इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
मुंबईतील आयसीएएनएन85 परिषदेत सुरक्षित आणि सक्षम इंटरनेट बळकट करण्यासाठी सहकार्यावर भर
Posted On:
10 MAR 2026 4:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 10 मार्च 2026
'इंटरनेट कॉर्पोरेशन फॉर असाइन्ड नेम्स अँड नंबर्स' (आयसीएएनएन) यांनी 'इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालया' अंतर्गत कार्यरत असलेल्या 'नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया' (निक्सी) च्या सहयोगाने मुंबईत आयसीएएनएन85 कम्युनिटी फोरमचे आयोजन केले होते. या फोरम मध्ये जगभरातील इंटरनेट क्षेत्रातील भागधारक सहभागी झाले. जागतिक इंटरनेट परिसंस्थेमध्ये एक मुक्त, सुरक्षित, सर्वसमावेशक आणि सक्षम इंटरनेट परिसंस्था कशा प्रकारे मजबूत करता येईल, यावर चर्चा करणे हा या फोरमचा मुख्य उद्देश आहे. आयसीएएनएन85 कम्युनिटी फोरम 7 ते 12 मार्च 2026 या कालावधीत मुंबईतील 'जिओ कन्व्हेन्शन सेंटर' येथे आयोजित करण्यात आली आहे.
"आज इंटरनेट ही जगभरातील अर्थव्यवस्था, सार्वजनिक सेवा, नवोन्मेष आणि दैनंदिन जीवनाला आधार देणारी एक अत्यंत महत्त्वाची पायाभूत सुविधा बनली आहे, असे मत याप्रसंगी बोलताना इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्ण यांनी मांडले. जसजसा डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार वाढत आहे, तसतसे इंटरनेट सर्वांसाठी मुक्त, सुरक्षित, सक्षम आणि सर्वसमावेशक राहील याची खात्री करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करणे महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले. आयसीएएनएन सारखी व्यासपीठे सरकारे, खाजगी क्षेत्र, तांत्रिक समुदाय आणि नागरी समाज यांना एकत्र आणून इंटरनेट प्रशासनासाठीच्या 'बहु-भागधारक दृष्टिकोना'ला बळकटी देत असल्याचे त्यांनी सांगितले. भारत या जागतिक प्रयत्नांमध्ये योगदान देण्यासाठी तसेच नवोन्मेष, सहकार्य आणि सर्व क्षेत्रांमधून अर्थपूर्ण सहभागाला चालना देणारी विश्वासार्ह डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्यासाठी वचनबद्ध असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

"आज इंटरनेट हा आर्थिक विकास, प्रशासन आणि दैनंदिन जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आयसीएएनएन85 सारखी व्यासपीठे सरकारे, तांत्रिक तज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील भागधारकांना एकत्र येऊन चर्चा करण्याची एक महत्त्वाची संधी उपलब्ध करून देतात; ज्याद्वारे आपण इंटरनेट सर्वांसाठी मुक्त, सुरक्षित आणि सुलभ कसे ठेवू शकतो, यावर विचारमंथन करता येते, असे महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले. अशा चर्चा सहकार्याला बळकटी देण्यास मदत करतात, असे ते म्हणाले. इंटरनेट विविध क्षेत्रांमध्ये नवोन्मेष आणि विकासाला सातत्याने चालना मिळेल याची खात्री करते असेही त्यांनी नमूद केले.
सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2237642)
अभ्यागत कक्ष : 10