शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत इनोव्हेट्स मधून जागतिक नवोन्मेष केंद्र म्हणून भारताचा होत असलेला उदय प्रतिबिंबित होतो – धर्मेन्द्र प्रधान


केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आयआयटी मुंबई येथे 'भारत इनोव्हेट्स डीप-टेक प्री-समिट'च्या समारोप सत्राला केले संबोधित

Posted On: 22 MAR 2026 4:58PM by PIB Mumbai

 


केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आयआयटी मुंबई येथे 'भारत इनोव्हेट्स डीप-टेक प्री-समिट'च्या समारोप सत्राला संबोधित केले.

या प्री-समिटच्या निमित्ताने, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका गोलमेज परिषदेत सुमारे 175 गुंतवणूकदार आणि उद्योगपती सहभागी झाले होते. प्रधान यांनी ऊर्जा, हवामान आणि शाश्वतता, सेमीकंडक्टर, अंतराळ आणि संरक्षण, आरोग्यसेवा आणि मेडटेक, प्रगत संगणन, जैवतंत्रज्ञान, मोबिलिटी आणि स्मार्ट शहरे तसेच इंडस्ट्री 4.0 यांसारख्या विविध क्षेत्रांतील नवोन्मेषकांशी संवाद साधला. तसेच, प्रदर्शन स्टॉल्स आणि आयआयटी बॉम्बेच्या पॅव्हेलियनलमध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या संस्थात्मक नवोन्मेष दर्शविणाऱ्या अत्याधुनिक, संशोधन-आधारित उपाययोजनांचे अवलोकन केले.

हा समारोप सोहळा आयआयटी बॉम्बेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन; उच्च शिक्षण विभागाचे सचिव डॉ. विनीत जोशी; विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय करंदीकर; आणि आयआयटी बॉम्बेचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, प्रतिष्ठित शास्त्रज्ञ, उद्योगपती, नवोन्मेषक, नवउद्योजक तसेच शिक्षण मंत्रालय आणि आयआयटी मुंबईमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या पूर्व परिषदेतल्या चर्चेत सहभागी होण्याचा आनंद व्यक्त करताना ते म्हणाले की, फ्रान्समधील नीस येथे आयोजित होणाऱ्या 'भारत इनोव्हेट्स 2026' ची पूर्वतयारी म्हणून, या विचारमंथन सत्रात डीप-टेक नवोन्मेषाला चालना देणे, उद्योग-शैक्षणिक संस्था भागीदारी मजबूत करणे आणि स्टार्टअप परिसंस्थेला बळकट करणे यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. उदयोन्मुख उद्योगांमध्ये सातत्यपूर्ण गुंतवणुकीच्या गरजेवर भर त्यांनी दिला. यामुळे उद्योगांचा विस्तार करणे, नवोन्मेषाला प्रोत्साहन देणे आणि संशोधन-आधारित उद्योजकतेला पाठिंबा देणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले.

 शिक्षण मंत्रालयाच्या नेतृत्वाखालील, 'भारत इनोव्हेट्स 2026' या उपक्रमाचे उद्दिष्ट देशाच्या कानाकोपऱ्यातून संशोधन आणि विकास आधारित नावीन्यपूर्ण कल्पनांना जागतिक स्तरावर पोहोचवणे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करणे, अर्थपूर्ण सहकार्याला चालना देणे, गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून देणे आणि चिरस्थायी जागतिक भागीदारी निर्माण करणे हे आहे, असेही ते पुढे म्हणाले.

'भारत इनोव्हेट्स' हे जागतिक नवोन्मेष केंद्र, म्हणून विकसित होण्यासाठी, भारताच्या वाढत्या जागतिक नवोन्मेष क्षमतेचा पुरावा आहे, असे त्यांनी याप्रसंगी सांगितले. हजारो स्टार्टअप्सचा सहभाग आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन हे भारताच्या नवोन्मेष व्यवस्थेचे चैतन्य आणि  दर्शवते, असे त्यांनी नमूद केले.

 भारत केवळ स्वतःसाठीच नव्हे, तर जगासाठी, विशेषतः किफायतशीर आणि विस्तारक्षम नवोन्मेषाची गरज असणाऱ्या देशांसाठी उपाययोजना विकसित करण्याच्या स्थितीत आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. अशा व्यासपीठांमुळे कल्पना, प्रतिभा आणि संसाधने एकत्र येऊन नवनिर्मितीला चालना देतात, असे त्यांनी सांगितले.

प्रधान यांनी धोरणात्मक पाठबळ, संस्थात्मक सहकार्य आणि पोषक वातावरणाच्या माध्यमातून नवोन्मेषकांना पाठिंबा देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. याचा वास्तविक प्रभाव निर्माण करण्यासाठी नवोन्मेष, प्रयोगशाळांपुरते मर्यादित न ठेवता बाजारपेठेपर्यंत पोहोचले पाहिजेत, यावर त्यांनी भर दिला. 'भारत इनोव्हेट्स 'मध्ये सादर करण्यात आलेले नवोन्मेष, विशेष करून तंत्रज्ञान आणि उद्योजकतेमध्ये 'ग्लोबल साउथ'मधील भारताच्या जागतिक नेतृत्वाच्या प्रवासात महत्त्वपूर्ण योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

फ्रान्समध्ये होणाऱ्या ‘भारत इनोव्हेट्स 2026’ या जागतिक प्रदर्शनाची राष्ट्रीय पूर्वतयारी म्हणून आयोजित या पूर्व परिषदेत देशभरातून प्राप्त झालेल्या 3,000 हून अधिक अर्जांमधून निवडलेल्या 137 दर्जेदार डीप-टेक स्टार्टअप्सचा सहभाग होता.

या दिवशी विविध समांतर सत्रांमध्ये स्टार्टअप पिचिंग सत्रांचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये संस्थापकांनी प्रगत साहित्य, जैवतंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वच्छ तंत्रज्ञान आणि नेक्स्ट जनरेशन उत्पादन प्रणाली यांसारख्या अत्याधुनिक नवकल्पना सादर केल्या. या सत्रांना गुंतवणूकदार, उद्योग क्षेत्रातील नेते आणि नवोन्मेष क्षेत्रातील प्रमुख हितसंबधीय उपस्थित होते, त्यांनी या क्षेत्रात  सहकार्य आणि गुंतवणुकीच्या संधींचा आढावाही घेतला.

या कार्यक्रमात स्टार्टअप्स, व्हेंचर कॅपिटल कंपन्या आणि उद्योग प्रतिनिधी यांच्यात संवादही झाला, ज्यामुळे अर्थपूर्ण भागीदारी निर्माण होऊन स्टार्टअप्सना व्यावसायिकीकरण आणि जागतिक बाजारपेठेत विस्तार करण्याच्या संधी उपलब्ध झाल्या.

आयआयटी बॉम्बे येथे आयोजित ‘भारत इनोव्हेट्स डीप-टेक प्री-समिट’ हे भारताच्या नवोन्मेष प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरले आहे. या माध्यमातून शैक्षणिक संस्था, स्टार्टअप्स, गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते एका व्यासपीठावर एकत्र आले. निवडलेल्या स्टार्टअप्सना आता फ्रान्समध्ये होणाऱ्या ‘भारत इनोव्हेट्स 2026’ आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार असून, त्यामुळे तंत्रज्ञान-आधारित नवोन्मेषाच्या क्षेत्रात भारताचे जागतिक स्थान अधिक बळकट होणार आहे.

अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या :

 https://bharatinnovates.in/ 

 https://x.com/dpradhanbjp/status/2035654233643757754?s=20

 https://x.com/dpradhanbjp/status/2035673340770447847?s=20

 https://x.com/dpradhanbjp/status/2035689926252233102?s=20

 https://x.com/dpradhanbjp/status/2035691494284439591?s=20

***

राधिका अघोर/श्रद्धा मुखेडकर/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2243609) अभ्यागत कक्ष : 58