कोळसा मंत्रालय
कोळशाचे योग्य वितरण आणि उपलब्ध कोळसा साठयातून प्रभावीपणे कोळसा पोहोचवण्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भारत कुकिंग कोल लिमिटेड (बीसीसीएल) चा ग्राहकांशी संवाद
Posted On:
15 MAR 2026 1:37PM by PIB Mumbai
कोळशाचे योग्य वितरण आणि उपलब्ध कोळसा साठयातून प्रभावीपणे कोळसा पोहोचवण्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, बीसीसीएल- भारत कुकिंग कोल लिमिटेड ने, शनिवारी, एनआरएस म्हणजेच बिगर नियामक क्षेत्र लिंकेज आणि सीआयएल – एसडब्ल्यूएमए म्हणजेच, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी ऑनलाईन ई लिलाव खरेदी करणाऱ्या ग्राहकांशी संवाद आयोजित केला होता. या कंपनीशी संबंधित कोळसा व्यापारी, विविध उद्योगक्षेत्रातील प्रतिनिधी आणि ग्राहक मोठ्या संख्येने या चर्चेत सहभागी झाले आणि त्यांनी आपल्या सूचना मांडल्या, तसेच मते व्यक्त केली.
बीसीसीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार अग्रवाल आणि वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात, मनोज कुमार अग्रवाल यांनी ग्राहकांशी संवाद साधतांना, बीसीसीएल सर्व ग्राहकांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी तसेच त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. उत्तम दर्जाच्या कोळशाची विक्री आणि वेळेत उपलब्धता, याला कंपनीचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगत, ही उद्दिष्टे गाठण्यासाठी, प्रत्येक स्तरावर प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी, आपल्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठीही कंपनी सातत्याने प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीत सहभागी होत आपल्या सूचना दिल्याबद्दल त्यांनी सर्व सहभागी प्रतिनिधींचे आभार मानले. अशा संवादातून, कंपनी आणि ग्राहकांमधील संबंध अधिक दृढ होत असतात, परस्परांवरचा विश्वास अधिक वृद्धिंगत करण्यात, या संवादांची महत्वाची भूमिका असते, असे अग्रवाल यांनी सांगितले.
या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बीसीसीएल ने आपल्या ग्राहकांसाठी केलेल्या विविध तरतुदी, सुविधा आणि प्रोत्साहनपर उपक्रमांची माहितीही देण्यात आली. याच संदर्भात, ऊर्जा क्षेत्रातील ग्राहकांव्यतिरिक्त, कंपनी इतर ग्राहकांसाठीही आपला पाया विस्तारत असून, बिगर नियामक क्षेत्र लिंकेज म्हणजेच एनआरएस आणि लिलावाद्वारे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कोळसा पुरवठा करण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यात आली. एनआरएस ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी, एनआरएस लिंकेज लिलावाअंतर्गत मोठ्या प्रमाणात कोळसा दिला जात आहे. अलीकडच्या, नवव्या खेपेत, सुमारे 20 दशलक्ष टन कोळसा विविध क्षेत्रांना देण्यात आला. त्याशिवाय, पोलाद क्षेत्रातील ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या विविध पैलूंवरही ह्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

याशिवाय, स्पर्धात्मकता कायम ठेवण्यासाठी बीसीसीएलने ई- लिलाव यंत्रणेद्वारे कोळशाची उचल करण्यावर आकर्षक रोख सवलत योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत उचललेल्या कोळशाच्या प्रमाणानुसार प्रति टन ₹100 ते ₹600 पर्यंत रोख सवलत दिली जात आहे. या योजनेनुसार 500 ते 4,000 टन (रस्ता मार्ग) किंवा 1 रेक (रेल्वे मार्ग) उचलल्यास प्रति टन ₹100 सवलत दिली जाते; 4,001 ते 12,000 टन किंवा 2 ते 3 रेकसाठी प्रति टन ₹200; 12,001 ते 20,000 टन किंवा 4 ते 5 रेकसाठी प्रति टन ₹300; 20,001 ते 40,000 टन किंवा 6 ते 10 रेकसाठी प्रति टन ₹400; 40,001 ते 80,000 टन किंवा 11 ते 20 रेकसाठी प्रति टन ₹500; तर 80,000 टनांपेक्षा अधिक किंवा 20 पेक्षा जास्त रेकसाठी प्रति टन ₹600 सवलत दिली जाते. ही सवलत देयके केलेल्या प्रमाणावर किंवा रेकच्या संख्येवर आधारित निश्चित केली जाईल आणि कोळसा उचल प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम हिशेबाच्या वेळी त्याचे समायोजन केली जाईल.
बैठकीत कोळसा उचल प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली. यासंदर्भात सर्व विभागांकडून कोळसा उचल प्रक्रियेत कोणताही विलंब होऊ नये म्हणून निर्धारित प्रमाण आणि वाटप वेळेवर जारी केले जात असल्याची माहिती देण्यात आली. खाण चलन परवानग्यांच्या मंजुरी प्रक्रियेला गती देण्यासाठी धनबाद जिल्हा प्रशासन आणि जिल्हा खनन अधिकारी यांच्याशी समन्वय प्रस्थापित करण्यात आला असून त्यामुळे मंजुरी प्रक्रिया 2 ते 3 दिवसांत पूर्ण केली जात आहे. परवानग्यांना जलद मंजुरी मिळावी यासाठी वॉलेट प्रणालीही सुरू करण्यात आली आहे.
कोळशाच्या गुणवत्तेशी संबंधित मुद्द्यांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व विभागांना कडक गुणवत्ता मानके पाळण्याबाबत सूचना देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. क्षेत्रीय महाव्यवस्थापक नियमितपणे खाण क्षेत्रांची तपासणी करीत असून कोळसा साइडिंगपर्यंत पोहोचेपर्यंत त्याच्या हालचालीवर देखरेख ठेवत आहेत, जेणेकरून गुणवत्तेची खात्री राहील. तसेच कोळसा उचल प्रक्रियेदरम्यान ग्राहकांना येणाऱ्या अडचणी, स्थानिक कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीमुळे किंवा इतर कार्यकारी मर्यादांमुळे निर्माण होणाऱ्या समस्याही क्षेत्रीय महाव्यवस्थापकांकडून सोडवण्यात येत आहेत.
***
शैलेश पाटील/राधिका अघोर/नितीन गायकवाड/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2240385)
अभ्यागत कक्ष : 13