पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गोव्यामध्ये इंधन आणि एलपीजी पुरवठा स्थिर, टंचाईच्या भीतीने खरेदी न करण्याचे नागरिकांना आवाहन

Posted On: 10 APR 2026 12:24PM by PIB Mumbai

 

गोव्यातील पेट्रोल, डिझेल आणि लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) ची उपलब्धता सध्याची मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेशी असल्याची पुष्टी राज्यातील तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) केली आहे.

या संदर्भात आज, 10 एप्रिल रोजी प्रकाशित केलेल्या प्रसिद्धी पत्रकात, सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांचे राज्यस्तरीय समन्वयक  मधुरेंद्र के. पांडे यांनी ही माहिती दिली आहे.  या कंपन्या पुरवठ्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि लॉजिस्टिक्स सुरळीत करण्यासाठी आणि  वितरणाला गती देण्यासाठी पावले उचलण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण राज्यात इंधन पुरवठा अखंडित सुरू आहे. पुरवठ्यातील स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनासोबत समन्वय सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी वितरणाला प्राधान्य दिले आहे. सिलिंडरचे वितरण नियोजित वेळापत्रकानुसार सुरू आहे. सध्या, उद्योग स्तरावर गोव्यात दररोज सुमारे 10,600 घरगुती एलपीजी सिलिंडर वितरित केले जातात. हे प्रमाण अलीकडील भू-राजकीय घडामोडींपूर्वी नोंदवलेल्या वितरण पातळीशी सुसंगत असून सध्याची गरज पूर्ण करणारे आहे. ग्राहकांना एसएमएस, मिस्ड कॉल किंवा IVRS प्लॅटफॉर्मद्वारे एलपीजी सिलिंडर नोंदवण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. इच्छित लाभार्थ्यांनाच वितरण सुनिश्चित करण्यासाठी 'डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड' (DAC) वापरण्याचा सल्ला देण्यात येत आहे,” असेही त्यांनी सांगितले.

केंद्र आणि राज्य सरकार स्वयंपाकाच्या इंधनाचा पर्याय म्हणून 'पाईप्ड नॅचरल गॅस' (PNG) ला प्रोत्साहन देत आहेत. पणजी, मडगाव आणि फोंडा येथे पीएनजी सेवा उपलब्ध आहे. ग्राहक 'गोवा नॅचरल गॅस प्रायव्हेट लिमिटेड' (उत्तर गोवा) आणि 'इंडियन ऑईल अदानी गॅस प्रायव्हेट लिमिटेड' (दक्षिण गोवा) यांच्या ऑनलाइन पोर्टलद्वारे नोंदणी करू शकतात.

प्रसिद्धी पत्रकानुसार, स्थलांतरित कामगार आणि स्थानिक पत्त्याचा पुरावा नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी, वैध सरकारी फोटो ओळखपत्र आणि एक घोषणापत्र सादर केल्यावर अधिकृत वितरकांकडे 5 किलोचे 'फ्री ट्रेड एलपीजी' (FTL) सिलिंडर उपलब्ध आहेत.

पुरवठ्याचे अनुपालन आणि सातत्य सुनिश्चित करण्यासाठी तेल विपणन कंपन्यांकडून एलपीजी वितरकांकडे तपासणी केली जात आहे. साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन बाजारपेठेत तपासणी आणि अंमलबजावणी मोहीम राबवत आहे. आतापर्यंत गोव्यातील जिल्हा प्रशासनाने 305 छापे टाकले असून अनियमितता आढळलेल्या प्रकरणांमध्ये कारवाई केली आहे,” अशी माहिती पांडे यांनी दिली.

संपूर्ण गोव्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा अखंडित सुरू आहे. मागणीची पातळी पुरवठा आणि वितरण क्षमतेनुसारच आहे. मागणीत झालेली तात्पुरती वाढ लॉजिस्टिक प्लॅनिंग आणि वेळेवर साठा भरून काढण्याद्वारे हाताळली गेली आहे. नागरिकांनी टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा टंचाईच्या भीतीने खरेदी करू नये, असे आवाहन त्यांनी प्रसिद्धी पत्रकात केले आहे.

***

नेहा कुलकर्णी / शैलेश पाटील/परशुराम कोर

Follow us on social media: PIBPanaji    /pibpanaji  pibgoa[at]gmail[dot]com  /PIBPanaji    /pibpanaji


(Release ID: 2250757) अभ्यागत कक्ष : 24
Read this releasein: English