आदिवासी विकास मंत्रालय
'भारत ट्राइब्स फेस्ट 2026' भव्य समारोप कार्यक्रमाने संपन्न; उत्कृष्ट आदिवासी कारागीर आणि विक्रेत्यांचा गौरव
प्रविष्टि तिथि:
05 APR 2026 7:00PM by PIB Mumbai
आदिवासी व्यवहार मंत्रालयाचा, ट्रायफेडच्या सहयोगाने आयोजित प्रमुख उपक्रम भारत ट्राइब्स फेस्ट 2026चा आज दिल्लीत सुंदर नर्सरी येथे भव्य कार्यक्रमाने समारोप झाला. आदिवासी संस्कृती, हस्तकला आणि उद्योजकता यांचा 19 दिवसांचा हा उत्सव एका उत्तुंग उंचीवर पोहोचला.
समारोपप्रसंगी, मातीकाम, वेत आणि बांबू, दागिने, खाद्यपदार्थ, भेटवस्तू आणि विविध वस्तू, धातूकाम, नैसर्गिक उत्पादने, चित्रकला, वस्त्रोद्योग आणि वन धन विकास केंद्रे आदीं दहा विविध श्रेणीतील उत्कृष्ट आदिवासी कारागीर आणि विक्रेते यांना गौरवण्यात आले. ट्रायफेडचे व्यवस्थापकीय संचालक, आयपीएस एम, राजमुरूगन आणि आदिवासी व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव अनंत प्रकाश पांडे यांच्या हस्ते आणि इतर मान्यवर आणि भागधारकांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या महोत्सवामुळे आदिवासी कारागीर, बचत गट, वन धन विकास केंद्रे आणि उद्योजकांना सर्वसमावेश व्यासपीठ मिळाले आहे, या व्यासपीठामुळे, त्यांना थेट बाजार पेठ उपलब्ध झाली आणि शाश्वत उपजीविकेला चालना मिळाली.
या महोत्सवाची महत्त्वाची वैशिष्ट्ये:
- 200 हून अधिक दालनांमधून आदिवासी कला, हातमाग आणि नैसर्गिक उत्पादनांचे प्रदर्शन.
- 300 हून अधिक आदिवासी कारागीर आणि शिल्पकारांचा सहभाग.
- 75 वन धन केंद्रांचे प्रतिनिधित्व.
- 17 दालनांतून हस्तकलांचे लाईव्ह प्रात्यक्षिक.
- 120 हून अधिक आदिवासी बल्लवाचार्यांचा सहभाग असलेली 30हून अधिक आदिवासी खाद्य पदार्थांची दालने.
प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना आदिवासी कला, वस्त्रे, दागिने, वन उत्पादने आणि अस्सल आदिवासी खाद्यपदार्थांचा अप्रतिम अनुभव घेता आला. या महोत्सवातील महत्त्वाच्या आकर्षणामध्ये, आधुनिक आदिवासी डिझाइन्सना प्रोत्साहन देणारे रिसा (RISA )पॅव्हेलियन, बाजारपेठेशी थेट जोडणारे बीटीएफ बाजार आणि खाद्यप्रेमींसाठीचे विशाल आदिवासी फूड कोर्ट. यांचा समावेश होता.
18 मार्च 2006 रोजी रिसा ब्रँडचे लोकार्पण हे या महोत्सवाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट होते. आधुनिक आणि जागतिक बाजारपेठेत आदिवासी हस्तकलेला एक विशिष्ट स्थान मिळवून देण्याच्या दिशेने उचललेल्या महत्त्वपूर्ण पावलांपैकी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले.
या प्रदर्शनाला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला; यामध्ये 1.50 लाख अभ्यागतांनी भेट दिली आणि कोट्यवधी रुपयांची विक्री झाली, त्यावरून आदिवासी उत्पादनांना मिळणारी वाढती पसंती आणि मागणी दिसून येते.
भारत ट्राईब्स फेस्ट 2026 च्या यशस्वी समारोपातून आदिवासी सक्षमीकरण, व्होकल फॉर लोकल संकल्पनेचा प्रचार आणि सर्वसमावेशक आर्थिक विकास यांविषयीची सरकारच्या कटिबद्धता अधोरेखित होते.
***
सुषमा काणे/विजयालक्ष्मी साळवी साने/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2249187)
आगंतुक पटल : 78