संरक्षण मंत्रालय
सीएसएल कोचीद्वारे निर्मित ‘मालवण’ ही दुसरी पाणबुडीविरोधी उथळ-पाणी युद्धनौका नौदलाकडे सुपूर्द
Posted On:
31 MAR 2026 6:36PM by PIB Mumbai
एएसडब्ल्यू एसडब्ल्यूसी मालिकेतील ‘मालवण’ ही दुसरी युद्धनौका 31 मार्च 2026 रोजी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. ही युद्धनौका सीएसएल कोचीद्वारे भारतीय नौदलाच्या निकषांनुसार आणि डीएनव्हीच्या वर्गीकरण नियमावलीस अनुसरून, पूर्णपणे स्वदेशी बनावटीची म्हणून आरेखित करून बांधली गेली आहे.
‘मालवण’ हे नाव महाराष्ट्रातील किनारपट्टीवरील ऐतिहासिक शहर असलेल्या ‘मालवण’वरून घेण्यात आले आहे. हा प्रदेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली सागरी वारशाशी अविभाज्यपणे जोडलेला आहे. ही युद्धनौका पूर्वीच्या ‘आय एन एस मालवण’ या भारतीय नौदलाच्या सुरुंगनाशक जहाजाचा वारसाही पुढे चालवते; हे जुने जहाज 2003 पर्यंत सेवेत होते. अशा प्रकारे, प्रतिष्ठित युद्धनौकांची नावे जतन करण्याची नौदलाची परंपरा या जहाजाद्वारे अखंडपणे सुरू ठेवली गेली आहे.
ही युद्धनौका पाण्याखाली पाळत ठेवणे, किनारपट्टीजवळील पाण्यात पाणबुडीविरोधी युद्धमोहिमा (एएसडब्ल्यू), कमी तीव्रतेच्या सागरी कारवाया (लिमो) आणि सुरुंग युद्धक्षमता यांसाठी सुसज्ज आहे. सुमारे 80 मीटर लांबी आणि 1,100 टन विस्थापन क्षमता असलेल्या या ‘वॉटरजेट’ प्रणोदित एएसडब्ल्यू एसडब्ल्यूसी युद्धनौकांवर टॉर्पेडो, बहुउद्देशीय पाणबुडीविरोधी रॉकेट्स आणि प्रगत रडार व सोनार प्रणालींसह अत्याधुनिक सेन्सर्स बसवण्यात आले आहेत.
80 टक्क्यांहून अधिक स्वदेशी घटकांचा समावेश असलेली ‘मालवण’ ही युद्धनौका स्वदेशी युद्धनौका बांधणीच्या क्षेत्रातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे; तसेच ती भारत सरकारचा ‘आत्मनिर्भर भारत’ हा दृष्टिकोन पुन्हा एकदा अधोरेखित करते. ही युद्धनौका अशी उपकरणे आणि प्रणाली अभिमानाने वाहून नेते, ज्यांची निर्मिती आणि एकत्रीकरण देशांतर्गत संरक्षण उत्पादन क्षेत्रातील उद्योगांनी केले आहे, यामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा समावेश आहे.
HBHC.JPG)
G3XO.JPG)
BFSY.JPG)
(3)S9S8.jpeg)
***
माधुरी पांगे/नंदिनी मथुरे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2247394)
अभ्यागत कक्ष : 17