खते विभाग
azadi ka amrit mahotsav

खत क्षेत्राशी संलग्न 16 लाखांहून अधिक शेतकरी पंतप्रधान मोदींच्या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये झाले सहभागी

Posted On: 06 MAR 2026 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 मार्च 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे “कृषी आणि ग्रामीण परिवर्तन” या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित केले, ज्यामध्ये देशभरातील लाखो शेतकरी आणि खत उद्योगाचे  प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले. 

खत विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, अंदाजे 16 लाख लोक - ज्यामध्ये सुमारे 12 लाख पुरुष आणि  4 लाख महिला शेतकरी होते - प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांद्वारे (पीएम-केएसके) पंतप्रधानांच्या  थेट प्रक्षेपणात सहभागी झाले.

डिजिटल माध्यमाद्वारे आयोजित या कार्यक्रमाचा विस्तार   सर्व 36  राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपर्यंत होता , ज्यामध्ये प्रामुख्याने शेतकरी समुदायाचा समावेश होता. या सत्रात देशभरातील  23 खत कंपन्यांचे प्रतिनिधीत्व करणारे उच्चपदस्थ अधिकारी सक्रियपणे  सहभागी झाले. यामध्ये एनएफएल आणि आरसीएफसारखे  सार्वजनिक क्षेत्रातील कारखाने,सहकार क्षेत्रातील IFFCO आणि KRIBHCO या  दिग्गज संस्था तसेच खाजगी क्षेत्रातील कंपन्या यांचा समावेश होता.

हितधारकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, अलिकडच्या केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी आणि ग्रामीण परिवर्तनासाठी एक नवीन मार्ग प्रशस्त करण्यात आला आहे.  सरकारचे मुख्य उद्दिष्ट शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, कृषी क्षेत्राला सक्षम करणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणे आहे याचा त्यांनी पुनरुच्चार केला .

जागतिक वापराच्या पद्धतींमध्ये झालेला महत्त्वपूर्ण बदल अधोरेखित करत , पंतप्रधान मोदी यांनी  वाढत्या आरोग्य जागरूकतेमुळे सेंद्रिय आणि रसायनमुक्त अन्नाच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय मागणीकडे लक्ष वेधले. त्यांनी भारतीय शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेत आपला ठसा उमटवण्यासाठी ही एक धोरणात्मक संधी असल्याचे नमूद केले.

वेबिनारमधून मिळालेल्या उपयुक्त  सूचना आणि माहिती भारताच्या कृषी क्षेत्राला आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणखी बळकटी देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील असा विश्वास व्यक्त करून पंतप्रधानांनी समारोप केला.

सोनाली काकडे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2236218) अभ्यागत कक्ष : 17