सहकार मंत्रालय
भारत टॅक्सीचे संचालन
Posted On:
17 MAR 2026 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 मार्च 2026
भारत टॅक्सी हा भारत सरकारच्या ‘सहकार से समृद्धी’ या संकल्पनेनुसार, सहकारी क्षेत्राला बळकट करण्यासाठी आणि सर्वसमावेशक, नागरिक-केंद्रित वाहतूक उपायांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांमधील एक महत्त्वाचा टप्पा आहे. बहुराज्यीय सहकारी संस्था अधिनियम,2002 अंतर्गत नोंदणीकृत, भारत टॅक्सीची स्थापना 6 जून, 2025 रोजी सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या 8 राष्ट्रीय स्तरावरील संस्थांनी केली आणि 5 फेब्रुवारी, 2026 रोजी तिचे अधिकृतपणे उद्घाटन करण्यात आले. भारत टॅक्सी हे पारंपरिक “चालक-भागीदार” मॉडेलकडून “सारथी-मालक” मॉडेलकडे झालेले एक संक्रमण आहे, ज्यामध्ये सारथी सहकारी संस्थेचे मालक बनू शकतात, व्यवस्थापन मंडळात प्रतिनिधित्व मिळवू शकतात आणि नफा सामायिकीकरणात सहभागी होऊ शकतात, तसेच कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी यात व्यावसायिक व्यवस्थापन उपलब्ध असते. भारत टॅक्सी प्लॅटफॉर्म शून्य-कमिशन मॉडेलवर काम करतो , ज्यात नफ्याचे चालकांना थेट वितरण केले जाते. हे गुंतवणूक-संचालित एग्रीगेटर प्लॅटफॉर्मला एक स्वदेशी पर्याय उपलब्ध करून देते. भारत टॅक्सीमध्ये पारदर्शक भाडे रचना, वापरकर्ता -अनुकूल मोबाईल राईड-बुकिंग इंटरफेस, रिअल-टाइम वाहन ट्रॅकिंग, बहुभाषिक इंटरफेस समर्थनासह 24/7 ग्राहक सहाय्य उपलब्ध आहे. भारत टॅक्सी सध्या दिल्ली एनसीआर – दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, फरिदाबाद, गाझियाबाद आणि गुजरातमधील अहमदाबाद, राजकोट, सोमनाथ व द्वारका येथे कार्यरत आहे. भारत टॅक्सीचे लक्ष्य पुढील तीन वर्षांमध्ये देशभरात द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरांमध्ये टप्प्याटप्प्याने आपल्या सेवेचा विस्तार करून तहसील स्तरापर्यंत सेवा पुरवणे हे आहे.
भारत टॅक्सी अंतर्गत प्रवासाचे शुल्क सहकारी संस्थेद्वारे परिचालन खर्च, प्रवासाचे अंतर आणि प्रचलित बाजार परिस्थितीच्या आधारावर निश्चित केले जाते, जेणेकरून चालक आणि प्रवासी दोघांसाठी ते किफायतशीर राहील. ही दर निश्चितीची प्रणाली पारदर्शक आणि नियंत्रित भाडे सुनिश्चित करण्यासाठी तयार केली आहे, ज्यामध्ये वेळोवेळी आढावा घेतला जातो आणि सर्व संबंधित घटकांना भाडे रचनेबद्दल अवगत केले जाते.
संस्थेच्या उपविधींमध्ये विहित केलेल्या पात्रता निकषांनुसार चालक सदस्यांची (सारथी) नावनोंदणी केली जाते.
या प्रकल्पामध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी विविध उपाय समाविष्ट आहेत, ज्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:
- सहकार रचनेअंतर्गत कामकाज ज्यात सदस्यांद्वारे लोकशाही देखरेखीसह संचालक मंडळात चालकांचे प्रतिनिधीत्व ;
- पारदर्शक भाडे निर्धारण आणि नियमित भाडे पुनरावलोकन प्रणाली
- रिअल-टाइम बुकिंग, वाहन ट्रॅकिंग आणि ग्राहक अभिप्राय सुविधेसाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म;
- प्रवाशांसाठी तक्रार निवारण प्रणालीची तरतूद आणि
- बहुराज्य सहकारी संस्था अधिनियम,2002 अंतर्गत नियमित वित्तीय लेखापरीक्षण आणि नियामक अनुपालन.
याव्यतिरिक्त, परिचालन पारदर्शकता आणि चालकांचे कल्याण अधिक मजबूत करण्यासाठी, या प्लॅटफॉर्मने डिजिटल पेमेंट एकत्रीकरण, बँकिंग आणि वित्तीय सेवा तसेच चालकांना विमा सहाय्य पुरवण्यासाठी संस्थांसोबत सामंजस्य करार केले आहेत.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2241413)
अभ्यागत कक्ष : 21