कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या वतीने "सबका साथ सबका विकास - लोकांच्या महत्त्वाकांक्षांची परिपूर्ती" या संकल्पनेवर आधारित " सेवा/देखभाल परिसंस्थेमधील कौशल्य विकास' या विषयावरील समर्पित सत्राचे आयोजन

Posted On: 08 MAR 2026 10:02AM by PIB Mumbai

 

केंद्रीय अर्थसंकल्प 2026–27 नंतर केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आयोजित केलेल्या प्रमुख विषयांवर अर्थसंकल्पोत्तर वेबिनार मालिकेचा भाग म्हणून कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय   'भारतातील सेवा/देखभाल परिसंस्थेला मजबूत करणे: 1.5 लाख बहुकुशल सेवादात्यांना कौशल्य देणे' या विषयावर एक समर्पित ब्रेकआउट सत्र आयोजित करणार आहे. "सबका साथ सबका विकास - लोकांच्या महत्त्वाकांक्षांची परिपूर्ती" या व्यापक संकल्पनेवर आधारित या एक दिवसीय वेबिनारचे नेतृत्त्व आणि समन्वय केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी  9 मार्च 2026 रोजी "सबका साथ सबका विकास - लोकांच्या महत्त्वाकांक्षांची परिपूर्ती" या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित करणार आहेत. 

अर्थसंकल्पीय भाषणाच्या परिच्छेद 54 मध्ये सांगितल्या प्रमाणे रुपरेषा निश्चित करुन त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी हे वेबिनार सर्व भागधारकांसाठी एक सहयोगी व्यासपीठ म्हणून लाभदायी ठरेल अशी अपेक्षा आहे.  

परिच्छेद 54 मध्ये म्हटले आहे :  

"वृद्धापकाळ आणि संबंधित काळजी सेवा यांचा समावेश असलेले मजबूत केअर ईकोसिस्टम उभारले जाईल. एनएसक्यूएफ अर्थात राष्ट्रीय कौशल्य पात्रता रुपरेषा -सुसंगत विविध कार्यक्रम तयार केले जातील जे बहु-कौशल्य असलेले साहाय्यक कर्मचारी प्रशिक्षण देतील, ज्यात मुख्य काळजी आणि संबंधित कौशल्यांचा समावेश असेल, जसे की, आरोग्य, योग आणि वैद्यकीय व सहाय्यक उपकरणांचे संचालन. पुढील वर्षी, 1.5 लाख साहाय्यक कर्मचारी प्रशिक्षण घेतील."

या सत्रादरम्यान होणाऱ्या चर्चांमध्ये भारताच्या देशांतर्गत गरजा भागवण्यासाठी सक्षम आणि सेवाप्रदान करणारे कार्यबल विकसित करण्यावर प्रमुख भर असेल तसेच देखभाल क्षेत्राशी संबंधित अर्थव्यवस्थेतील उदयोन्मुख जागतिक संधींचा लाभ घेण्याविषयी विचारविनिमय केला जाईल.  केंद्रीय अर्थसंकल्प 2026–27 मध्ये देखभाल परिसंस्था मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली असून त्याअंतर्गत वृद्धापकाळ आणि संबंधित देखभाल सेवांचा विस्तार करून , एनएसक्यूएफशी सुसंगत प्रशिक्षण कार्यक्रम सुरु केले जाणार आहेत. या उपक्रमांमध्ये सेवा किंवा देखभाल संबंधी कौशल्यांबरोबरच आरोग्य संवर्धन सहाय्य, योगाभ्यास प्रशिक्षण, वैद्यकीय आणि सहाय्यक उपकरणांचे संचालन इत्यादी पूरक कौशल्यांचा देखील समावेश असेल. याचा उद्देश काळजी क्षेत्रातील 1.5 सेवाप्रदात्यांना प्रशिक्षण देऊन कुशल मनुष्यबळ तयार करणे आणि  भारताचे आरोग्यसेवा आणि देखभाल कार्यबळ वाढवणे असा आहे

भारतातील कौशल्य परिसंस्था - ज्याला राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषद (एनसीव्हीईटी), क्षेत्र कौशल्य परिषद (एसएससी), औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)/राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था (एनएसटीआय) आणि प्रधानमंत्री कौशल विकास योजना (पीएमकेव्हीवाय), प्रधानमंत्री राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी प्रोत्साहन योजना (पीएम-एनएपीएस) आणि जन शिक्षण संस्थान (जेएसएस) यांसारख्या प्रमुख योजनांतर्गत प्रशिक्षण भागीदारांचे समर्थन लाभले आहे - ती बदलत्या कार्यबलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक मजबूत केली जात आहे. हजारो उमेदवारांना आधीच ज्येष्ठ सेवा  सहाय्यक, घरगुती आरोग्य सहाय्यक आणि सामान्य रुग्णालय सहाय्यक यांसारख्या काळजी घेणाऱ्या भूमिकांमध्ये प्रशिक्षित करण्यात आले असून, याद्वारे एका सुव्यवस्थित शुश्रूषा कर्मचारी वर्गाचा पाया रचला गेला आहे.

या विशेष सत्रात आरोग्य संस्था, राज्य सरकारे, आंतरराष्ट्रीय संस्था आणि शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ एकत्र येऊन भारताचा  शुश्रूषा कर्मचारी वर्ग बळकट करण्यासाठी प्रमुख प्राधान्यक्रमांवर चर्चा करतील. चर्चेचा भर शुश्रूषा करणाऱ्यांच्या पात्रतेचे मानकीकरण, प्रशिक्षकांची क्षमता आणि प्रशिक्षण पायाभूत सुविधा वाढवणे, काळजीघेणाऱ्या क्षेत्रामध्ये प्रशिक्षणार्थी संधींचा विस्तार करणे आणि कार्यबलाची जागतिक हालचाल सुलभ करण्यासाठी कौशल्य मानके जागतिक मानकांशी सुसंगत करणे यावर असेल.

या सत्रातून समोर आलेले निष्कर्ष वेबिनारच्या समारोप सत्रात सादर केले जातील, जिथे सहभागी मंत्रालये/विभागांचे केंद्रीय मंत्री अर्थसंकल्पामधील घोषणेच्या धोरणात्मक अंमलबजावणीसाठी प्रमुख शिफारसी आणि पुढील वाटचाल स्पष्ट करतील. कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि शिक्षण राज्यमंत्री, भारत सरकार, जयंत चौधरी हे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या वतीने शुश्रूषा अर्थव्यवस्थेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कौशल्य परिसंस्था अधिक मजबूत करण्याबाबत महत्त्वाचे विचार आणि दृष्टीकोन मांडून समारोप करतील.

या सल्लामसलतीद्वारे, 1.5 लाख शुश्रूषा सेवा देणाऱ्यांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि भारताच्या  शुश्रूषा अर्थव्यवस्था  क्षेत्राच्या वाढीला गती देण्यासाठी कृतीयोग्य अंमलबजावणी धोरणे निश्चित करण्याचे मंत्रालयाचे उद्दिष्ट आहे.

***

जयदेवी पुजारी-स्वामी/भक्ती सोनटक्के/नितीन गायकवाड/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2236548) अभ्यागत कक्ष : 15