामायिक वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली. 

या भेटीदरम्यान एका मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्याचे तसेच संयुक्त योगाभ्यास उपक्रमाचेही आयोजन केले गेले. यात आयओएस सागर आणि रॉयल थाई नेव्हीच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यामुळे व्यावसायिक पातळीसह वैय्यक्तिक पातळीवरील परस्पर संबंधांनाही अधिक बळकटी मिळाली. या निमीत्ताने जहाजावर एक औपचारिक स्वागत समारंभही आयोजित केला गेला. या समारंभाला नौदलाचे वरिष्ठ नौदल अधिकारी उपस्थित होते. या समारंभाच्या निमीत्ताने आयओएस सागर मोहिमेबद्दल माहिती सामायिक करण्यासोबतच, सागरी सहकार्य आणि प्रादेशिक सुरक्षेशी संबंधित मुद्यांवर चर्चा करण्यासाठीचे एक व्यासपीठ उपलब्ध झाले होते. यासोबतच दोन्ही देशांमधील नागरिकांमधील परस्पर संपर्काला चालना देण्यासाठी हे जहाज अभ्यागतांच्या भेटीसाठीही खुले ठेवले गेले होते.

या भेटीदरम्यान आयओएस सागर आणि रॉयल थाई नेव्हीच्या एचटीएमएस क्लॉन्गयाई (HTMS Klongyai) या जहाजांच्या संयुक्त नौदल सरावाचेही (PASSEX - Passage Exercise) आयोजन करण्यात आले. या सरावादरम्यान दोन्ही दलांनी परस्पर समन्वयित कार्यान्वयीन क्षमतांसंबंधीची प्रात्यक्षिके सादर केली. यात संपर्कविषयक प्रात्यक्षिक सराव तसेच व्यूहरचना आखणी सराव अशा उपक्रमांचा समावेश होता. यातून दोन्ही नौदलांमधील सुरळीत समन्वय तसेच मोहिमांसाठीच्या सज्जतेविषयीची (Plug-and-play) क्षमता अधोरेखित झाली. आयओएस सागरच्या या भेटीतून, भारताने मांडलेल्या महासागर (MAHASAGAR - Mutual and Holistic Advancement for Security and Growth Across Regions) या दृष्टीकोनाशी सुसंगत असलेली भारत आणि थायलंडमधील मजबूत आणि चिरंतन सागरी भागीदारी ठळकपणे अधोरेखित झाली.

आग्नेय हिंद महासागरीय क्षेत्रासोबतचे सागरी सहकार्य बळकटी देण्याच्या आपल्या मोहिमेचा पुढचा टप्पा म्हणून आयओएस सागर आता, आपल्या पुढच्या बंदर भेटीकरता इंडोनेशियातील जकार्ताच्या दिशने रवाना झाली आहे.

***

यश राणे / तुषार पवार/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2253530) अभ्यागत कक्ष : 26