वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
कॅमेरूनची राजधानी याउंडे इथे सुरू असलेल्या जागतिक व्यापार संघटनेच्या मंत्रिस्तरीय परिषदे दरम्यान, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांची ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री पीटर जे. काईल यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक
Posted On:
29 MAR 2026 9:18PM by PIB Mumbai
कॅमेरूनची राजधानी याउंडे इथे आयोजित जागतिक व्यापार संघटनेच्या 14 व्या मंत्रिस्तरीय परिषदेच्या निमित्ताने केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी ब्रिटनचे व्यवसाय आणि व्यापार विषयक परराष्ट्र मंत्री पीटर जे. काईल यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही बाजूंनी 14 व्या मंत्रिस्तरीय परिषदेच्या कार्यसूचीवर विचारविनिमय केला; तसेच, जुलै 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान कीएर स्टार्मर यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आलेल्या 'भारत-ब्रिटन व्यापक आर्थिक भागीदारी कराराच्या अंमलबजावणीतील प्रगतीचा आढावा घेतला. दोन्ही मंत्र्यांनी द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक सहकार्य अधिक बळकट करण्याच्या विविध पर्यायांवरही चर्चा केली.
भारताने 'भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करारासाठी आवश्यक असलेल्या सर्व अंतर्गत मंजुऱ्या आणि प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत, अशी माहिती 'भारत-ब्रिटन व्यापक आर्थिक भागीदारी कराराच्या अंमलबजावणीबाबत बोलताना गोयल यांनी दिली. ब्रिटनने देखील 'भारत-ब्रिटन व्यापक आर्थिक भागीदारी करारासाठी आवश्यक असलेली संसदीय मंजुरी प्रक्रिया पूर्ण केली आहे, असे काईल यांनी सांगितले. दोन्ही बाजूंनी, परस्पर सहमतीने निश्चित केलेल्या कालमर्यादेनुसार, 'भारत-ब्रिटन व्यापक आर्थिक भागीदारी कराराची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
संबंधित भागधारकांकडून 'भारत-ब्रिटन सीईटीए’चा लाभ देशभरातील उद्योग व्यवसायांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनजागृती आणि संपर्क कार्यक्रम राबवण्याचे महत्त्व कोयल यांनी अधोरेखित केले. या संदर्भात काईल यांनी देखील स्कॉटलंड आणि मँचेस्टरसह विविध भागात व्यावसायिक शिष्टमंडळांचे आयोजन करण्याच्या आणि प्रादेशिक स्तरावर प्रचार-प्रसार उपक्रम राबवण्याच्या योजनांची माहिती दिली.
द्विपक्षीय व्यापारी संबंध अधिक दृढ करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून गोयल यांनी ब्रिटनमधील व्यवसायांना भारतातील विविध क्षेत्रे आणि प्रदेशांमध्ये, विशेषतः ग्रामीण परिवर्तनाशी संबंधित उपक्रमांमध्ये गुंतवणूक आणि भागीदारीच्या संधी शोधण्याचे निमंत्रण दिले.
***
राधिका अघोर/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2246709)
अभ्यागत कक्ष : 16