कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
नागरी सेवा परीक्षा 2025 मध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास एक तृतीयांश महिला आहेत; नवीन भारत महानगरांच्या पलीकडे व्यापक सहभागाचा साक्षीदार होत आहे : डॉ जितेंद्र सिंह
Posted On:
18 APR 2026 5:13PM by PIB Mumbai
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज नागरी सेवा परीक्षांमधील महिलांच्या वाढत्या सहभागाला अधोरेखित करताना सांगितले की या प्रमाणाने आता 31 टक्क्यांचा टप्पा पार केला आहे आणि एकूण यशस्वी विद्यार्थ्यांपैकी एक तृतीयांश इतके प्रमाण गाठण्याकडे सातत्यपूर्ण वाटचाल करत आहे. या परिवर्तनातून गेल्या दशकभरात तंत्रज्ञान, पारदर्शकता आणि सर्वांना समान संधींची सर्वदूर पोहोचलेली व्यापकता ठळकपणे दिसून येते, असे ते म्हणाले.
शेअर इंडिया स्माईल फाऊंडेशन ने आपल्या "मिशन आयएएस" उपक्रमाअंतर्गत आयोजित केलेल्या नागरी सेवा परीक्षा 2025 यशस्वीरीत्या उत्तीर्ण केलेल्या गुणवंतांच्या सत्कार सोहळ्यात डॉ. जितेंद्र सिंह बोलत होते. नागरी सेवांमधील बदलती लिंगभाव संरचना हे भारताच्या विकसित होत असलेल्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीच्या सर्वात उत्साहवर्धक निर्देशकांपैकी एक आहे. एक दशकापूर्वी यशस्वी विद्यार्थ्यांमधील मुलींचे प्रमाण 20 टक्के असे, तेच प्रमाण आता 30 टक्क्यांच्या पलीकडे पोहोचले असून यातून महत्त्वपूर्ण परिवर्तनाचा संकेत दिसून येतो, असे ते म्हणाले.
सीएसई 2025च्या अलीकडील आकडेवारीनुसार, शिफारस केलेल्या 958 उमेदवारांपैकी 299 महिला आहेत, जे एकूण संख्येच्या 31% पेक्षा अधिक आहे. ही सातत्यपूर्ण वाढ म्हणजे युवतींमधील वाढत्या महत्त्वाकांक्षेसोबत विविध प्रदेशांमध्ये आणि सामाजिक स्तरांमध्ये साधनसंपत्ती, माहिती आणि संधींची सुलभ उपलब्धता देखील दर्शवते.
नागरी सेवा या आता केवळ काही प्रतिष्ठित समाजापुरत्या किंवा ठराविक भौगोलिक क्षेत्रापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. उमेदवार आता वैविध्यपूर्ण पार्श्वभूमीतून विशेषतः दुर्गम आणि वंचित प्रदेशांमधून येतात, त्यापैकी बऱ्याच जणांना पारंपरिक प्रशिक्षणाचे पाठबळ देखील मिळत नाही. डिजिटल व्यासपीठांचा विस्तार, माहितीची उपलब्धता आणि स्वयं-अध्ययनासाठी आवश्यक उपकरणे यामुळे पारंपरिक प्रणालीवरील अवलंबित्त्व कमी झाले आहे, असे ते म्हणाले.

यशस्वी उमेदवारांचे अभिनंदन करताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की ते 2047 च्या दिशेने सुरु असलेल्या विकसित भारताच्या प्रवासात ते अगदी निर्णायक टप्प्यावर प्रवेश करत आहेत. सिंह यांनी सर्वांना वचनबद्धता, नम्रता आणि सेवेच्या भावनेने योगदान देण्याचे आवाहन केले.



***
माधुरी पांगे/भक्ती सोनटक्के/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2253372)
अभ्यागत कक्ष : 10