वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हळद क्षेत्रातील शेतकरी–निर्यातदार संबंध मजबूत करण्यासाठी नांदेड येथे खरेदीदार–विक्रेता मेळावा आयोजित


हळद लागवडीत उत्पादकता आणि गुणवत्ता वाढविणे, सेंद्रिय हळद उत्पादन तंत्रज्ञान यांसह विविध विषयांवर मार्गदर्शनपर सत्रे

Posted On: 09 MAR 2026 6:58PM by PIB Mumbai

नांदेड, 9 मार्च 2026

हळद क्षेत्रातील व्यापार संधी वाढविणे आणि बाजारपेठेतील दुवे मजबूत करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय हळद बोर्डच्या वतीने, स्पायसेस बोर्ड इंडिया यांच्या सहकार्याने आज नांदेड (महाराष्ट्र) येथील VITS हॉटेलमध्ये हळद विषयक खरेदीदार–विक्रेता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात महाराष्ट्रातील हळद उत्पादक शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था, देशभरातील निर्यातदार, उद्योग प्रतिनिधी तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी सहभागी झाले.

या कार्यक्रमाला नांदेडचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी  राहुल कर्दिले, आयएएस  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन एन. भवानी श्री, आयएएस, सचिव, राष्ट्रीय हळद बोर्ड यांच्या उपस्थितीत झाले. त्यांनी प्रमुख भाषण केले. डॉ. शिवाजी राव शिंदे, सहयोगी अधिष्ठाता, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, तसेच मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन आणि  प्रशिक्षण केंद्र, हिंगोली येथील प्रतिनिधी मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधित करताना  एन. भवानी श्री, यांनी जागतिक हळद व्यापारात भारताचे नेतृत्व टिकवून ठेवण्यासाठी दर्जेदार उत्पादन व उत्पादनाचा मागोवा घेण्याची क्षमता  यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, “हळद उत्पादनासाठी भारत जागतिक स्तरावर नावाजला जातो.  दर्जा सुधारणा, उत्पादनाचा मागोवा घेण्याची क्षमता  आणि मूल्यवर्धन यावर भर दिल्यास आपल्या शेतकरी व उद्योगांसाठी निर्यात संधी अधिक वाढतील.”

राहुल कर्दिले, यांनी हळद मूल्यसाखळी मजबूत करण्यासाठी शेतकरी, संस्था आणि निर्यातदार यांच्या समन्वयित प्रयत्नांचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले, “खरेदीदार–विक्रेता मेळावे हे शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेशी जोडण्याचे प्रभावी व्यासपीठ असून मूल्यवर्धन आणि  चांगला दर मिळविण्यासाठी नवी संधी निर्माण करतात.”

डॉ. शिवाजी राव शिंदे, यांनी संशोधन संस्थांची भूमिका स्पष्ट करताना उत्पादकता आणि  गुणवत्ता वाढविण्यासाठी सुधारित शेती पद्धती आणि तंत्रज्ञान विकसित करण्याच्या गरजेवर भर दिला.

आमदार हेमंत पाटील, अध्यक्ष, मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्र, हिंगोली, यांनी त्यांच्या प्रतिनिधीमार्फत संदेश पाठवून हळद-आधारित उद्योग बळकट करण्याचे तसेच शेतकऱ्यांचा मूल्यवर्धन उपक्रमांमध्ये सहभाग वाढविण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमादरम्यान कृषी विभाग, राज्य शासनाचा उद्योग विभाग, निर्यातदार संघटना (ISFEA) तसेच संशोधन संस्था (मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्र, हिंगोली) यांचे तज्ज्ञ यांनी तांत्रिक सत्रे घेतली. या सत्रांमध्ये हळद लागवडीत उत्पादकता व गुणवत्ता वाढविणे, निर्यात दर्जा मानके आणि  अवशेष नियंत्रण, मूल्यवर्धनाच्या संधी तसेच सेंद्रिय हळद उत्पादन तंत्रज्ञान यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमात प्रगतिशील शेतकऱ्यांनी सेंद्रिय हळद लागवड आणि  जीआय टॅग प्राप्त वायगाव हळदीच्या विपणनाविषयी अनुभव सामायिक केले. तसेच खरेदीदार, निर्यातदार, शेतकरी व शेतकरी उत्पादक संस्था यांच्यातील व्यापार भागीदारी आणि  खरेदी संधींबाबत चर्चेसाठी विशेष नेटवर्किंग सत्र आयोजित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस  सिमांता सैकिया, उपसंचालक, स्पायसेस बोर्ड, प्रादेशिक कार्यालय, मुंबई यांनी स्वागतपर भाषण करून हळद मूल्यसाखळीतील विविध घटकांमध्ये सहकार्य वाढविणे हा या मेळाव्याचा उद्देश असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचा समारोप डॉ. ममता कृष्णा धनकुटे, सहाय्यक संचालक, स्पायसेस बोर्ड, प्रादेशिक कार्यालय, मुंबई यांनी आभार प्रदर्शन करून केला.

हा खरेदीदार–विक्रेता मेळावा हळद उत्पादक व निर्यातदार यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी, दर्जेदार उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि हळद क्षेत्रात मूल्यवर्धन वाढविण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरला.

पीआयबी मुंबई | जयदेवी पुजारी-स्वामी/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2237166) अभ्यागत कक्ष : 48
Read this releasein: English