संरक्षण मंत्रालय
आधुनिक युद्ध सीमांच्या पलीकडचे आहे, राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी सशक्त सैन्याबरोबरच नागरिकांनीही सुसज्ज असणे आवश्यक आहे: संरक्षण मंत्री
प्रविष्टि तिथि:
21 MAR 2026 2:02PM by PIB Mumbai
“सध्याचे युद्ध सीमांच्या पलीकडचे आहे आणि राष्ट्रीय सुरक्षेमध्ये आर्थिक, डिजिटल, ऊर्जा आणि अगदी अन्न सुरक्षेचाही समावेश आहे,” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. कोणत्याही परिस्थितीत देशाचे रक्षण करण्यासाठी खांद्याला खांदा लावून उभे राहण्यास सक्षम अशा सशक्त सैन्याबरोबरच नागरिकांनीही सुसज्ज असण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला.
उत्तराखंडमधील घोराखाल येथील सैनिक शाळेच्या स्थापना दिन आणि हीरक महोत्सवानिमित्त 21 मार्च 2026 रोजी आयोजित कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करताना, त्यांनी नमूद केले की संघर्षांचे स्वरूप आमूलाग्र बदलले आहे, कारण आज कोणत्याही देशाला आर्थिक, सायबर, अंतराळ आणि माहिती युद्धाद्वारे निष्प्रभ केले जाऊ शकते, आणि म्हणूनच प्रत्येक नागरिकाने नेहमी सतर्क आणि सज्ज राहणे आवश्यक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार संरक्षण दलांना अत्याधुनिक शस्त्रे आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही असे सांगत संरक्षण मंत्री म्हणाले की देशाला कोणत्याही कठीण परिस्थितीचा सामना करण्यास मदत करण्यासाठी नागरिकांनी, विशेषतः युवकांनी, शिस्त आणि दृढनिश्चयाच्या माध्यमातून मानसिक कणखरता आणि बौद्धिक स्पष्टता विकसित करणे आवश्यक आहे. VUCA (अस्थिर, अनिश्चित, गुंतागुंतीचे आणि संदिग्ध) या संकल्पनेचा संदर्भ देत, त्यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक आव्हानांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी स्वतःची VUCA म्हणजेच दूरदृष्टी, आकलनशक्ती, धैर्य आणि जुळवून घेण्याची क्षमता विकसित करण्याचे आवाहन केले.
संरक्षण मंत्र्यांनी सैनिकी शाळांमध्ये मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय ऐतिहासिक आणि क्रांतिकारक असल्याचे सांगितले, ज्यामुळे देशाच्या 'नारी शक्ती'ला बळकटी मिळत आहे. येत्या काळात या मुली 'नारी शक्ती'च्या मशालवाहक बनतील आणि विविध क्षेत्रांमध्ये नवीन शिखरे पादाक्रांत करतील, असे ते म्हणाले.
घोराखाल येथील सैनिक शाळेने राष्ट्रसेवेची 60 वर्षे पूर्ण केल्याबद्दल विद्यार्थी, शिक्षक, माजी विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन करतानाच, हे विद्यार्थी शिस्त आणि समर्पणाचे सर्वोच्च मापदंड कायम राखत आपल्या कुटुंबीयांना, संस्थेला आणि देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करतील, असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.
***
माधुरी पांगे/सुषमा काणे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2243378)
आगंतुक पटल : 74