संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयएनएसव्ही कौंडिण्यवर मुंबईत होणार ध्वजारोहण

Posted On: 01 MAR 2026 11:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 मार्च 2026

 

भारतीय नौदलाचे शिडाचे जहाज (आयएनएसव्ही) कौंडिण्यवर 2 मार्च, 2026 रोजी मुंबई बंदरात आयोजित समारंभात संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या हस्ते औपचारिक ध्वजारोहण करण्यात येईल.

या जहाजाने ओमानला केलेला पहिला सागरी प्रवास आणि अरबी समुद्र ओलांडून केलेला ऐतिहासिक परतीचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचे प्रतीक हा समारंभ आहे. हा प्रवास भारताच्या समृद्ध आणि दीर्घकालीन सागरी परंपरेची पुन्हा प्रचिती देणारा असून हिंद महासागराच्या माध्यमातून भारत आणि ओमान यांच्यातील ऐतिहासिक संबंधांना अधिक दृढ करणारा आहे.

आयएनएसव्ही कौंडिण्य पारंपरिक पद्धतीने शिवलेले जहाज असून ते पूर्णपणे भारतीय तंत्राने बांधलेले आहे. यात लाकडी फळ्या काथ्या दोरीचा वापर करून हाताने शिवल्या जातात आणि नैसर्गिक राळाने  बंद केल्या जातात.

हे जहाज भारताच्या शतकानुशतके जुन्या सागरी कारागिरीचे पुनरुज्जीवन दर्शवते आणि भारतीय ज्ञान प्रणालींचा पुनर्शोध आणि जतन करण्याच्या राष्ट्राच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंबित करते. अजिंठा लेण्यांमधील 5 व्या शतकातील चित्रणातून संकल्पित आणि पारंपारिक कारागिरांच्या सहकार्याने भारतीय नौदलाच्या देखरेखीखाली बांधलेले, हे जहाज आधुनिक नौदल अभियांत्रिकी प्रमाणीकरणासह पारंपारिक कारागिरीचे मिश्रण दर्शवते.

आयएनएसव्ही कौंडिण्यने  29 डिसेंबर 2025 रोजी पोरबंदर येथून मस्कतकडे प्रस्थान केले. हा प्रवास प्राचीन काळी भारतीय नाविकांनी वापरलेल्या ऐतिहासिक सागरी मार्गांचा पुन्हा मागोवा घेणारा होता.  हे जहाज 14 जानेवारी 2026 रोजी पोर्ट सुलतान काबूस येथे पोहोचले. तेथे ओमानमधले  मान्यवर आणि भारतीय समुदायातील सदस्यांच्या  उपस्थितीत त्याचे औपचारिक स्वागत करण्यात आले. मुक्कामादरम्यान हे जहाज पाहुण्यांसाठी खुले ठेवण्यात आले होते आणि  सागरी वारसा आणि सांस्कृतिक राजनैतिकतेचे  ते तरंगते प्रतीक ठरले.  या प्रवासामुळे भारत–ओमान संबंध अधिक दृढ झाले. मसाले, कापड आणि सुगंधी पदार्थांच्या हजारो वर्षांच्या व्यापारातून निर्माण झालेल्या ऐतिहासिक नात्यांना या उपक्रमाने अधिक बळ दिले. तसेच अरबी समुद्रावरील दोन्ही देशांच्या सामायिक सागरी परंपरांचा पुनर्जागर यामुळे झाला. 

या मोहिमेने भारतीय नौदलाची केवळ सागरी सुरक्षा प्रदाता म्हणूनच नव्हे तर भारतीय संस्कृतीच्या सागरी वारशाची संरक्षक म्हणून भूमिका अधोरेखित केली. प्रख्यात दर्यावर्दी कौंडिण्य  यांच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे, हे जहाज भारताच्या सागरी नौवहन आणि हिंद महासागर ओलांडण्याचा  प्राचीन परंपरेचे प्रतीक आहे. या जहाजाचा  यशस्वी प्रवास पारंपारिक सागरी बांधकाम पद्धतींच्या टिकाऊपणासह  कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कौशल्य-कारागिरीचा  पुरावा आहे.

मुंबईत आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात या ऐतिहासिक सागरी वारसा पुनरुज्जीवन मोहिमेची सांगता होईल आणि सागरी संपर्क, सांस्कृतिक राजनैतिकता आणि पारंपारिक सागरी कारागिरीच्या जतनासाठी भारताची निरंतर  वचनबद्धताही  अधोरेखित होईल. 

 

* * *

नेहा कुलकर्णी/सोनाली काकडे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2234439) अभ्यागत कक्ष : 14