संरक्षण मंत्रालय
भारताच्या क्रीडा अर्थव्यवस्थेला, नव्याने उभारी देण्यासाठी, सार्वजनिक-खाजगी भागीदारीत वाढ होण्याची गरज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली व्यक्त.
प्रविष्टि तिथि:
15 MAR 2026 8:18PM by PIB Mumbai
“ केंद्र सरकार, अनेक उपक्रमांच्या माध्यमातून, देशात, क्रीडा संस्कृतीला पोषक वातावरण निर्माण करत आहे. अशा वातावरणात, जिथे अॅथलिट्स आणि युवकांना अधिक संधी, संसाधने व सन्मान मिळू शकेल” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिष्ठा अधिक वाढवण्यासाठी आणि भारताच्या क्रीडा अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्यासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी अधिक वाढवण्याची गरज असल्याचे राजनाथ सिंह यांनी पुढे सांगितले. नवी दिल्लीत आज (15 मार्च 2026) आयोजित आदित्य बिर्ला स्मृति पोलो चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीनिमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते.
सरकार आणि खाजगी क्षेत्रांनी एकत्रितपणे पुढाकार घेतला तर, नजीकच्या भविष्यात, भारत क्रीडा क्षेत्रात, विशेषतः पोलो सारख्या खेळात, जागतिक स्तरावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करु शकेल, असे त्यांनी अधोरेखित केले. भारताच्या क्रीडा परंपरेत, पोलो खेळ कित्येक वर्षांपासून रुजलेला आहे. त्यामुळे, त्याला “भारताचा क्रीडा वारसा” अशी उपाधी निश्चित देता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. भारतीय लष्कराने, पोलो खेळात, अनेक निपुण खेळाडू दिले आसून, या खेळाचा समृद्ध वारसा जपण्यात मोठे योगदान दिले आहे. “ भारतीय पोलो संघटनेच्या सहकार्याने, भारतीय लष्कराने, हा वारसा जिवंत आणि प्रासंगिक ठेवण्यात, महत्वाची भूमिका बजावली आहे” असे त्यांनी सांगितले. " आपण सर्वांनी एकत्रितपणे काम केल्यास, आपण भारतात पोलो तसेच इतर खेळांसाठी एक सकारात्मक संस्कृती निर्माण करू शकू असा आपल्याला विश्वास आहे. यामुळे आपल्या युवा प्रतिभेला पुढे येण्याची आणि देशाचे नाव उज्ज्वल करण्याची संधी मिळेल," असे ते म्हणाले.
AACS.jpeg)
'खेलो इंडिया' आणि 'टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजना' (टॉप्स) यांसारखे उपक्रम, तसेच क्रीडा पायाभूत सुविधांमध्ये झालेला अभूतपूर्व विकास, यामुळे युवा वर्गाला आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी एक नवीन व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे राजनाथ सिंह यांनी नमूद केले. 'राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा' आणि 'खेलो भारत धोरण' यामुळे प्रतिभावंत खेळाडूंना प्रचंड लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे; शिवाय, या उपाययोजनांमुळे क्रीडा संस्थांच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण होईल, असेही त्यांनी सांगितले.
ज्याप्रमाणे औद्योगिकीकरण, तंत्रज्ञान आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये खाजगी सहभागामुळे नवी ऊर्जा आणि गती प्राप्त झाली आहे, त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रातही खाजगी क्षेत्रातील घटक आणि उद्योग क्षेत्रातील भागधारकांचा सहभाग व्यावसायिक दृष्टिकोन, दीर्घकालीन दृष्टी आणि शाश्वत सहाय्य प्रणाली विकसित करण्यास हातभार लावतील, यावर संरक्षण मंत्र्यांनी भर दिला. यामुळे खेळाडूंना उत्कृष्ट प्रशिक्षण, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील तयारीच्या संधी उपलब्ध होतील, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

राजनाथ सिंह यांनी 'पोलो' या खेळाचे वर्णन केवळ शारीरिक ताकद आणि वेगाचा खेळ नव्हे तर ताल, रणनीती, समन्वय, शिस्त आणि धैर्य यांचा एक सुरेख संगम असे केले.

***
शैलेश पाटील/राधिका अघोर/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
Follow us on social media:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pibpanaji
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBPanaji
/pibpanaji
(रिलीज़ आईडी: 2240434)
आगंतुक पटल : 90