परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे आणि पुणे पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष ‘जनसंवाद सत्र’; पासपोर्ट अर्जदारांना मोठा दिलासा

Posted On: 05 MAR 2026 4:44PM by PIB Mumbai

पुणे, 5 मार्च 2026

“नागरिक देवो भवः” या भावनेतून प्रेरित होऊन, प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे आणि पुणे पोलीस यांच्या समन्वयाने बुधवारी (4 मार्च 2026) प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, बाणेर, पुणे येथे विशेष संयुक्त ‘जनसंवाद सत्र’ आयोजित करण्यात आले. वेळेत पासपोर्ट जारी होण्यासाठी पोलीस विभाग आणि पासपोर्ट कार्यालय यांच्यातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आले.

पारपत्र अर्जांशी संबंधित तक्रारी, विशेषतः पोलीस पडताळणी अहवाल (PVR) संदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे येथील वरिष्ठ अधिकारी तसेच पुणे पोलिसांचे अधिकारी यांनी अर्जदारांशी थेट संवाद साधला, त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या आणि अनेक प्रलंबित प्रकरणांचे तत्काळ निराकरण करण्यास मदत केली.

सत्रादरम्यान अर्जदारांना पासपोर्ट अर्जासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, न्यायालयामध्ये चालू असलेले खटले  आणि पत्यांमधील बदल इत्यादी प्रकरणांबाबत तपशीलवार मार्गदर्शन देण्यात आले.

या संयुक्त ‘जनसंवाद सत्र’ मुळे नागरिकांना पासपोर्ट कार्यालय आणि पोलीस अधिकारी यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यामुळे प्रकरणांतील विलंब कमी होण्यास आणि पोलीस पडताळणी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येण्यास मदत झाली.

प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय,पुणे यांनी नागरिक-केंद्रित सेवा देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि पासपोर्ट अर्जांची प्रक्रिया अधिक जलद व कार्यक्षम करण्यासाठी पोलीस विभागाशी समन्वय आणखी मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.


पीआयबी पुणे | हर्षल आकुदे/ प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2235599) अभ्यागत कक्ष : 52
Read this releasein: English