आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयुर्वेदिक विज्ञान इनक्युबेशन केंद्रामुळे युवा संशोधक अभिजात ज्ञानाला समकालीन आरोग्य विषयक उपाययोजनांमध्ये रुपांतरीत करण्याइतके सक्षम होतील : प्रतापराव जाधव

Posted On: 27 FEB 2026 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 फेब्रुवारी 2026

 

केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या अखत्यारितील केंद्रीय आयुर्वेद विज्ञान संशोधन परिषदेने, आपल्या बंगळुरू इथल्या केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेअंतर्गत स्थापन केलेल्या आयुर्वेदिक विज्ञान इनक्युबेशन केंद्रासाठी (ASIC), देशभरातील स्टार्टअप्सना स्वारस्य प्रस्ताव (Expression of Interest - EoI) पाठवण्याचे आवाहन केले आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीने आयुष संस्थांच्या माध्यमातून स्टार्टअप इनक्युबेशन योजना ही प्रमुख योजना म्हणून राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत  आयुर्वेदिक विज्ञान इनक्युबेशन केंद्राची स्थापना केली गेली आहे. नियोजनबद्ध स्वरुपातील मार्गदर्शन, निधी विषयक पाठबळ आणि नियामकांमधील सुलभता अशा उपाययोजनांच्या माध्यमातून आयुर्वेद क्षेत्रातील आधुनिक उद्यमशील उपक्रमांना प्रोत्साहन देणे हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे.

आयुर्वेदिक विज्ञान इनक्युबेशन केंद्र हे, आयुष क्षेत्राच्या नवोन्मेषाधारीत प्रगतीचा कारक घटक म्हणून उपयुक्त ठरेल अशी या केंद्राच्या स्थापनेमागची संकल्पना आहे. या केंद्राच्या माध्यमातून उद्योजक, संशोधक, गुंतवणूकदार, उद्योग क्षेत्रातील दिग्गज आणि धोरणकर्त्यांना परस्परांसोबत जोडणारी बहुआयामी परिसंस्था उभारली जाणार आहे. संशोधनावर आधारित उत्पादने विकसित करणे, आयुर्वेदामधील आधुनिक स्वरुपातील उपाययोजनांना व्यावसायिक स्वरुप मिळवून देणे तसेच भारताला तथ्यांवर आधारित पारंपारिक औषधोपचार क्षेत्राचे जागतिक नेतृत्व करणारा देश म्हणून स्थान मिळवून देण्यासाठी  उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये परस्पर सहकार्याला चालना देणे  हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आयुष मंत्रालय पारंपारिक औषधोपचार क्षेत्रात नवोन्मेष आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी वचनबद्ध असल्याचे केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटले आहे. अभिजात ज्ञानाला समकालीन आरोग्य विषयक उपाययोजनांमध्ये रुपांतरीत करता यावे यादृष्टीने, केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेअंतर्गतच्या, बंगळुरू इथल्या आयुर्वेदिक विज्ञान इनक्युबेशन केंद्राच्या माध्यमातून, युवा संशोधकांचे सक्षमीकरण केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे एकात्मिक आरोग्य सेवेचे जागतिक केंद्र म्हणून भारताच्या होत असलेल्या उदयाला अधिक बळकटी मिळेल असे ते म्हणाले.

केंद्र सरकारने आयुष क्षेत्रात सक्षम स्टार्टअप परिसंस्था उभारण्यावर भर दिला आहे. सरकाच्या याच प्रयत्नांचे प्रतिबिंब आयुर्वेदिक विज्ञान इनक्युबेशन केंद्रातून उमटले असल्याचे आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी सांगितले. विज्ञाननिष्ठ मार्गदर्शन, आर्थिक सहाय्य  आणि नियामक पाठबळ देण्यासारख्या उपाययोजनांच्या माध्यमातून, जागतिक मानकांशी सुसंगत असलेली, उच्च गुणवत्तेची आणि संशोधनावर आधारित आयुर्वेद उत्पादने तसेच सेवा विकसित करण्याचा सरकारचा मानस असल्याचे ते म्हणाले.

महत्त्वाकांक्षी उद्योजकांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि शाश्वत तसेच नवोन्मेषाधारीत नाविन्यपूर्ण आयुर्वेद उद्योग क्षेत्राच्या जडणघडणीत योगदान द्यावे असे आवाहन केंद्रीय आयुर्वेद विज्ञान संशोधन परिषदेचे महासंचालक प्रा. रबीनारायण आचार्य यांनी केले.

अर्ज कसा करावा:

इच्छुक अर्जदार तीन सोप्या टप्प्यांत इनक्युबेशन बद्दलची ही अर्ज प्रक्रीया पूर्ण करू शकतात. सर्वात आधी, आपली  ओळख पडताळणी जलद गतीने पूर्ण करण्यासाठी पोर्टलवर मूलभूत तपशील आणि अधिकृत ईमेल आयडी वापरून नोंदणी करावी लागेल. त्यानंतर डॅशबोर्डवर लॉग इन करून ईमेल आयडीची पडताळणी करावी आणि स्वतःचे प्रोफाईल पूर्ण करावे. आपल्या प्रोफाईलमध्ये आपला चमू, उत्पादनाची संकल्पना आणि विकासाचा टप्पे याबद्दलची माहिती द्यावी. अखेरच्या टप्प्यात समस्यांवरील उपाययोजनांच्या स्वरूपाविषयीचे निवेदन, प्रस्तावित उपाययोजना आणि आवश्यक दस्तऐवजांसह आपल्या इनक्युबेशन विषयीचा अर्ज भरून तो दाखल करावा. आपला अर्ज अंतिम स्वरुपात दाखल करण्याआधी अर्जदार आपला मसूदा अर्ज  सेव्ह करूनही ठेऊ शकतात.

हा अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 मार्च 2026 आहे. यासाठी इच्छुक असलेलेले नवोन्मेषक https://ASIC.ccras.org.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात.

 

* * *

सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2233741) अभ्यागत कक्ष : 57