औषधनिर्मिती विभाग
देशभरात 8 वा जनऔषधी दिवस उत्साहात साजरा
Posted On:
07 MAR 2026 6:26PM by PIB Mumbai
देशभरात आज 8 वा जनऔषधी दिवस उत्साहात साजरा करून आठवडाभर चालणाऱ्या जनऔषधी सप्ताह 2026 उपक्रमाचा समारोप झाला.
रसायन आणि खते मंत्रालयाच्या औषधनिर्माण विभागाच्या फार्मास्युटिकल्स आणि मेडिकल डिव्हाइसेस ब्युरो ऑफ इंडिया (पीएमबीआय) यांनी आयोजित केला होता.

या प्रसंगी देशभरात 25 ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनेअंतर्गत परवडणारी आणि दर्जेदार औषधे उपलब्ध करून देण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्रांच्या (पीएम-बीजेके) मालकांना सन्मानित करण्यात आले.
नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रसायने आणि खते मंत्री जगत प्रकाश नड्डा सहभागी झाले होते.

उपस्थितांना संबोधित करताना, प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी उपक्रमामुळे देशभरातील नागरिकांसाठी आरोग्यसेवा अधिक परवडणारी आणि सुलभ झाली असल्याचे जगत प्रकाश नड्डा यांनी सांगितले.
सरकार या कार्यक्रमाला आणखी बळकटी देण्यासाठी तीन प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत राहील, असे ते म्हणाले. पहिले - गुणवत्तेची सर्वोच्च मानक सुनिश्चित करणे आणि जेनेरिक औषधांच्या गुणवत्तेबद्दल जनजागृती वाढवणे, जेणेकरून अधिकाधिक लोक आत्मविश्वासाने त्यांचा वापर करतील. दुसरे - नियमित पुरवठा आणि वितरण सुधारणे, पुरवठा साखळी अधिक मजबूत करण्यासाठी सतत प्रयत्न करणे जेणेकरून देशभरातील सर्व जनऔषधी केंद्रांवर औषधे सहज उपलब्ध राहतील. तिसरे - केंद्र चालकांसाठी शाश्वत नफा सुनिश्चित करणे, जेणेकरून ही केंद्रे दिर्घकाळ यशस्वीरीत्या सुरू राहतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, जनऔषधी उपक्रम एका आंदोलनात, लोकचळवळीत रुपांतरित झाला असून सरकार हा उपक्रम दृढनिश्चयाने पुढे नेण्यासाठी वचनबद्ध आहे, असे नड्डा यांनी सांगितले.

सर्व नागरिकांना परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करताना जगत प्रकाश नड्डा यांनी सांगितले की, आर्थिक अडचणीमुळे कोणताही नागरिक आवश्यक औषधांपासून वंचित राहू नये, यासाठी जनऔषधी उपक्रम हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
या योजनेमुळे देशभरातील महिला उद्योजकांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळाले आहे, असे या प्रसंगी बोलताना रसायने आणि खते राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी सांगितले. जनऔषधी योजना ही केवळ परवडणाऱ्या औषधांची उपलब्धता वाढवण्यापुरती मर्यादित नसून, महिलांसाठी महत्त्वपूर्ण रोजगाराच्या संधीही निर्माण करत आहे, असे पटेल यांनी नमूद केले.
***
सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर /परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2236451)
अभ्यागत कक्ष : 14