अर्थ मंत्रालय
भारतीय रिझर्व बँकेकडून वर्धा इथे विशेष एमएसएमई कार्यशाळा आणि टाऊनहॉल बैठकीचे आयोजन
Posted On:
17 APR 2026 6:27PM by PIB Mumbai
भारतीय रिझर्व बँकेच्या नागपूर शाखेने, एमएसएमई क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा विशिष्ट, विदर्भ विशिष्ट प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती. त्यासोबतच, वर्ध्यात आज एक टाऊनहॉल बैठकही आयोजित करण्यात आली होती. यातून, एमएसएमसी विकास आणि आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देण्यात आले.

यावेळी वर्धा जिल्ह्यातल्या 200 पेक्षा अधिक एमएसएमई आणि उदयोन्मुख उद्योजकांनी सहभाग घेतला. ही अशा मालिकेतील, चौथी व्हीएसटीईएम कार्यशाळा होती, याआधी, गडचिरोली, नागपूर आणि यवतमाळ मध्ये, अशा कार्यशाळा घेण्यात आल्या होत्या, ज्यातून उद्योजकांना कर्ज आणि पतपुरवठ्याची माहिती आणि संस्थात्मक पाठबळ मिळण्यास मदत मिळाली.

रिझर्व बँकेच्या नागपूर शाखेचे प्रादेशिक संचालक, सचिन वाय शेंडे यांनी या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान भूषवले. तर, आरबीआय उपमहाव्यवस्थापक अंजना श्यामनाथ, यांच्यासह प्रमुख बँका, नाबार्ड आणि जिल्हा उद्योग केंद्र, राज्य सरकार तसेच प्रमुख जिल्हा व्यवस्थापक (वर्धा) या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी, एमएसएमईला मिळणाऱ्या पतपुरवठ्याबाबत माहिती देण्यासाठी, बँकांनी स्टॉल्सही लावले होते.

उपस्थितांना संबोधित करताना शेंडे यांनी क्षमता विकास आणि उद्योजकांना औपचारिक आर्थिक व्यवस्थेत समाविष्ट करण्यावर भर दिला. त्यांनी गांधीवादी परंपरेवर आधारित वर्धा इथल्या हातमाग क्षेत्रातील मोठ्या संधींचा, विशेषत: मूल्यवर्धित कापड, पर्यावरणपूरक वस्त्रनिर्मिती आणि डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रांमध्ये असलेल्या संधींचा उल्लेख आपल्या भाषणात केला. तर, अंजना श्यामनाथ यांनी या उपक्रमाचा उद्देश, स्थानिक उद्योजकांना सक्षम बनवणे आणि जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणे असल्याचे सांगितले.

या कार्यशाळेत उद्यम नोंदणी, जीएसटी प्रक्रिया, नोंदी ठेवण्याची पद्धत आणि पीएमईजीपी, सीएमईजीपी, मुद्रा, सीजीटीएमएसई आणि पीएम विश्वकर्मा यांसारख्या महत्त्वाच्या शासकीय योजनांबाबत माहिती देण्यात आली. तसेच, बाजारपेठेतील प्रवेश वाढवण्यासाठी जीईएम प्लॅटफॉर्मची माहिती देणारी सत्रेही घेण्यात आली.
सहभागींसोबत झालेल्या चर्चेनंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
ठळक वैशिष्ट्ये :
· स्थानिक अर्थव्यवस्थेनुसार तयार केलेली जिल्हानिहाय रचना
· पतपुरवठा साक्षरता आणि बँकेकडून कर्ज मिळू शकतील अशा प्रकल्पांवर लक्ष.
· थेट संवाद – आरबीआय, इतर बँका आणि अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संवादाची संधी
· महत्त्वाच्या बाबींवर भर – GST, उद्यम, GeM आणि आर्थिक साक्षरता यांवर विशेष लक्ष
***
नीलिमा चितळे/सुवर्णा बेडेकर/राधिका अघोर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2253173)
अभ्यागत कक्ष : 24