निती आयोग
आकांक्षी जिल्हे आणि प्रभागांमध्ये पोषण आणि आरोग्य सुधारणेच्या परिणामांना बळकटी देण्यासाठी नीती आयोग आणि युनिसेफ इंडिया यांच्यात इरादापत्रावर स्वाक्षरी
Posted On:
05 MAR 2026 7:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मार्च 2026
पोषण आणि आरोग्य विषयक परिणाम सुधारण्यासाठी सहयोगी प्रयत्नांना बळकटी देण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल म्हणून, नीती आयोग आणि युनिसेफ इंडिया यांनी आज आकांक्षी जिल्हे आणि आकांक्षी प्रभागांमधील धोरणात्मक हस्तक्षेपांना पाठिंबा देण्यासाठी इरादापत्रावर स्वाक्षरी केली. नीती आयोगाच्या आकांक्षी जिल्हे आणि प्रभाग कार्यक्रमाचे अतिरिक्त सचिव आणि मिशन संचालक रोहित कुमार आणि युनिसेफ इंडियाचे उपप्रतिनिधी अर्जन डी वाग्ट यांनी या इरादापत्रावर स्वाक्षरी केली.
दोन्ही संस्थांच्या सामर्थ्याचा लाभ घेऊन, वंचित प्रदेशांमध्ये माता आणि बाल पोषण परिणामांमध्ये सुधारणा करण्याच्या प्रयत्नांना चालना देणे, हे या सहकार्याचे उद्दिष्ट आहे. ही भागीदारी बहु-भागधारकांच्या सहभागाला प्रोत्साहन देईल आणि प्रभाग स्तरावर पोषण आणि आरोग्य विषयक हस्तक्षेपांसाठीची अंमलबजावणी प्रणाली मजबूत करेल.
रोहित कुमार यांनी नमूद केले की, आकांक्षी जिल्हे आणि प्रभाग कार्यक्रमाने विकासाच्या परिणामांना गती देण्यासाठी अभिसरण, सहयोग आणि डेटा-आधारित प्रशासनाचे महत्त्व दाखवून दिले. युनिसेफ इंडिया सारख्या संस्थांबरोबरची भागीदारी आरोग्य आणि पोषणविषयक गंभीर आव्हानांना तोंड देण्याच्या प्रयत्नांना आणखी बळकटी देईल आणि उच्च प्राधान्य असलेल्या क्षेत्रांमध्ये तळागाळापर्यन्त सेवा वितरणात सुधारणा करेल, असे त्यांनी अधोरेखित केले.
युनिसेफ इंडिया, IMPAct4Nutrition (I4N) प्लॅटफॉर्मद्वारे, पोषण-केंद्रित उपक्रमांमध्ये सीएसआर गुंतवणुकीला वळवण्यासाठी व्यवसाय, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि उद्योग संघटनांना तांत्रिक कौशल्य आणि समर्थन प्रदान करेल. या सहकार्यातून अंगणवाडी पायाभूत सुविधा मजबूत करणे, पोषण साक्षरता वाढवणे, आयसीडीएस सेवांचा वापर वाढवणे आणि पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांची क्षमता वाढवणे यावर लक्ष केंद्रित केले जाईल.
या इरादापत्रावरील स्वाक्षरी, सरकारी, खासगी क्षेत्र आणि समुदायातील लाभधारकांमधील मजबूत भागीदारी, पुरावा-आधारित दृष्टिकोन आणि समन्वित कृतीद्वारे, पोषण आणि आरोग्य सुधारणा परिणामांमध्ये प्रगती करण्याप्रति नीती आयोग आणि युनिसेफ इंडियाची सामायिक वचनबद्धता अधोरेखित करते.

शैलेश पाटील/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2235722)
अभ्यागत कक्ष : 71