शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयआयएम मुंबईच्या पहिल्या एमबीए तुकडीच्या 505 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान


आत्मविश्वास, उद्देश आणि सकारात्मक बदल घडवण्याच्या वचनबद्धतेसह पुढे जा: आशिष कुमार चौहान

Posted On: 11 APR 2026 8:27PM by PIB Mumbai

 

मुंबईतली भारतीय व्यवस्थापन संस्था अर्थात आयआयएमच्या पहिल्या एमबीए तुकडीचा (2026) पदवीदान समारंभ आज संस्थेच्या कॅम्पसमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाला राष्ट्रीय शेअर बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान, आयआयएम मुंबईचे संचालक प्रा. मनोज तिवारी आणि आयायएम मुंबईचे अध्यक्ष तसेच ऑलकार्गो ग्रुपचे संस्थापक शशीकिरण शेट्टी उपस्थित होते. जनरल एमबीए, ऑपरेशन्स अँड लॉजिस्टिक आणि सस्टेनेबिलिटी मॅनेजमेंट यांसारख्या विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाचा यावेळी गौरव करण्यात आला.

2026 मध्ये संस्थेला अधिकृतपणे आयआयएमचा दर्जा मिळाल्यानंतर, यावर्षी आयआयएम मुंबईतून एकूण 505 विद्यार्थी पदवीधर झाले. यामध्ये जनरल एमबीए अभ्यासक्रमाचे 300 विद्यार्थी, ऑपरेशन्स अँड सप्लाय चेन मॅनेजमेंटचे 177 आणि सस्टेनेबिलिटी मॅनेजमेंटच्या 28 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबतच, 'लॉजिस्टिक अँड ऑपरेशन्स एक्सलन्स थ्रू डिजिटायझेशन' या विषयातला एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह अभ्यासक्रम 39 विद्यार्थ्यांनी, तर दुसरा एक्झिक्युटिव्ह अभ्यासक्रम 26 विद्यार्थ्यांनी पूर्ण केला आणि 7 विद्यार्थ्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.

आशिषकुमार चौहान यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, त्यांचे यश हे त्यांच्या कठोर परिश्रमाचे आणि समर्पणाचे प्रतिबिंब आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या कारकिर्दीत पुढे जाताना परिस्थितीशी जुळवून घेत राहण्याचा, स्पष्ट विचार करण्याचा आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा सल्ला दिला. भारताचे भविष्य घडवण्यात त्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेवरही त्यांनी प्रकाश टाकला.

आपल्याला पहिल्या एमबीए तुकडीचा अभिमान असून हे विद्यार्थी विविध क्षेत्रांवर सकारात्मक प्रभाव पाडतील, असा विश्वास प्राध्यापक मनोज तिवारी यांनी व्यक्त केला.

ही संस्था भविष्यातील नेते घडवण्यासाठी कटिबद्ध आहे आणि जागतिक दर्जाची संस्था बनण्यासाठी अधिक विस्तार करण्याची आमची योजना आहे असे शशीकिरण शेट्टी यांनी या प्रसंगी सांगितले.

हा समारंभ आयायएम मुंबईसाठी एका अभिमानास्पद शुभारंभाचे प्रतीक ठरला असून, इथून पहिले एमबीए पदवीधर ज्ञान, कौशल्ये आणि जबाबदारीच्या प्रबळ भावनेने भविष्य घडवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

***

राधिका अघोर/निखिलेश चित्रे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2251204) अभ्यागत कक्ष : 13
Read this releasein: English