अणुऊर्जा विभाग
azadi ka amrit mahotsav

एसीटीआरईसी, टाटा मेमोरियल सेंटरतर्फे खारघर येथे निवासी संकुलाचा भूमिपूजन समारंभ संपन्न


784 विद्यार्थी आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांसाठी नवीन 12-मजली निवासी इमारत उभारली जाणार

Posted On: 26 MAR 2026 7:48PM by PIB Mumbai

मुंबई, 26 मार्च 2026

 

'टाटा मेमोरियल सेंटर' (टीएमसी) ची एक प्रमुख घटक संस्था 'अ‍ॅडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर' (एसीटीआरईसी) - यांनी आज खारघर येथील आपल्या परिसरात विद्यार्थी, डॉक्टर, संशोधक आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांसाठी एका नवीन निवासी सुविधेचा भूमिपूजन समारंभ आयोजित केला. हा प्रकल्प 'हरीश आणि बिना शाह फाउंडेशन'च्या सहकार्याने उभारला जात आहे.

प्रस्तावित 12 मजली (तळघरासह) निवासी इमारतीत 352 वसतिगृह खोल्या  आणि 16 दोन बेडरूम सदनिका असतील, ज्यामध्ये सुमारे 784 रहिवाशांची राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. या सुविधेमध्ये बहुउद्देशीय भोजन कक्ष, व्यायामशाळा, योग कक्ष आणि 'हीलिंग गार्डन' संकल्पनेवर आधारित नव्याने रचना केलेल्या विरंगुळा क्षेत्राचाही समावेश असेल.

देशभरातून कर्करोगविषयक शिक्षण आणि विशेष प्रशिक्षणासाठी एसीटीआरईसी मध्ये येणाऱ्या विद्यार्थी आणि प्रशिक्षणार्थींना हे निवासी संकुल अत्यंत पोषक वातावरण प्रदान करेल, असे या कार्यक्रमात बोलताना एसीटीआरईसी चे संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी म्हणाले. यामुळे कर्करोग उपचार क्षेत्रात कुशल व्यावसायिक घडवण्याच्या संस्थेच्या कटिबद्धतेला आणखी बळ मिळेल, असे त्यांनी सांगितले. टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी यात भर घालत सांगितले की, कर्करोग तज्ञांची भावी पिढी घडवण्यासाठी एक पूरक शैक्षणिक आणि संशोधन वातावरण असणे अत्यावश्यक आहे. या सुविधेच्या विकासामुळे एसीटीआरईसी मधील निवासी पायाभूत सुविधा अधिक बळकट होतील; तसेच कर्करोग उपचारांचे प्रगत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी, संशोधक आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांना मोठा आधार मिळेल.

एसीटीआरईसी चे उपसंचालक (नैदानिक सेवा), डॉ. नवीन खत्री यांनी नमूद केले की, एसीटीआरईसी हे अत्याधुनिक कर्करोग संशोधन आणि प्रशिक्षणाचे एक प्रमुख केंद्र म्हणून सातत्याने विकसित होत आहे. या अतिरिक्त निवासी सुविधांमुळे वाढत्या प्रशिक्षण कार्यक्रमांना आधार मिळेल तसेच शैक्षणिक समुदायाला या सुविधेचा मोठा लाभ होईल, हे त्यांनी अधोरेखित केले. आरोग्यसेवेविषयीच्या चर्चांमध्ये अनेकदा रुग्णालये आणि तंत्रज्ञानावरच अधिक लक्ष केंद्रित केले जाते; परंतु या संपूर्ण यंत्रणांना कार्यरत ठेवणाऱ्या डॉक्टर, संशोधक आणि विद्यार्थ्यांकडे मात्र तुलनेने कमी लक्ष दिले जाते, असे 'हरीश आणि बिना शाह फाउंडेशन'चे अध्यक्ष हरीश शाह यांनी सांगितले. ही निवासी इमारत उभारणे हा फाउंडेशनचा केवळ 'कामात' गुंतवणूक करण्याचा नव्हे, तर त्या कामामागे असलेल्या 'माणसांमध्ये' गुंतवणूक करण्याचा एक प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.

खारघर येथे स्थित एसीटीआरईसी हे 500 खाटांची क्षमता असलेले, अत्याधुनिक कर्करोग उपचार आणि संशोधन केंद्र आहे. येथे दरवर्षी सुमारे 10,000 नवीन रुग्णांची नोंद होते. आगामी वर्षांमध्ये या केंद्राचा आणखी विस्तार करण्याची योजना आहे. हे केंद्र अणुऊर्जा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या आणि 'अभिमत विद्यापीठ' दर्जा प्राप्त असलेल्या 'होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट'च्या अधिपत्याखाली, एक अग्रगण्य प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र म्हणून कार्यरत आहे. कर्करोग उपचारांची गुणवत्ता ही भावी तज्ञांच्या प्रशिक्षण वातावरणाशी थेट संबंधित असते, ही बाब ओळखून; कर्करोगशास्त्र क्षेत्रातील मानवी संसाधने बळकट करण्यासाठी उचललेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. संपूर्ण भारतात आरोग्यसेवा पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या कार्यात, 'हरीश आणि बिना शाह फाउंडेशन' हे दीर्घकाळापासून एक विश्वासार्ह भागीदार म्हणून कार्यरत आहे. हा प्रकल्प केवळ भौतिक सुविधांमध्येच नाही तर संस्था आणि व्यक्तींना उत्कृष्टतेकडे नेणाऱ्या संपूर्ण परिसंस्थेत गुंतवणूक करण्याच्या व्यापक दृष्टिकोनाचे प्रतिक आहे. 

'टाटा मेमोरियल सेंटर' विषयी 

'टाटा मेमोरियल सेंटर' (टीएमसी) ही कर्करोग उपचार, संशोधन आणि शिक्षण या क्षेत्रांतील भारतातील एक अग्रगण्य संस्था आहे. भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाच्या सहाय्याने कार्यरत असलेले हे केंद्र परवडणाऱ्या दरात कर्करोग उपचार उपलब्ध करून देणे, अत्याधुनिक संशोधनाला चालना देणे आणि कर्करोगशास्त्र क्षेत्रातील (ऑंकोलॉजी) भावी तज्ञ घडवणे या कार्यांसाठी समर्पित आहे.

 

* * *

पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2245755) अभ्यागत कक्ष : 32
Read this releasein: English