अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

यवतमाळमध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी 'विदर्भ स्पेसिफिक ट्रेनिंग' आणि टाऊनहॉल बैठक संपन्न

Posted On: 24 FEB 2026 7:02PM by PIB Mumbai

नागपूर, 24 फेब्रुवारी 2026

यवतमाळ जिल्ह्यातील आर्थिक समावेशन आणि एमएसएमई विकासाच्या उद्दिष्टांना चालना देण्यासाठी, भारतीय रिझर्व्ह बँक नागपूर तर्फे 23 फेब्रुवारी 2026 रोजी 'विदर्भ स्पेसिफिक ट्रेनिंग फॉर एम्पॉवरिंग एमएसएमई आणि एका विशेष टाऊनहॉल बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात यवतमाळ जिल्ह्यातील 200 हून अधिक एमएसएमई उद्योजक आणि तरुण इच्छुकांनी सहभाग नोंदवला.  

या कार्यक्रमाला भारतीय रिझर्व्ह बँक नागपूरचे प्रादेशिक संचालक श्री. सचिन वाय. शेंडे, आरबीआय नागपूरच्या उपमहाव्यवस्थापक श्रीमती अंजना श्यामनाथ, बँक ऑफ इंडियाचे उपमहाव्यवस्थापक श्री. कुश गहोत्रा, लीड बँक (सेंट्रल बँक ऑफ इंडिया) चे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. सुनील पांडे, जिल्हा उद्योग केंद्र (यवतमाळ) चे महाव्यवस्थापक श्री. सुशील गरूड, तसेच सिडबी, नाबार्ड आणि इतर प्रमुख बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सहभागींना कर्ज सुविधांची माहिती देण्यासाठी बँकांनी विशेष स्टॉल्सही लावले होते.

उपस्थितांना संबोधित करताना प्रादेशिक संचालकांनी उद्योजकांचे कौशल्य वाढवणे आणि त्यांना औपचारिक क्षेत्राशी जोडण्याचे महत्त्व अधोरेखित केले. श्री. सचिन वाय. शेंडे यांनी उद्योजकांना सक्रियपणे सहभागी होऊन आपल्या शंकांचे निरसन करून घेण्याचे आवाहन केले. आरबीआयच्या उपमहाव्यवस्थापकांनी 'विदर्भ स्पेसिफिक ट्रेनिंग' उपक्रमाची संकल्पना स्पष्ट करताना सांगितले की, स्थानिक संधी आणि आव्हानांना थेट प्रतिसाद देण्यासाठी आरबीआय नागपूर कार्यालयाने हा उपक्रम तयार केला आहे.

या कार्यशाळेत यवतमाळ जिल्ह्याच्या आर्थिक क्षमतेवर आधारित उद्योगांच्या संधींवर चर्चा करण्यात आली. यामध्ये उद्यम नोंदणी, रेकॉर्ड-कीपिंग, आणि केंद्र व राज्य सरकारच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम,  मुख्यमंत्री  रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुद्रा, क्रेडिट गॅरंटी व पीएम विश्वकर्मा यांसारख्या योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. याशिवाय जीएसटी  प्लॅटफॉर्म, गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस पोर्टल आणि मूलभूत बँकिंग संज्ञांबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील यशस्वी उद्योजकांनी आपल्या संघर्षाच्या आणि यशाच्या कथा सांगून उपस्थितांना प्रेरित केले.

एक शाश्वत जिल्हास्तरीय एमएसएमई इकोसिस्टम तयार करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यशाळेचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

शैलेश पाटील/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2232326) अभ्यागत कक्ष : 60
Read this releasein: English