शिक्षण मंत्रालय
शिक्षण मंत्रालय 21–22 मार्च रोजी आयआयटी मुंबई येथे 'भारत इनोव्हेट्स डीप-टेक प्री-समिट'चे करणार आयोजन; धर्मेंद्र प्रधान विशेष सत्राला संबोधित करणार
दोन दिवसीय कार्यक्रमात स्टार्टअप्सची कामगिरी, गुंतवणूकदारांशी संवाद आणि उद्योग क्षेत्राबरोबर सहभाग पहायला मिळेल
Posted On:
20 MAR 2026 5:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 मार्च 2026
भारताला डीप-टेक नवोन्मेषात जागतिक महाशक्ती म्हणून स्थापित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय, आयआयटी मुंबईच्या सहकार्याने 'भारत इनोव्हेट्स डीप-टेक प्री-समिट'चे आयोजन करत आहे. ही प्री-समिट 21-22 मार्च 2026 रोजी आयआयटी मुंबई रिसर्च पार्क येथे आयोजित केली जाईल. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान एका विशेष सत्रादरम्यान या शिखर परिषदेला संबोधित करतील.
या दोन दिवसीय राष्ट्रीय प्रदर्शनात देशभरातून आलेल्या 3,000 हून अधिक अर्जांमधून निवडलेले सुमारे 137 आश्वासक डीप-टेक स्टार्टअप्स सहभागी होतील.
उद्घाटन सत्राला भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार आणि पंतप्रधान विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष सल्लागार परिषदेचे (PM-STIAC) अध्यक्ष प्रा. अजय कुमार सूद उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात वरिष्ठ सरकारी अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योजकही सहभागी होणार आहेत. यामध्ये शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाचे सचिव डॉ. विनीत जोशी; विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय करंदीकर; जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. राजेश सुधीर गोखले आणि आयआयटी मुंबईच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन; आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे; तसेच आयआयटीमधील डीप-टेक उद्योजक, ज्यात ॲटमबर्ग टेक्नॉलॉजीज (आयआयटी मुंबई) चे सह-संस्थापक मनोज मीना आणि इम्युनोॲक्टचे संस्थापक प्रा. राहुल पुरवार यांचा समावेश आहे.
भारत इनोव्हेट्स उपक्रमाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-फ्रान्स नवोन्मेष वर्षाच्या उद्घाटनाच्या वेळी केली होती. शिक्षण मंत्रालयाचा हा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम असून, तो भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागारांच्या धोरणात्मक मार्गदर्शनाखाली चालतो. या कार्यक्रमाची संकल्पना भारतीय डीप-टेकसाठी एक ग्लोबल ऍक्सिलरेटर म्हणून केली आहे, जो भारताची उच्च शिक्षण नवोन्मेष परिसंस्था (स्टार्टअप्स, प्रयोगशाळा आणि संशोधन पार्क) आणि कॉर्पोरेट्स, गुंतवणूकदार, इन्क्यूबेटर्स, विद्यापीठे व सरकारे यांसारख्या जागतिक हितधारकांमध्ये दीर्घकालीन स्थिर संबंध निर्माण करेल. भारत इनोव्हेट्स 2026 तीन टप्प्यांमध्ये पुढील वाटचाल करेल.
- राष्ट्रीय बेसकॅम्प : गांधीनगर आणि मुंबई (डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026)
- भारत इनोव्हेट्स डीप-टेक प्री-समिट : भारतीय तंत्रज्ञान संस्था - मुंबई, मुंबई (21-22 मार्च 2026)
- आंतरराष्ट्रीय नवोन्मेष प्रदर्शन : नीस, फ्रान्स (14-16 जून 2026)
भारत इनोव्हेट्स डीप-टेक प्री-समिट या शिखरपूर्व परिषदेत तंत्रज्ञान विषयक 13 महत्वाच्या क्षेत्रांमधील नवोन्मेषांचे प्रदर्शन मांडले जाणार आहे. याअंतर्गत प्रगत संगणकीय प्रक्रिया, आरोग्य सेवा आणि वैद्यकीय तंत्रज्ञान, अंतराळ आणि संरक्षण, ऊर्जा आणि शाश्वतता, सेमीकंडक्टर्स, जैवतंत्रज्ञान, स्मार्ट शहरे आणि वाहतूक व्यवस्था, नील अर्थव्यवस्था, अद्ययावत दळणवळण, कृषी आणि खाद्यान्न तंत्रज्ञान, प्रगत साहित्य, उत्पादन आणि उद्योग 4.0, तसेच आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांचा समावेश आहे. या प्रदर्शनात मांडली जाणारी नवोन्मेष पारुपे ही भारतीय तंत्रज्ञान संस्था, भारतीय विज्ञान संस्था यांसारख्या भारतातील आघाडीच्या संस्था आणि प्रमुख संशोधन परिसंस्थांमध्ये विकसित केली गेली आहेत. हे प्रदर्शन भारताच्या शैक्षणिक अवकाशातून उदयाला येत असलेल्या जागतिक पातळीवर स्पर्धात्मक ठरू शकतील अशा नेक्स्ट जनरेशन तंत्रज्ञानाचे प्रतिनिधित्व करणारे प्रदर्शन असेल. या पूर्व शिखर परिषदेच्या निमित्ताने खाली नमूद घटक एकाच ठिकाणी येतील.
- 200 पेक्षा जास्त स्टार्टअप संस्थापक
- 70 पेक्षा जास्त गुंतवणूकदार आणि व्हेंचर कॅपिटल क्षेत्रातील आघाडीची व्यक्तिमत्वे.
- 50 पेक्षा जास्त उद्योग क्षेत्रातील आघाडीची व्यक्तिमत्वे आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील भागीदार
- वरिष्ठ सरकारी भागधारक आणि नवोन्मेष विषयक मोहिमा
या एकात्मिकीकरणातून पंतप्रधानांनी शैक्षणिक संस्था, सरकार आणि उद्योग क्षेत्र सुरळीतपणे परस्परांच्या सहकार्याने काम करत असतील अशा प्रकारच्या एका संपूर्ण परिसंस्थेसंबंधी मांडलेल्या दृष्टिकोनाची प्रचिती येते. हा उपक्रम भारताच्या जागतिक नवोन्मेष शिष्टमंडळाकरता, एक राष्ट्रीय निवड प्रक्रियेची संधी उपलब्ध करून देणारा, तसेच प्रत्यक्षात अशा शिष्टमंडळाला जगापुढे आणण्याची संधी देणारा ठरणार आहे. या परिषदेअंतर्गत आपल्या नवोन्मेषी संकल्पना मांडण्याकरता काही विशेष सत्रांचे आयोजन केले जाणार आहे. याअंतर्गत गुंतवणूकदारांशी संवाद घडून येईल तसेच औद्योगिक भागीदारीची संधीही उपलब्ध होईल. परिणामी हा कार्यक्रम भारतीय स्टार्टअप्ससाठी तंत्रज्ञान सज्जतेच्या पातळीपासून (TRL 3-9) प्रत्यक्ष जागतिक स्तरावर आपली अॅप्लिकेशन सुरू करणे आणि त्याची व्याप्ती विस्तरण्यापर्यंतच्या वाटचालीला मोठी गती देणार आहे. या परिषदेच्या अपेक्षित फलनिष्पत्तीअंतर्गत खाली नमूद मुद्दांचा समावेश आहे.
- जागतिक स्तरावर मांडता येईल अशा भारताच्या सर्वात आशादायक आणि डीप-टेक स्टार्टअप्स गटांची निवड करणे.
- सुरुवातीच्या टप्प्यातील गुंतवणूक आणि धोरणात्मक भागीदारीची सुविधा उपलब्ध करून देणे.
- देशाच्या उच्च शिक्षण क्षेत्राअंतर्गत संशोधन ते प्रत्यक्ष बाजारपेठ विषयक साखळीला बळकटी देणे.
- जगासमोर भारताची नवोन्मेष परिसंस्था व्यापक स्वरुपात मांडणे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा 2020 अंतर्गत नवोन्मेष हा राष्ट्रीय विकासाच्या केंद्रस्थानी असलेला घटक असल्याचे म्हटले गेले आहे. आज भारत 2047 पर्यंत विकसित भारत होण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहे. अशावेळी भारतातील विद्यापीठे आता केवळ वर्गखोल्यांच्या चौकटीत अडकलेली नाहीत, तर ती सक्रियपणे भविष्याला आकार देणाऱ्या तंत्रज्ञानाची जडणघडण करत असल्याचा संदेशच भारत इनोव्हेट्स डीप-टेक प्री समिट या पूर्व-शिखर परिषदेच्या आयोजनातून दिला गेला आहे.
अधिक माहितीसाठी, https://bharatinnovates.in/ ला भेट द्या.
* * *
निलिमा चितळे/सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2243097)
अभ्यागत कक्ष : 13