संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एस्केल ए सेते 2026 मधील यशस्वी सहभागानंतर, आयएनएस सुदर्शिनी परतीच्या प्रवासासाठी फ्रांसहून रवाना

Posted On: 08 APR 2026 7:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 एप्रिल 2026

आयएनएस सुदर्शिनी हे भारतीय नौदलाचे खलाशी प्रशिक्षण जहाज, सात एप्रिल 2026 रोजी, फ्रांसच्या सेते या बंदराहून मायदेशी परतण्यासाठी रवाना झाले आहे. फ्रांसच्या प्रतिष्ठित अशा एस्केल ए सेते मध्ये यशस्वी सहभाग घेतल्यानंतर या जहाजाचा परतीचा प्रवास सुरू झाला. हा द्विवार्षिक उत्सव, भूमध्य समुद्रातील एक महत्वाचा उत्सव मानला जात असून, त्यात जागतिक सागरी सफरीचा इतिहास साजरा केला जातो. भारताच्या आयएनएस सुदर्शिनी या जहाजाने, यात सक्रिय सहभाग घेत, मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय नौकांच्या बरोबरीने, सागरी सफारी आणि इतर कवायतीमध्ये सहभाग घेतला. त्याशिवाय, जहाजावरच्या कर्मचाऱ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम, सागरी कार्यशाळा आणि खेळांसारख्या इतर उपक्रमातही सहभाग नोंदवला.

त्यासोबतच, फ्रेंच नौदलाच्या 400 व्या स्थापना दिनानिमित्त झालेल्या हेरिटेज सिटी परेड मध्ये ही भारतीय नौदलाची  तुकडी सहभागी झाली हे विशेष ! सेते च्या ऐतिहासिक रस्त्यांवरून पथसंचलन करत, या तुकडीने, फ्रांसमध्ये भारतीय नौदलाची शिस्त, एकता आणि उत्सवी स्वरुप यांचे प्रदर्शन करत, देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवला.

आपल्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवत, सुदर्शिनी रोइंग संघाने ज्यूक्स मेरिटाईम मध्ये कांस्यपदक जिंकले. या उत्सवाचा समारोप भव्य पथसंचलनाने (Grande Parade de Départ)  झाला. या सोहळ्यात जहाजाने आपले सेल्स उघडत नेत्रदीपक दृश्य साकारले.

बंदरातील मुक्कामादरम्यान जहाज सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले होते आणि हजारो अभ्यागतांनी भेट देऊन जहाजाचे कार्य आणि क्षमता जाणून घेतली. या उत्साही प्रतिसादामुळे, भारत आणि फ्रान्स यांच्यातील मजबूत सांस्कृतिक संबंध आणि वाढती सागरी मैत्री अधोरेखित झाली. एफएस इतोईल (FS Étoile) आणि आयटीएस कोरसरो ITS Corsaro यांच्या कर्मचाऱ्यांसह संयुक्त योग सत्रही आयोजित करण्यात आले, ज्यातून आरोग्य, समन्वय आणि सर्वांगीण कल्याणासाठीची समान बांधिलकी व्यक्त झाली.

यावेळी, फ्रान्समधील भारताचे राजदूत संजीव सिंगला यांनी जहाजावर औपचारिक स्वागत समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमाला विविध देशांतील मान्यवर आणि प्रतिनिधी उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी दोन्ही देशांच्या नौदलांमधील मजबूत परंपरा आणि वाढत्या सागरी सहकार्यावर भर दिला.

तिथून निघाल्यावर, आयएनएस सुदर्शिनी आता कॅसाब्लांका कडे मार्गस्थ झाली असून, लोकायन 26 या अभियानाअंतर्गत,  सागरी संबंध अधिक बळकट करण्याचे तिचे ध्येय पुढे सुरूच राहणार आहे.

सुषमा काणे/राधिका अघोर/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2250249) अभ्यागत कक्ष : 14