संरक्षण मंत्रालय
भारत–उझबेकिस्तान संयुक्त लष्करी सराव ‘दुस्तलिक’साठी भारतीय सैन्य तुकडी रवाना
Posted On:
12 APR 2026 5:07PM by PIB Mumbai
भारतीय सैन्याची तुकडी आज भारत–उझबेकिस्तान संयुक्त लष्करी सराव ‘दुस्तलिक’च्या 7व्या आवृत्तीसाठी रवाना झाली. हा सराव 12 ते 25 एप्रिल 2026 दरम्यान उझबेकिस्तानमधील नामंगन येथील गुरुमसराय फील्ड ट्रेनिंग एरिया येथे आयोजित करण्यात येणार आहे. ‘दुस्तलिक’ हा दरवर्षी भारत आणि उझबेकिस्तानमध्ये आळीपाळीने आयोजित केला जाणारा सराव असून मागील आवृत्ती एप्रिल 2025 मध्ये पुणे (औंध) येथील फॉरेन ट्रेनिंग नोड येथे झाली होती.
भारतीय तुकडीत एकूण 60 जवानांचा समावेश असून त्यात भारतीय लष्करातील 45 जवान (बहुतांश महार रेजिमेंटच्या एका बटालियनमधील) आणि भारतीय वायुदलातील 15 जवानांचा समावेश आहे. उझबेकिस्तानच्या तुकडीतही सुमारे 60 जवान असून तेथील लष्कर आणि वायुदलातील सैनिक सहभागी होणार आहेत.
या सरावाचा उद्देश लष्करी सहकार्य वाढविणे आणि अर्ध-पर्वतीय भागात संयुक्त मोहिमांसाठी एकत्रित क्षमता विकसित करणे हा आहे. यामध्ये उच्च शारीरिक तंदुरुस्ती, संयुक्त नियोजन, सामूहिक सामरिक सराव आणि विशेष शस्त्र कौशल्यांचे प्रशिक्षण यांवर भर दिला जाणार आहे. तसेच दोन्ही देशांच्या कमांड-अँड-कंट्रोल संरचनांमध्ये संयुक्त कारवायांच्या नियोजन व अंमलबजावणीसाठी एकसंध कार्यपद्धती विकसित करण्यावरही लक्ष केंद्रित केले जाईल.
‘दुस्तलिक’ सरावाद्वारे दोन्ही देशांना संयुक्त कारवायांतील रणनिती, तंत्र आणि कार्यपद्धती यांबाबत अनुभवांची देवाणघेवाण करता येईल. यामुळे परस्पर समन्वय, कार्यक्षमता आणि संयुक्त नेतृत्व प्रणाली अधिक मजबूत होईल.
हा सराव दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आणि परस्पर समज वाढविण्यास हातभार लावेल. तसेच संरक्षण सहकार्याला चालना देत भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील.

***
सुषमा काणे/गजेंद्र देवडा/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2251351)
अभ्यागत कक्ष : 13