वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत-कॅनडा सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारासाठी संदर्भ अटींवर स्वाक्षऱ्या
Posted On:
02 MAR 2026 9:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मार्च 2026
भारत आणि कॅनडाने आज नवी दिल्ली येथे सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार (सीईपीए) संदर्भातील वाटाघाटी सुरू केल्या आणि लवकरात लवकर हा करार अंतिम करण्याचा निर्णय घेतला. भारत-कॅनडा सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारासाठीच्या संदर्भ अटींवर (टीओआर) 2 मार्च 2026 रोजी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि कॅनडाचे आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री मनिंदर सिद्धू यांनी स्वाक्षरी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे दस्तऐवजांची देवाणघेवाण झाली.
समारंभात पंतप्रधानांनी 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 50 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट अधोरेखित केले. आर्थिक सहकार्याची पूर्ण क्षमता प्रकट करण्यासाठी सीईपीए लवकरात लवकर अंतिम करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधान कार्नी यांनी हे दोन आत्मविश्वासू देश भविष्यासाठी नव्या महत्त्वाकांक्षा, उद्दिष्ट आणि दूरदृष्टीसह भागीदारीचा विस्तार करत असल्याचे नमूद केले.
वाटाघाटींच्या संदर्भ अटी भारत-कॅनडा सीईपीए वाटाघाटींसाठी स्वरूप, वारंवारता आणि दृष्टिकोन निश्चित करतील. महत्त्वाकांक्षी, संतुलित आणि परस्पर लाभदायक सीईपीए अंतिम करण्यासाठी या अटी मार्गदर्शक ठरतील.
ऑक्टोबर 2025 मध्ये कॅनडातील कनानास्किस येथे झालेल्या जी7 बैठकीच्या पार्श्वभूमीवर, दोन्ही नेत्यांच्या द्विपक्षीय बैठकीदरम्यान झालेल्या निवेदनाचा पाठपुरावा म्हणून, दोन्ही बाजूंनी भारत-कॅनडा सीईपीए वाटाघाटींसाठी संदर्भ अटी अंतिम करण्यासाठी काम सुरू केले.
या वाटाघाटींमध्ये वस्तू, सेवा आणि इतर परस्पर सहमतीने ठरवण्यात आलेल्या धोरणात्मक क्षेत्रांचा समावेश असेल.
कॅनडा हा 2025 पर्यंत 41.65 दशलक्ष लोकसंख्या असलेला आणि खरेदी शक्ती समतोल (पीपीपी) नुसार 2.34 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स जीडीपी असलेला मोठा बाजार आहे. सीईपीएमध्ये आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारत-कॅनडा द्विपक्षीय व्यापार 8.66 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका होता. (निर्यात: 4.22 अब्ज अमेरिकन डॉलर्स; आयात: 4.44 अब्ज अमेरिकन डॉलर्स— स्रोत: डीजीसीआय अँड एस) सीईपीए’मुळे या व्यापार वाढीस मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
भारताकडून कॅनडाला होणारी प्रमुख निर्यात म्हणजे औषधे आणि औषधनिर्माण, लोखंड आणि पोलाद, समुद्री खाद्यपदार्थ, सुती कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि रसायने. कॅनडामधून होणारी भारताची प्रमुख आयात म्हणजे डाळी, मोती आणि सेमी-प्रेशिअस स्टोन्स, कोळसा, खते, कागद आणि कच्चे तेल.
भारताच्या कॅनडाला होणाऱ्या सेवा निर्यातीच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये दूरसंचार, संगणक आणि माहिती सेवा तसेच इतर व्यावसायिक सेवांचा समावेश आहे. सीईपीए अंतिम झाल्यानंतर या क्षेत्रांमध्ये भविष्यातील वाढीची मोठी क्षमता अपेक्षित आहे.
कॅनडामध्ये 4,25,000 हून अधिक भारतीय विद्यार्थी आणि प्रभावी भारतीय समुदायदेखील आहे. "एक कुटुंब" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दृढ परस्पर नागरिक संबंधांना सीईपीए मुळे आणखी बळकटी मिळेल.
सोनाली काकडे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2234784)
अभ्यागत कक्ष : 8