अर्थ मंत्रालय
डीजीटीएस, मुंबई प्रादेशिक युनिटकडून “जीएसटी आणि करदात्यांच्या तक्रार निवारण यंत्रणा” विषयावर परिसंवाद-सह-वेबिनारचे आयोजन
Posted On:
04 APR 2026 10:14PM by PIB Mumbai
मुंबई, 4 एप्रिल 2026
केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिपत्याखालील करदाता सेवा महासंचालनालय (डीजीटीएस), मुंबई प्रादेशिक युनिटने आर्थिक वर्ष 2026–27 ची सुरुवात “जीएसटी आणि करदात्यांच्या तक्रार निवारण यंत्रणा” या विषयावरील परिसंवाद-सह-वेबिनारद्वारे केली. हा कार्यक्रम जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भगुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालय, न्यू पनवेल आणि सी. के. ठाकूर ए.सी.एस. महाविद्यालय, न्यू पनवेल यांच्या सहकार्याने आज (4 एप्रिल 2026) हायब्रिड पद्धतीने आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना, उदयोन्मुख कायदे व्यावसायिकांना आणि कर व कायदा क्षेत्रातील भावी तज्ज्ञांना जीएसटीचे मूलभूत संकल्पना आणि तक्रार निवारण यंत्रणा यांची माहिती करून देणे हा होता.
कार्यक्रमाला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गाडदे, बीसीटी विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सनावी देशमुख आणि सी. के. ठाकूर ए.सी.एस. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) एस. के. पाटील उपस्थित होते. प्रत्यक्ष आणि आभासी माध्यमातून विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी आणि विविध घटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
डीजीटीएस, मुंबई प्रादेशिक युनिटचे प्रधान अतिरिक्त महासंचालक सुमित कुमार यांनी मार्गदर्शन करताना करदात्यांमध्ये जागरूकता वाढविण्याचे महत्त्व, तक्रार निवारण यंत्रणांची भूमिका आणि डीजीटीएसद्वारे शिक्षण व जनजागृती उपक्रमांद्वारे कर प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करण्याचे कार्य अधोरेखित केले. त्यांनी शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक ज्ञानवृद्धीसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व स्पष्ट केले.

परिसंवादात जीएसटीच्या तरतुदी सुलभ पद्धतीने समजावून सांगण्यात आल्या तसेच करदात्यांच्या तक्रार निवारण प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दैनंदिन आर्थिक व्यवहारांमध्ये जीएसटीचे महत्त्व तसेच कायदा, वाणिज्य आणि कर क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी त्याची वाढती उपयुक्तता यावर भर देण्यात आला. अप्रत्यक्ष कर क्षेत्रातील करिअर संधी—जसे की वादविवाद (लिटिगेशन), सल्लागार सेवा, अनुपालन आणि सल्लामसलत—यांचाही आढावा घेण्यात आला.
तांत्रिक सत्राचे मार्गदर्शन सीजीएसटी, मुंबईचे उपआयुक्त दीपक माटा यांनी केले. त्यांनी सीमाशुल्क आणि जीएसटी प्रशासनातील जवळपास 3 दशकांचा अनुभव शेअर करत जीएसटी तरतुदी, तक्रार निवारण यंत्रणा आणि अनुपालनाच्या व्यावहारिक पैलूंवर सखोल माहिती दिली. त्यांच्या ज्ञानप्रसारातील योगदानामध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू), ई-लर्निंग मॉड्यूल्स आणि प्रशिक्षण साहित्याची निर्मिती यांचा विशेष उल्लेख करण्यात आला.
हा कार्यक्रम करदात्यांपर्यंत पोहोच वाढविण्याच्या डीजीटीएसच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रतीक असून शैक्षणिक सहकार्याद्वारे जागरूकता निर्माण करण्यास महत्त्वपूर्ण ठरत आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आणि संबंधित घटकांना कर प्रणालीची माहिती मिळून स्वेच्छेने करपालनाची संस्कृती बळकट होते.

करदाता सेवा महासंचालनालय (डीजीटीएस) बद्दल
डीजीटीएस हे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (सीबीआयसी) अंतर्गत कार्यरत विशेष प्रभाग असून करदात्यांमध्ये जागरूकता वाढविणे, भागधारकांशी संवाद साधणे आणि तक्रार निवारण यंत्रणा प्रभावीपणे राबविणे यासाठी जबाबदार आहे. तसेच माध्यम व जनसंपर्क, करदात्यांचे प्रतिनिधित्व आणि शैक्षणिक व जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन हेही डीजीटीएसचे महत्त्वाचे कार्य आहे.
आर्थिक वर्ष 2025–26 मध्ये डीजीटीएसच्या मुंबई प्रादेशिक युनिटने 44 परिसंवाद/वेबिनार/हायब्रिड कार्यक्रम आणि 18 परस्परसंवादी सत्रांचे आयोजन करत एकूण 62 जनजागृती उपक्रम यशस्वीपणे राबविले.
संपर्कासाठी
नागरिकांना अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क प्रक्रियेविषयी प्रश्न, सूचना किंवा तक्रारी पुढील माध्यमांद्वारे नोंदविता येतील:
- ट्विटर (X): @dgtpsmumbaicbic
- ईमेल: mzu-dgtps[at]gov[dot]in
- यूट्यूब: @dgtsmumbaizonalunit2363
- दूरध्वनी: 022-20832086
प्राप्त सर्व संदेशांची गोपनीयता राखून त्यावर त्वरित, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने कार्यवाही केली जाईल, असे डीजीटीएस, मुंबई प्रादेशिक युनिटने स्पष्ट केले आहे.
* * *
पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/गजेंद्र देवडा/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2249057)
अभ्यागत कक्ष : 17